नवीन लेखन...

भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी

बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी यांचा जन्म ३१ मार्च १९८७ रोजी गुडीवाडा, आंध्र प्रदेश येथे झाला.

राष्ट्रीय स्तरावरील माजी बुद्धिबळपटू आणि दोन वेळा राज्यस्तरीय विजेते राहिलेले कोनेरू अशोक हे तिचे वडील. त्यांना आशा होती की त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न तिने साकार करावे. हंपी या शब्दाचा इंग्रजी अर्थ चॅम्पियन असा आहे.

रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले कोनेरू अशोक यांनी नोकरी सोडून हंपीला अगदी लहानपणापासूनच तयार करायला सुरुवात केली. अवघ्या ५ वर्षांची असल्यापासून ती बुद्धिबळाचे डावपेच शिकू लागली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी १९९६ मध्ये ती राष्ट्रीय चॅम्पियन बनली. तिला पुढे प्रगती करायची असेल तर तिचे इलो (Elo) रेटिंग वाढवणे गरजेचे होते. हे तिच्या वडीलांनी त्यांनी हेरलं त्यासाठी मात्र तिला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे आवश्यक होते. आणि या सगळ्यासाठी येणारा खर्च, विशेषतः प्रवासाचा खर्च, हा त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. म्हणून तिने त्यावेळी बँक ऑफ बडोदाचे प्रायोजकत्व स्वीकारले. परंतु बँकेकडून मिळणारी रक्कम हीसुद्धा आंतरराष्ट्रीय प्रवासाला फारशी पुरेशी नव्हती. त्यामुळे हंपीने मग आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी २००६ मध्ये ONGC (तेल आणि नैसर्गिक वायू निगम) या सरकारी कंपनीत नोकरी पत्करली, जेणेकरून तिची प्रवास खर्चाची चिंता मिटेल आणि ते तिच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते.

१९९६ मध्ये हंपी राष्ट्रीय चॅम्पियन बनली. त्यापाठोपाठ जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने तीन सुवर्ण पदके पटकावली – १९९७ साली दहा वर्षांखालील मुलींच्या गटात, त्यानंतर १९९८ साली बारा वर्षाखालील मुलींच्या गटात आणि २००० साली १४ वर्षांखालील मुलींच्या गटात. त्याच्याही पुढे जाऊन ती आता तरुणांसोबत स्पर्धा करू लागली. १९९९ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले. तसेच २००४ मध्ये जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले. २००१ मध्ये तिने वर्ल्ड ज्युनियर गर्ल चॅम्पियनशिप जिंकली.

२००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले. त्यानंतर २०१५ ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले. २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली. त्यानंतर लगेचच जगातील दहा सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या केन्स चषक स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले. पुढे २०२० मध्ये पोलंडच्या मोनिका सॉक्कोविरुद्धचा टाय-ब्रेकर सामन्यात जिंकून कोनेरू हंपीने भारताला ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. इंटरनेटच्या तांत्रिक अडचणींमुळे भारताला रशियासोबतच संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर जुलै २०२० मध्ये पार पडलेल्या फाईड स्पीड बुद्धिबळ स्पर्धेत उपउपांत्य फेरीत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाच्या हू यीफान या प्रतिस्पर्धीचा दारुण असा पराभव केला. २०१४ मध्ये हंपीने दसारी अन्वेश यांच्याशी लग्न केले. प्रसूतीनंतर ती खेळाकडे परतली, तेव्हा सातत्याने मोठे पराभव तिच्या वाट्याला आले. ती ऑलिम्पियाड, क्लासिकल जागतिक चॅम्पियनशिप आणि जागतिक जलदगती बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये हरली. याची सल तिला सतावत होती. त्यानंतर अखेर २०१९ मध्ये मॉस्को येथे झालेल्या वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत तिने जागतिक विजेतेपदाला गवसणी घालत, आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. या स्पर्धेनंतर तिच्या असे लक्षात आले की वेगवान बुद्धिबळ खेळप्रकारांसाठी ती बनलेली नसून, आता तिचे मोठे लक्ष्य आहे क्लासिकल बुद्धिबळाची जागतिक चॅम्पियन होणे.

२००२ मध्ये वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ग्रँडमास्टर हे पद मिळवणारी हंपी इतिहासातली सर्वांत कमी वयाची महिला ठरली होती. हंपी ही पुरुषांचे ग्रँडमास्टर पद मिळवणारी पहिली भारतीय महिलासुद्धा ठरली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये वैयक्तिक तसंच सांघिक स्पर्धांमध्ये हंपीने सुवर्ण पदके पटकावली. २००३ मध्ये भारत सरकारकडून तिला क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २००७ मध्ये भारताचा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार पद्मश्रीने तिला सन्मानित करण्यात आले होते. २०२१ चा बीबीसी तर्फे दिला जाणारा इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपीला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर देण्यात येतो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..