नवीन लेखन...

इंदिराजींचा राजकारणात प्रवेश

१९५५ सालातील गोष्ट. काँग्रेस अध्यक्ष यू. एन. ढेबर आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नेहरूंबरोबर काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर काही सदस्यांची नेमणूक व्हावी यासाठी चर्चा केली. असा विचार होता की, हे सदस्य तरुण असावेत व ते पक्षकार्यासाठी उपयुक्त असावेत. डझनभर नावे विचारार्थ आली होती. त्यात इंदिराचे एक नाव होते. शास्त्रीजी व ढेबर यांनी इंदिरेला विनंती केली, की तिने युवकांचे व महिला विभागाचे नेतृत्व करावे.


कॉमनवेल्थ राष्ट्रांच्या शासकीय प्रमुखांच्या बैठकीला इंदिरा १९४८च्या ऑक्टोबर महिन्यात गेली होती.

पं. नेहरूंबरोबर लंडन येथे बैठकीला ती हजर राहिली. जेव्हा जवाहरलाल व इंदिरा, सर विन्स्टन चर्चिल यांना भेटली तेव्हा नेहरूंनी चर्चिलविषयी आदरभावना व्यक्त केली. नेहरूंच्या मनात त्यांच्याविषयी पूर्वग्रह नव्हता. चर्चिलना आश्चर्य वाटले. कारण त्यांनी प्रदीर्घ काळ भारताच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता.

चर्चिल नेहरूंना म्हणाले, ‘आपण प्रदीर्घ काळ एकमेकांचा द्वेष करीत होतो, तर आता आपण एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने बोलत आहोत, हे विचित्र आहे नाही?’

‘सर विन्स्टन चर्चिल, आम्ही तुमचा व्यक्तीगत द्वेष कधीच केला नाही.’ इंदिरा तात्काळ म्हणाली.

‘होय, पण मी द्वेष केला.’ चर्चिल यांनी कबुली दिली.

लंडनवरून पंडितजी व इंदिरा पॅरिसला गेले. तिथे पंडितजींना संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या विदेशी धोरणावर आयोजित केलेल्या खास अधिवेशनात ३ नोव्हेंबर १९४८ रोजी बोलायचे होते. त्यांचे हे भाषण ऐतिहासिक ठरले. नेहरूंनी भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला दिशा दिली. या अधिवेशनात त्यांनी अलिप्ततावादाची तत्त्वे सांगितली. जमलेल्या सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींना नेहरूंनी आवाहन केले की ‘आशियाच्या राजकीय स्वातंत्र्याच्या अस्मितेची नोंद घ्या. सामाजिक कल्याण, मानवी प्रतिष्ठा आणि शांततेच्या वातावरणाला प्राधान्य द्या.’

ऑक्टोबर १९४९ मध्ये इंदिरा आपल्या वडिलांबरोबर प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी पंडितजींना आमंत्रित केले होते. तिथल्या सर्वच सरकारी कार्यक्रमांना इंदिरा हजर राहिली नाही. न्यूयॉर्कमध्ये ती नाटक पाहायला गेली. अमेरिकेचा हा पहिला दौरा मात्र निराश करणारा होता. भारताची अन्नासाठीची मदत अमेरिकेने अनेक महिने रोखून धरली होती. साम्यवादाच्या विरोधात जे युद्ध अमेरिकेने पुकारले आहे, त्या युद्धासंदर्भात दिल्लीचे व त्यांचे संबंध चांगले नाहीत, असे राजधानीत बोलले जात होते. नेहरूंवर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव आहे, असे अमेरिकन नेत्यांचे मत होते. ब्रिटिशांनी भांडवलशाहीचा सखोल परिणाम नेहरूंवर केला होता. ही भांडवलशाही संशयास्पद होती. जगाचे नेतृत्व करणाऱ्या अज्ञानी समाजाविषयी त्यांच्या मनात स्वाभाविक विरोध होता. या दौऱ्याचा ठसा इंदिरेच्या मनावर कायम होता. वॉशिंग्टनला ती पंतप्रधान होण्याआधी नऊ वेळा गेली, परंतु तिला त्या ठिकाणी उबदार वाटले नाही.

१९५५ सालातील गोष्ट. काँग्रेस अध्यक्ष यू. एन. ढेबर आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नेहरूंबरोबर काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर काही सदस्यांची नेमणूक व्हावी यासाठी चर्चा केली. असा विचार होता की, हे सदस्य तरुण असावेत व ते पक्षकार्यासाठी उपयुक्त असावेत. डझनभर नावे विचारार्थ आली होती. त्यात इंदिराचे एक नाव होते. शास्त्रीजी व ढेबर यांनी इंदिरेला विनंती केली, की तिने युवकांचे व महिला विभागाचे नेतृत्व करावे. परंतु इंदिरा त्यावेळी बालसहयोग कार्यक्रमात व्यस्त होती. कॅनॉट प्लेस भागात भर उन्हात व पावसाळ्यात लहान मुले दयनीय अवस्थेत बसून काम करत. त्यांना तशा अवस्थेत पाहून तिचे मन द्रवले. तिने त्यांच्यासाठी एक आश्रयस्थान बनविले. ती त्या ठिकाणी प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी जात असे. मुलांकडून राखी बांधवून घेत असे. यातली अनेक मुले अनाथ होती. त्यांच्या राहण्याची सोय तिने केली. या कामाबरोबर ती बालकल्याणाच्या कार्यातही भाग घेत होती. त्यामुळे आता तिने दुसरे काही काम करावे अशी परिस्थिती नव्हती. तिला आपल्या वडिलांच्या घराचा संपूर्ण कारभार सांभाळायचा होता. आपल्या मुलांकडेही पाहायचे होते. तरीही शास्त्रीजी व ढेबर यांनी मिनतवारी करून तिला पक्षकार्यासाठी राजी केले.

यू. एन. ढेबर यांनी चार वर्षे काँग्रेस अध्यक्षांचे पद भूषविले होते. आता आपल्याला मुक्त करावे अशी त्यांनी विनंती केली. त्यांनी तसे नेहरूंना सांगितले. शास्त्रीजींनी इंदिराला विनंती केली. इंदिराने पदग्रहण केले. निवृत्त अध्यक्ष काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य म्हणून राहिले. त्यांच्याकडे पंचवार्षिक योजनेच्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे आले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी सामाजिक व आर्थिक बाबींसाठीची माहिती व आकडेवारी त्यांना गोळा करायची होती. लाल बहादूर आजारी पडल्यामुळे ढेबर यांच्याकडे केरळ येथील निवडणुकाही सोपविल्या गेल्या. या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे ढेबर यांना इंदिरा यांच्याबरोबर काम करण्याची संधी प्राप्त झाली.

इंदिराने पदभार सांभाळला. पद ग्रहण करताच त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयाचा कायापालट केला. समितीच्या वेगवेगळ्या विभागांना पुनर्स्थापित केले. फर्निचर बदलले. कार्यालयासमोरील बाग व मैदानातील हिरवळ, फुलबाग व्यवस्थित केली. समितीचे अधिकारी व कार्यकर्त्यांच्या सुखसोयींमध्ये वाढ केली. ती जेव्हा दौऱ्यावर जात नसे. तेव्हा ऑफिसात नियमितपणे येत असे. वेगवेगळ्या विभागांच्या अध्यक्षांकडून अहवाल मागवत असे. तिने युवक व महिला विभागाला नवे स्वरूप दिले.

पंडित नेहरूंना जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे सरकार चालवायचे होते. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय संघटनेचे कार्य इंदिराला करायचे होते. नेहरूंनी मांडलेल्या धोरणांना सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचे होते. काँग्रेस संघटनेला अधिकाधिक व्यापक दिशा द्यायची होती. नवनव्या विचारांचे आदानप्रदान करायचे होते. आपण निर्माण केलेल्या धोरणांना पाठिंबा मिळवणे महत्त्वाचे होते. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालत असे. प्रदीर्घ विचारविमर्शानंतर तीन वर्षांनी १९३१ सालात काँग्रेस पक्षाने औद्योगिक धोरणाविषयी ठराव पास केला. हे धोरण स्वीकारू नये म्हणून काँग्रेसमधल्या समाजवादी गटाने विरोध केला होता. परंतु देश स्वतंत्र झाल्यावर त्याविषयी अधिकृत निर्णय द्यावा, अशी भूमिका मांडली गेली. पक्षाची धोरणे ठरविताना लोकशाही समाजवाद ही विचारधारा घेऊन देशाला दिशा द्यावी असा विचार आला. तदनंतर काही ठोस कार्यक्रम हाती घ्यावेत व त्याची परिपूर्ती करावी या भूमिकेतून आवडी येथील काँग्रेसमध्ये दहा कलमी कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला. उटी येथे सक्रीय समाजवादी कार्यक्रमाला मूर्त स्वरूप दिले गेले.

इंदिराने पदभार हाती घेतल्यावर तिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. सर्वप्रथम राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानुसार ज्या समस्या समोर होत्या, त्यांचे योग्य समाधान शोधणे हे महत्त्वाचे कार्य होते. मुंबई राज्याची समस्या होती. गुजराती लोकांना मुंबई हवी होती. तर महाराष्ट्रातील जन-तेने मुंबईसह बेळगाव, कारवार व इतर मराठी भाषिकांसाठी संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. गुजरात बांधवांचे महागुजरातचे आंदोलन सुरू होते. चर्चा आणि वाटाघाटीनंतर महाद्विभाषिक राज्याचा प्रस्ताव आला. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण धर्मसंकटात सापडले होते. त्यांना द्विभाषिकाचे राज्य चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मुंबई राज्यात अशांतता होती. मुंबई राज्याच्या दौऱ्यावर असलेले तत्कालीन राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांचे असे म्हणत होते की, जोवर मुंबई राज्यात शांतता होत नाही, तोवर राज्याचे विभाजन करू नये. मोरारजीभाईंना मुंबई गुजरातेत हवी होती. ते पुनर्गठणाच्या कार्याला विरोध करत होते. अशा वेळी हा प्रश्न इंदिराने हातात घेतला. त्या मुंबई राज्याच्या दौऱ्यावर आल्या. त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्याबरोबर राज्याचा दौरा केला. मराठी जनतेच्या भावना जाणून घेतल्या.

इंदिराने परंतु ठोस असा निर्णय दिला नाही.

-श्याम फरांदे, पुणे.
अमृत मासिकातून साभार 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..