भारतीय संस्थानिकांचं रेल्वेप्रेम, त्यांनी बांधलेले आपल्या संस्थानातील रेल्वेमार्ग, त्यासाठी परदेशातून मागविलेली विविध प्रकारची इंजिनं, राजेशाही डबे या सर्व बाबींचा इतिहासही मोठा मनोरंजक आणि वाचनीय आहे.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या छोट्या युवराजाला वाढदिवसानिमित्त छोट्या रुळांवरून चालणारी वाफेच्या इंजिनाची गाडी भेट दिली होती. तो स्वतः इंजिन चालवीत संपूर्ण महालाच्या परिसरात आपल्या मित्रांना घेऊन फिरत असे. मुंबई-बडोदा रेल्वे बांधणीला बडोद्याच्या महाराजांनी सढळ हाताने मदत केली, परंतु एका अटीवर. ती अट अशी होती, की या रेल्वेमार्गाला बॉम्बे बडोदा ( बी.बी.) असं नाव दिलं जावं. तोपर्यंत जी. आय. पी. रेल्वे-लाईन सुरु झाली होती. दादर हे या दोन्ही रेल्वे मार्गांवरचं स्टेशन होतं. दादर ट्रॅम टर्मिनस (T.T.) हे एका भागात होतं. यांना जोडणारा, दोन्ही रेल्वे मार्गांच्यावरून जाणारा वाहनांसाठीचा मोठा पूल टिळक ब्रीज १९२३ साली बांधला गेला. तेव्हापासून दादर टी.टी. व दादर बी.बी. असे दोन विभाग ओळखले जाऊ लागले.
बडोदा संस्थानाप्रमाणेच, ग्वाल्हेरचे महाराजा सिंदिया यांनाही रेल्वेचं आकर्षण होतं. यांच्या राजवाड्याभोवतीही दोन मैल लांब रुळांवरून त्यांची अलिशान गाडी फिरत असे. त्यांच्याकडील मेजवानीकरता एका भव्य राजेशाही हॉलमध्ये जेवणासाठीच्या लांब लाकडी टेबलाच्या कडेने विजेवर चालणारी छोटी गाडी फिरत असे. त्यातील छप्पर नसलेल्या, सजविलेल्या डब्यातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या व काचेचे नक्षीदार चषक प्रत्येक समोर फिरवले जात. संपूर्ण गाडी चांदी व सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेली होती.
हैदराबादच्या निझामांकडेही खाजगी रेल्वेगाडी होती. त्यांच्या त्या खाजगी गाडीच्या डब्याला हस्तिदंताची झालर व सोन्याचं छप्पर होतं.
अनेक संस्थानिक मालगाडीचे डबे ओढून नेण्यासाठी हत्ती, खेचरं आणि घोड्यांची मदत घेत, त्यामुळे बऱ्याच मालाचा पुरवठा थेट छोट्या गावांपर्यंत होत असे. भिंड मोरेना ही मध्यप्रदेश संस्थानाची रेल्वेसेवा प्रख्यात होती. राजस्थानच्या जयपूर संस्थानच्या महाराणी गायत्रीदेवी यांनी लिहिलेल्या द प्रिन्सेस रिमेंबर्स या पुस्तकात त्यांच्या लहानपणी त्यांनी रेल्वेने केलेल्या प्रवासाची मनोरंजक हकीकत आहे.
त्या म्हणतात बंगालचा उत्तर विभाग असलेल्या न्यू जलपईगुरी येथील कूचबिहार या संस्थानाची मी राजकन्या. माझे आजोळ बडोद्याचे. या ठिकाणी सुट्टीत आम्ही वारंवार जात असू. बडोदा येथे आजोबांचा राजवाडा होता. भारताच्या ईशान्य कोपर्यात असलेल्या आमच्या कूचबिहार येथून २००० मैल रेल्वेने प्रवास करीत भारताच्या पश्चिम किनाऱ्या जवळील बडोदापर्यंत जाणे म्हणजे मला व माझ्या सर्व लहान भावंडांना आनंदाची पर्वणीच असे. प्रवासाला निघताना आमच्या सामानाचा डोंगराएवढा ढीग असे. बडोद्यात कडक उन्हाळा व काही महिन्यात कडक थंडी, या दोन्ही गोष्टींना तोंड देण्यासाठी भरपूर सामानाची गरजच असे. निघण्याच्या दिवशी नुसता गोंधळ. आमचा प्रशिक्षित नोकरवर्ग सर्व सामान आगगाडीच्या डब्यात व्यवस्थित लावून ठेवीत असे. जवळजवळ संपूर्ण गाडीच आमच्या ताब्यात असेल. सामानाच्या याद्या परत परत बघून सामानाची उचकाउचकी करत एकदाचा प्रवास सुरू होत असे. तब्बल आठ दिवस गाडीतून प्रवास म्हणजे बालपणातील सर्वांत रम्य आठवडा. पहिल्या वर्गाचे तीन चार डबे आमचेच. दुसऱ्या वर्गाचे डबे मदतनिसांचे. नोकर, स्वयंपाकघर, स्वयंपाकी यांची सोय तिसऱ्या वर्गात केली जाई. हा सर्व प्रवास १९२० सालात होत असताना ते म्हणजे एखाद्या देशांतरच वाटे. डब्यातील बाथरूम स्वच्छ असे. शॉवर घेण्याची व्यवस्था असे. पहिले दोन दिवस आमचे आचारी साग्रसंगीत जेवण बनवीत, पुढे रेल्वेकेटरिंगचं जेवण आमच्या ऑर्डरप्रमाणे येत असे. काही वेळा ते प्लॅटफॉर्मवरील कॅफेट रेंगाळत धमाल करीत. हा सगळा रोमांचकारी अनुभव होता. गाडी स्टेशनात थांबली, की आमच्या डब्यापुढे विक्रेत्यांची एकच झुंबड उडे. फळं, मिठाई, गरम चहा, रंगीत लाकडी खेळणी, सोंड वर उचललेला राखाडी रंगाचा हत्ती, त्याची सोनेरी झूल, सजविलेले घोडे-उंट-वाघ-चित्ते, अशी खेळणी प्लॅटफॉर्मशिवाय दुसरीकडे कुठेच मिळत नसल्यानं त्यावेळी त्याची अपूर्वाई जास्तच वाटे. काही वेळा गाडी प्लॅटफॉर्मवर तास दोन तास उभी राहणार असेल, तर आम्ही मुलं स्टेशनवरच पळापळी, शिवशिवी खेळत खूप दंगामस्ती, आरडाओरडा करीत असू. मग भोजन गृहात जाण्यासाठी नोकर घाई करीत, एकदाचे आम्हाला डब्यात बसवीत व आमचा प्रवास पुढे चालू होत असे. अखेर बडोदा यायचं. दरवेळीच हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रवासाचा तो हवासा शेवट होत असे.
पुढे माझ्या लग्नानंतर कूचबिहार येथून मी व माझे पतीराज जयपुरला येण्यास निघालो. सवाईमाधोपुरपासून आमचा प्रवास जयपुर संस्थानाच्या खास रेल्वेगाडीतून झाला. आमचा डबा म्हणजे महालच होता. वाटेत राजस्थान मधील लहान खेडी लागत होती. जयचं जन्मगाव इसारदा त्यानं दाखवलं, तेव्हा तो भावूक झाला होता. जयपुर जवळ येण्यास सुरुवात झाली तेव्हा राजपद्धतीनुसार नोकरांनी आमच्या डब्याच्या खिडक्यांची दारं लाकडी पट्ट्यांनी बंद केली. चेहरा झाकून घेण्याविषयी जय यांनी मला अतिशय सौम्यपणे सुचविलं. आमचा डबा मुख्य गाडीपासून अलग झाला आणि वेगळ्या रुळावरून एका भव्य इमारतीत नेला गेला. ही इमारत जयपूरच्या कोरीव पाषाणाची बनलेली होती. नाव होतं विमान भवन. मुख्य सोहळा येथे होणार होता.
या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येतं, की भारतीय संस्थानिकांचं रेल्वेवर नितांत प्रेम होतं. त्यांनी रेल्वेची शान जागतिक स्तरावर नेली.
Leave a Reply