कथक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ही प्राचीन शैली मानली जाते कारण तिचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे.हल्लीच्या काळात या नृत्यप्रकारामधून कृष्ण कथा सादर केल्या जातात.कथक ह्या शब्दाचा उगम ‘कथा कहे सो कथक’ असा सांगितला जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हटले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.
कथकची तीन प्रमुख घराणी आहेत – जयपूर, लखनउ आणि बनारस. फारसे प्रचलित नसलेले रायगढ घराणे ही कथक या नृत्यशैलीचे उगमस्थान आहे.
जयपूर घराणे : राजस्थानमधील राजा कच्छवा यांच्या दरबारात ज्या विविध प्रकारचे फुटवर्क,चक्कर आणि तालाच्या विभिन्न प्रकारांचा उगम झाला ते जयपूर घराणे. पखवाज हे वाद्य जयपूर घराण्यातील नृत्यप्रकारात जास्त वापरले जाते.
लखनऊ घराणे: अवध राज्यातील नवाब वाजिद अली शाह यांच्या दरबारात ज्या कलात्मक रचना, ठुमरी या अभिनयांबरोबर शाब्दिक अभिनय व काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा उगम झाला ते लखनऊ घराणे. सध्याच्या काळात अच्छन महाराज यांचे पूत्र पंडित बिरजू महाराज हे लखनऊ घराण्यातील कथक नृत्याचे प्रमुख प्रतिनिधी मानले जातात.
बनारस घराणे : प्रसिध्द साहित्यिकांमधील एक जानकी प्रसाद यांच्यापासून कथकमधील बनारस घराण्याचा उगम झाला. या घराण्यात नटवरी नृत्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यातील घेरे (चक्कर) डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंनी घेतले जातात.
रायगढ घराणे : छत्तीसगडचे महाराज चक्रधार सिंह यांच्याकडे कथकमधील रायगढ घराणे जन्माला आले. यात तबल्याचा जास्त वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यशैली,कलाकारांमधील एकात्मता आणि तबल्याच्या विविध रचना यांमुळे या घराण्यातील नृत्यशैलीला वेगळेच महत्व प्राप्त होते. पंडित कार्तिक राम, पंडित फिर्तु महाराज, पंडित कल्याणदास महांत व पंडित बरमानलक हे ह्या घराण्यातील नृत्यशैलीचे प्रतिनिधी मानले जातात.
इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथक मध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथक वरील मुघल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.
— पूजा प्रधान
Leave a Reply