नवीन लेखन...

भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून जात असताना ऐनवेळी तिच्या वडिलांचे हृदयपरिवर्तन झाले आणि माघारी परतून महजबीनला छातीशी घट्ट कवटाळले. तसेच जमेल तसे तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला.

मीना कुमारी यांना कलेचा वारसा तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारीला यांच्या परिवारात त्यांना ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून त्यांना लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकली. नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा पहिला चित्रपट. त्यावेळी मा.मीना कुमारी अवघी चौदा वर्षाची होती. सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांतून अभिनय केला. नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतनसारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता. ‘महल’ या चित्रपटाच्या यशानंतर एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कमाल अमरोही यांना तिने अभिवादन केले असता त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मा.मीना कुमारी नायिका म्हणून यशस्वी ठरल्यानंतर कमाल अमरोही यांच्याकडूनच तिला त्यांच्या ‘अनारकली’ चित्रपटात काम करण्याबाबतचा प्रस्ताव आला. मागील अनुभव चांगलाच लक्षात असल्याने मा.मीना कुमारीने प्रस्ताव नाकारला. त्यामागचे कारण समजल्यानंतर कमाल अमरोही यांनी समक्ष भेटून तिचा गैरसमज दूर केला. त्यानंतर मीना कुमारीने सदर चित्रपट करण्यासाठी होकार दिला. दरम्यानच्या काळात मीना कुमारी यांना अपघात झाला. तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्या कालावधीत कमाल अमरोही तिला ससून हॉस्पिटलला नियमित भेटावयास येत असत. ‘अनारकली’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेबाबत तिने अमरोही यांना विचारले असता तिच्या हातावर ‘मेरी अनारकली’ असे लिहीत. त्या भूमिकेसाठी अन्य कुणाच्या नावाचा विचारही करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात हाताला इजा झाल्यामुळे मीना कुमारीला कायमस्वरूपी बँडेड लावावे लागले. साडी अथवा ओढणीत तो हात तिला लपवावा लागत असे. पुढे ‘अनारकली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होऊनही आर्थिक बाबींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरोही यांना मा.मीना कुमारी ‘चंदन’ तर अमरोही तिला ‘मंजू’ या नावाने संबोधत असत. वडिलांच्या संमतीशिवाय निकाह करण्यास मीना कुमारी तयार नव्हती. आधी लग्न करू आणि मग घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवू, असे अमरोही यांनी पटवून दिल्याने मा.मीना कुमारी राजी झाली. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी मीना कुमारीला वडिलांनी तिची लहान बहीण महलिकासह फिजिओथेरपी उपचारासाठी एका दवाखान्यात सोडलेले असताना रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान प्रथम शिया आणि सुन्नी पद्धतीने मोजक्या साक्षीदारांसह दोघांचा निकाह झाला. पुढे वडिलांना समजल्यावर ते संतापले. तलाक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दोघांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणले. मीना कुमारी यांना पती, कमाल अमरोहीच्या ‘डेरा’ चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. मात्र अली बक्ष यांनी मेहबूब खान यांच्या ‘अमर’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्या चित्रपटाचे चार-पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले असताना मेहबूब खान यांच्याशी मतभेद झाल्याने मीना कुमारी ‘अमर’ चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडून पती कमाल अमरोही यांच्या ‘डेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. या कारणामुळे वडिलांनी रात्री घरात न घेतल्याने पयार्याने मा.मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या घरी जावे लागले. मा.अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती. त्यामुळेच खूप इच्छा असूनही मीना कुमारीला मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांचेकडून तिच्यावर लादला गेला.

परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मा.मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा,मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने तिलाच मिळालेली होती. मा.मीनाकुमारी ही अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. मा.मधुबाला ह्या मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. मा.मीना कुमारी यशाचे शिखर काबीज करत होती. मात्र कमाल अमरोही यांना तिच्या यशाचा हेवा वाटू लागला होता. सोहराब मोदी यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांना कमाल अमरोही यांचा परिचय लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांचे पती असा करून दिला होता. तेव्हा ‘मी कमाल अमरोही व ही माझी पत्नी मीना कुमारी’ असे नमूद करत अमरोही त्या कार्यक्रमातून निघून गेले. मीना कुमारीने अभिनय करणे सोडून द्यावे, असे त्यांना वाटत असे. मात्र मीना कुमारीने नकार दिल्याने त्यांनी काही अटींवर तिला अभिनय कारकीर्द सुरूठेवण्यास अनुमती दिली. चित्रीकरण आटोपून साडेसहा वाजण्याच्या आत घरी परतणे. मेकअपरूममध्ये मेकअपमनशिवाय अन्य कुणाशी संवाद न साधणे. स्वत:च्याच वाहनाने प्रवास करणे, अशा त्या अटी होत्या. मात्र मीना कुमारीने त्या निमूटपणे स्वीकारल्या. तरी त्यांच्या वैवाहिक संबंधात दुरावा येत होता. पुढे ते विभक्त राहू लागले. मीना कुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेता धमेंद्र हा चित्रपटांत जम बसवण्यासाठी धडपडत होता. मीना कुमारीच्या यशाचा धमेंद्रला मोठया प्रमाणावर फायदा झाला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मीना कुमारीची विमानतळावर भेट झाली असता त्यांनी तिच्याकडे धमेंद्रबाबत विचारणादेखील केली होती. पुढे मात्र ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर धमेंद्रने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी झोप येण्यासाठी तिला एक पेग ब्रँडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन, दोनचे चार असे पेग वाढतच गेले आणि मीना कुमारी पुरती नशेच्या आहारी गेल्या. चित्रीकरणावेळी, प्रवासात सगळीकडे तिच्यासोबत पर्समधे मदिरेची छोटी कुपी असायची. ‘साहिब बिवी और गुलाम’मधील ‘छोटी बहू’ हे पात्र आपल्या वास्तव जीवनाशी साधम्र्य असल्याचे मीना कुमारी सांगत असत. त्यानंतरच्या काळात कमाल अमरोही त्यांच्या महात्त्वाकांक्षी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती करत असताना आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्या चित्रपटात मा.मीना कुमारी केवळ अभिनयच करत होती, असे नाही तर तिने तिची सर्व मालमत्ता अमरोही यांच्या चित्रपटासाठी पणाला लावली होती. तरीही ‘पाकिजा’चे चित्रीकरण अनेक वर्षे रखडले गेले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केले. ३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच मा.मीना कुमारीचे निधन झाले. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

मीनाकुमारी यांची काही गाणी, पाकिजा चित्रपट, बायोग्राफी

https://youtu.be/jNdVm0W7Vtc

https://youtu.be/Q2X6u0Zg8P8

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..