पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेता भारतीय रेल्वेनं हरितक्रांती योजना विविध स्तरावर अमलात आणण्यास सुरुवात केलेली आहे.
भारतातील हरितक्रांतीचं प्रतीक असलेलं पहिलं स्टेशन मानवळ हे जम्मू-उधमपूर मार्गावरील आहे. या स्टेशनला विद्युत प्रवाह वारंवार खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असे. आता स्टेशनवरचे सर्व दिवे, सिग्नल्स, सौर ऊर्जेवर चालतात. असा विद्युत पुरवठा आपत्कालीन वेळेकरता तयार ठेवला जातो.
ऊर्जा व्यवस्थापन कंपनी (एनर्जी मॅनेजमेंट कंपनी) असा वेगळा कक्ष रेल्वेत स्थापन केलेला आहे. त्यांच्यामार्फत व्यापक योजना आखली गेलेली असून, २०० रेल्वे स्टेशनांवरील दिवे, २६ रेल्वे स्टेशनांच्या इमारतींचे दिवे, गच्चीवरचे जाहिरातीचे फलक, २००० लेव्हल क्रॉसिंग्ज सौर ऊर्जेवर चालणार आहेत.
कोळशांवर चालणारी धुराची इंजिनं इतिहासजमा झालेली आहेत. रेल्वे-मार्गांच्या विद्युतीकरणाला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. जलऊर्जेबरोबर रेल्वे स्वत:ची सौरऊर्जाकेंद्रं व पवनचक्क्यांवर चालणारी विद्युतकेंद्रं बांधणार आहे.
मोठ्या प्रमाणात नवीन पद्धतीची विद्युत व बायोडिझेल इंजिनं बनविण्यात येत आहेत. यामुळे एरवी हवेचं प्रदूषण कमी होणार असून, इंधन बचत झाल्याने खर्चाचा बोजा कमी होणार आहे. चित्तरंजन कारखान्यातून अशी नवीन इंजिनं WAP7 तयार करून ती नागपूर-इटारसी मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना जोडली जातात. या चढणीच्या मार्गावर पूर्वी गाडीच्या मागील बाजूनं दुसरं इंजिन (बॅकर) लावावं लागत असे, आता नवीन इंजिनामुळे त्याची गरज भासत नाही. यामुळे प्रत्येक गाडीमागे ७०० युनिट्स विद्युत बचत होते. २०१४ सालापासून WAP5, WAP7, WAG9 या पद्धतीची ३०० इंजिनं विविध मार्गांवरील मेल, एक्सप्रेस गाड्यांना लावली जाणार आहेत, ज्यामुळे वर्षाला १०० दशलक्ष युनिट्स विजेची बचत होणार आहे व त्यामुळे हवेत मिसळल्या जाणाऱ्या कार्बनचं प्रमाण १०५ टन इतकं कमी होणार आहे.
मल्टिगेन सेट पद्धतीची नवीन डिझेल इंजिनं वापरण्याने प्रत्येक वर्षी, प्रत्येक इंजिनमागे ३२ लाख रुपयांच्या डिझेलची बचत होणार आहे.
सौरऊर्जेवर संपूर्ण सिग्नल्स यंत्रणा, यु.आर.एस. आणि पी.आर.एस. सेंटर, स्वयंचलित तिकिटांची मशिन्स, स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये गरम पाण्याची सोय अशा विविध गोष्टी चालणार आहेत.
अनेक रेल्वे-कॉलन्यांत कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लाईट्स लावण्यात आलेले असून, काही ठिकाणी त्याचबरोबरीने सौरऊर्जेचा वापर अशा दुहेरी उपाययोजना केलेल्या आहेत.
‘रेल्वेकरता सौरऊर्जेवर चालणारे वातानुकूलित डबे बनवण्याचं तंत्रज्ञान आय. आय. टी. मद्रास पुरविणार आहे. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित गाड्यांना पॉवर जनरेटर व्हॅनचा डबा असतो. तिथे डिझेलपासून ऊर्जा बनविली जाते. त्यामुळे संपूर्ण गाडीचं वातानुकूलन होत असतं, पण मेल एक्सप्रेस गाड्यांना २ ते ६ डबे वातानुकूलित असतात. त्यांना डब्याच्या खाली बसवलेल्या बॅटऱ्यांपासून ऊर्जा मिळत असते. जसजसा गाडीचा वेग वाढतो, तसतशा बॅटऱ्या चार्ज होत जातात, आणि डबा थंड होतो; पण या सर्व गोष्टींमुळे गाडीचं वजन वाढतं. त्यामुळे इंजिनाला जास्त ऊर्जा लागते. सौरऊर्जेचा उपयोग झाल्यावर सर्व बाजूंनी ऊर्जेची बचत होणार आहे. चेन्नई-बंगलोर अशी एक प्रवासी गाडी अशा ऊर्जेवर धावत आहे. यात अजून १०० टक्के यश आलेलं नाही. वातानुकूलनाकरता निराळे गॅस वापरले जात आहेत.
कलका-सिमला हेरिटेज गाडी व पठाणकोट-जोगिंदरनगर गाडी यांच्या सर्व डब्यांचे दिवे सौरऊर्जेवर चालतात. जयपूर व आग्रा विभागात हरितक्रांतीचा पट्टा तयार होत आहे.
जंगलसंपत्तीसंवर्धन हा हरितक्रांतीचा महत्त्वाचा पैलू आहे. रेल्वे रुळांच्या मध्यात बसविण्यात येणारे स्लीपर्स पूर्वी लाकडी असत, ज्याकरता हजारो वृक्ष कापावे लागत. आता लाकडी स्लीपर्स पूर्णपणे बाद झालेले असून, त्या ऐवजी एच.डी.पी.ई. पॉलिमरमॅट्रिक्सपासून स्लीपर्स बनविले जातात. जंगलं वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर ७६ लाख नवीन वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
तसंच, बायो टॉयलेट्सदेखील बनवली जात आहेत.
पर्यावरण बिघडविण्यात लॉय, बसेस, मोटारी, ऑटोरिक्षा यांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर रेल्वेमुळे सर्वांत कमी प्रमाणात प्रदूषण होत असतं. त्यात भारतीय रेल्वेनं उचललेलं हरितक्रांतीचं पाऊल लाखमोलाचं आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply