ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत.
ब्रॅंडसबद्दल माहिती घेताना आपण त्या-त्या ब्रॅंडशी जोडल्या गेलेले लोगो आणि त्यांची स्लोगन म्हणजेच घोषवाक्ये हेसुद्धा बघणार आहोत कारण त्याशिवाय काही ब्रॅंडसचं महात्म्य कळायचंच नाही.
पश्चिम भारतात लोकांची सकाळ होते तीच “अमूल” या ब्रॅंडच्या साथीने. सकाळच्या चहातले दूध, ब्रेडबरोबर लावायचे लोणी आणि चिज, पराठ्याबरोबर खायला दही, जेवताना श्रीखंड, भाजीतले पनीर हे सगळं अमूलचं. सामान्यांशी अमूलनं नातं जोडलं ते त्यांच्या विनोदमिश्रीत जाहिरातींमधून. शेतकर्यांच्या सहकारी संस्थेतून उगम पावलेला “अमूल” सुपरब्रॅंड हा एका वेगळ्या लेखाचाच विषय आहे.
“अमूल” बरोबरच महाराष्ट्रात “चितळे” “महानंदा” आणि “आरे”चाही बोलबाला आहे. पण “अमूल” ते “अमूल”च. आता तर अमूलने उत्तरेतल्या बाजारातसुद्धा उडी मारलेय.
कपडे धुण्याच्या पावडरचं जबरदस्त ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग केलं ते “निरमा”ने. “वॉशिंग पावडर निरमा… दूध सी सफेदी… निरमासे आये…”. त्या जाहिरातीची ट्यूनच केवढी डोक्यात भिनलेय. “उजाला” आणि “निरमा” या दोन ब्रॅंडसनी तथाकथित बलाढ्य आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसना भारतातल्या बाजारात चांगलीच स्पर्धा उभी केली.
काही वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडताना लोक घरातूनच प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरुन न्यायचे. मात्र “पार्ले प्रॉडक्टस” या बिस्किटे बनवणार्या कंपनीने लोकांच्या या गरजेला ओळखून “बिस्लेरी” या नावाने बाटलीबंद पाणी बाजारात आणले आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. बाटलीतले पाणी… मग ते कोणत्याही कंपनीने बनवले असो… त्याला ग्राहक बिस्लेरीच म्हणणार आणि दुकानदारसुद्धा बिस्लेरी मागितल्यावर कोणतंही बाटलीबंद पाणी देणार ! (बाटलीबंद पाण्यावरचा एक लेख या पोर्टलवर जरुर वाचा). बाटलीतल्या पाण्याची ही क्रेझ एवढी वाढली… आणि काही उद्योजकांना तीने अशी भूरळ घातली की बिअर आणि तत्सम अंमली पेये बनवणार्या विजय मल्यांनी “किंगफिशर” आणि तंबाखुचे पदार्थ बनवणार्या माणिकचंदांनी “ऑक्सिरिच” या नावांनी पाण्याच्या बाजारात प्रवेश केला.
रोजच्या जेवणातल्या पापडाला ब्रॅंडचं वलय मिळवून दिलं ते “लिज्जत”ने आणि लोणच्याला “बेडेकरांनी”. आता “प्रवीण”, “मदर्स रेसिपी” वगैरे लोणचीसुद्धा बाजारात आलीत, पण बेडेकरांनी अर्धशतकाहुन जास्त काळ या बाजारपेठेवर राज्य केलंय.
आज कोणत्याही क्षेत्रात बघा… ब्रॅंडेड वस्तुंची चलती आहे. पूर्वी कोपर्यावरच्या वाण्याकडून केली जाणारी खरेदी आज मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये होतेय आणि चपाती बनवायचं पीठसुद्धा चक्कीवर गहू दळून आणण्यापेक्षा ब्रॅंडेड आणि चकचकीत, रंगीत डिझाईन्सच्या प्लास्टिकच्या पिशव्यातलंच खरेदी केलं जातंय.
असा हा ब्रॅंड-नामा. नियमितपणे वाचतच रहा.
Leave a Reply