जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म २३ जुलै १९२७ रोजी झाला.
धोंडुताई कुलकर्णी यांनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीत साधना सुरू केली. वयाच्या आठव्या वर्षां आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात पसरले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गानकला सादर करण्याची संधी मिळाली.
त्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात अल्लादिया खाँ यांचे पुतणे नत्थन खाँ यांच्या सुरांनी मंदिरातील पहाट प्रफुल्लित व्हायची. हे सूर कानावर पडावेत यासाठी लहानपणीच मा.धोंडूताई मंदिरात जात असत. येथूनच त्यांचा कान आणि संगीताची जाण तयार झाली. मा.धोंडूताईंना गाणे शिकवा, असे साकडे एके दिवशी त्यांच्या वडिलांनी नत्थन खाँ यांना घातले, आणि मा.धोडूताई त्यांच्या शिष्या झाल्या. तीन वर्षांतच नत्थन खाँ यांनी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर अल्लादिया खाँ यांचे पुत्र भुर्जी खाँ यांनी महालक्ष्मी मंदिरात संगीत सेवा सुरू केली, आणि धोंडुताईंच्या वडिलांनी त्यांची भेट घेऊन धोंडूताईंना शिकविण्याविषयी विनंती केली. सूर्योदयाबरोबर सुरू होणाऱ्या या संगीत साधनेतून धोंडूताईंना आवाजाचा कस राखण्याचे कसब साधणे शक्य झाले. संगीताच्या शिक्षणासाठी धोडुताईंना शाळा सोडावी लागली. १९५० मध्ये भुर्जी खाँ यांचे निधन झाले. तोवर मा.धोंडुताईनी त्यांच्याकडून संगीताचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. पुढे जवळपास सात वर्षे मार्गदर्शन नसतानाच्या काळात धोंडुताईंनी मैफिली सुरू केल्या. मा.केसरबाई केरकर यांनी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांना जाहीर निमंत्रण दिल्याने १९६२ मध्ये त्यांनी केसरबाईंना पत्र पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरविण्याची इच्छा व्यक्त केली आणि धोडुताई केसरबाईंच्या शिष्या झाल्या. धोंडुताईंच्या संगीतावर केसरबाईंच्या शैलीचा प्रभाव होता. धोंडुताई स्वत नेहमी त्याचा आदरपूर्वक उल्लेखही करीत असत. धोंडूताईनी सांगीतिक आणि जीवनविषयक तत्वांच्या निष्ठेपायी त्यांनी कशाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर जे पटले, त्याचाच पाठपुरावा केला. संगीताच्या बाबतीत सांगायचे तर जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेची शुद्धता जपली आणि वैयक्तिक बाबतीत, संगीताची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिल्या. त्यांनी कशाचाही मोह धरला नाही आणि लोकमान्यता, राजमान्यता यासाठी तत्वांशी तडजोड केली नाही. एक परिपूर्ण आयुष्य त्यांना लाभले. अखेरच्या काळात त्यांच्या शिष्यांनी त्यांची खूप सेवा करून गुरु-शिष्य परंपरेचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असल्याचे दाखवून दिले. शुद्ध मोकळा आकारयुक्त बुलंद आवाज आणि स्वरांची भारदस्त मांडणी ही या घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े त्यांच्यात अंगभूत होती. या घराण्याची शुद्ध परंपरा त्यांनी जतन केली. किंबहुना जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायकीबाबत धोंडूताईंचा शब्द अंतिम होता. आज जयपूर घराण्याची गायकी ज्या कुणी पुढे चालवली आहे ते जवळजवळ सर्वचजण धोंडुताईंचे शिष्य होते व आहेत. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल धोंडुताईंना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
धोंडुताई कुलकर्णी यांचे १ जून २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply