स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेयंत्रणा जवळजवळ संपूर्णपणे ब्रिटिशांकडून आयात होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती. चित्तरंजन लोको वर्क्स हा कारखाना हे स्वातंत्र्यानंतरचं प्रगतीचं पहिलं पाऊल होतं. प्रथम धुराची इंजिनं बनवणाऱ्या या कारखान्यात आता वर्षाला १५० ते १७० इलेक्ट्रिक इंजिनं बनविली जातात. आता फक्त २५ टक्क्यांहून कमी सामग्री परदेशी बनावटीची वापरली जाते.
डिझेल इंजिनं बनविण्याचा कारखाना वाराणसी येथे अमेरिकेच्या मदतीने सुरू झाला आहे. या इंजिनाचं नूतनीकरण करून २६०० हॉर्स पॉवर पासून ३१०० हॉर्स पॉवरपर्यंत वाढविण्याची यंत्रणा पतियाळा (पंजाब) येथे आहे. पेरांबूर कोच फॅक्टरीतून प्रवासी गाड्यांचे सर्व तऱ्हेचे डबे बनविले जातात.
कलकत्त्याजवळील जेसप व कपूरथाळा (पंजाब) येथे लोकलचे डबे व इतर डबे तयार होतात. मालवाहतुकीचे डबे स्वत:च्या व काही सार्वजनिक कारखान्यांत बनविले जातात. बंगळूर येथे गाड्यांची चाकं, तर पोडनूर (दक्षिण रेल्वे), गोरखपूर (उत्तरपूर्व रेल्वे), भायखळा (मुंबई), येथे सिग्नल पॉईट्सची निर्मिती होते. याखेरीज रेल्वे तिकिटं, फॉर्म्स व छपाईच्या इतर अनेक कामांसाठी ११ कारखाने आहेत.
रेल्वेतील सुरक्षेसाठी पोलीस, तर भ्रष्टाचाऱ्यांना आळा बसवण्यासाठी स्पेशल व्हिजिलंट फोर्स, असे इतर अनेक विभाग कार्यरत आहेत. अंदाजे १४ ते १५ लाख रेल्वे-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १२५ हॉस्पिटल्स व ५८६ दवाखाने असून, यांखेरीज १५० खाजगी रुग्णालयांतून अद्ययावत उपचार घेण्याची सोय करण्यात आली आहे.
जगातील इराण, इराक, मलेशिया, सिंगापूर, अशा काही देशांत रेल्वे बांधण्याचं काम आता भारतीय रेल्वे करीत आहे. त्यात कोकण रेल्वे ऑथॉरिटीचा सिंहाचा वाटा आहे, हे कौतुकास्पद आहे.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply