जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा… ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी…
पैलं म्हणजे इंदौरी पोहे… कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले…
नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल कचौरी आणि एक आलू कचौरी खावी आणि तिथंच भल्यामोठ्या लोखंडी कढईत असं झक्कासपैकी ऊकळत असलेले, वरुन असं लालबुंद केशर तरंगत असलेले, बदाम, पिस्ते, काजू भरपूर असलेले, चार चमचे दाट केशरी साय ग्लासात वरुन पांघरलेले केसरिया दूध ग्लासभर प्यावे…
जोशींचा हवेत फेकून परत झेललेल्या दहिवड्याला मोक्ष द्यावा…
हे जोशी, एकाच हाताच्या प्रत्येक बोटाची चिमूट करुन त्या पाच चिमूटीत पाच प्रकारचे मसाले पकडून… एकेक करत दह्यावर सोडतात आणि अशी मस्त नक्षी बनवतात… (जसं सीसीडी मधे कॉफीवर नक्षी बनवतात ना तसं)… जोशी दह्यावर मसाला सोडताना बघून आपण असं स्वतःला विसरुन जातो की बास्स यार… विचारायचंच नाही… फक्त तिथं ऊभं राहून तो अनुभव घ्यायचा…
गराडू खावं…
खुसखुशीत तळून लाल रंगाच्या साखरेच्या पाकातून निथळून काढलेली जिलेबी खावी…
ती निथळणारी जिलेबी बघितली की आठवतंय बघ… न्हाऊनिया ऊभी मी….
नंतर दहा स्वादांची पाणीपुरी खावी… रेग्युलर, शाही रेग्युलर, पुदिना, जिरा, प्याज, लसणी… वगैरे वगैरे दहा टेस्ट्स आणी सगळं झाल्यावर दोन गोड मसाला पुरी… नांकावरुन येणारा घामाचा थेंब सावरत सावरत… सुर्र सुर्र करत ते उरलेले पाणी पिऊन घ्यावे…
नंतर पुढं यावं आणि भुट्टे का कीस… कीस म्हणजे अक्षरशः किसचा अनुभव देणारा हा कीस ! दिसायलाच एवढा आकर्षक तर मग चवीला तर अतिशय भन्नाट !
जरा अजून इच्छा असेल तर फरियाली साबुदाणा खिचडी… एकदम खल्लास…
जरा पुढं आलं की नेमा आईस्क्रिम… फक्त केशर मलई पिस्ता कुल्फी खायची आणि तोपर्यंत फालुदा बनवायाला सांगायचा… कुल्फी संपवायची आणि फालुद्याला सामोरं घ्यायचं… अतिशय मन लावून, अंतर्मन शांत करत करत हळूवारपणे फालुद्याचा एकेक घास नमामि फालूदा म्हणत स्वअर्पण करायचा…
हे सगळं झाल्यावर तृप्त होतंय सगळं… विलक्षण समाधान येतंय चेहेऱ्यावर… या संपूर्ण साधनेचं तेज चढतेय सर्वांगावर… आपोआपच समोरची वाट स्पष्ट होते… अंतिम विश्रांतीचं ठिकाण स्पष्ट दिसायला लागतं…
बाहेर यायचं तिथून… गाडीत बसायचं आणि चालकाला गाडी हायकोर्ट समोरच्या पार्श्वनाथ पान सदनकडे घ्यायला सांगायची…
दादा तिथे बसलेले असतातच…
कड्डक असं कलकत्ता प्युअर १२०/३००, प्युअर नवरतन किवाम आणि चटणी, थोडीशी खूश्बू, एकदम बारीक सुप्पारी (भाजलेली) एकच चिमूट, दोन वेलदोडे आणि लवंग त्यात उभी करुन जाळून… लवंग जळतानाच पानाची अलगद् घडी करुन घ्यायचे आणि त्याला आपल्या तोंडात डावीकडे सिंहासनावर विराजमान करायचे… तीनेक मिनीटे तिथंच थांबायचे… घोळवायचं असं गारशार तोंडात… आजिबात चावायचं नाही, गिळायचं नाही, इकडून तिकडे तोंडात फिरवायचं निही… घेतला वसा टाकायचा नाही… ऊतायचं नाही… मातायचं नाही… शांत बसायचं… आपोआप ब्रह्मानंदाशी आपला परिचय होतो… दाट ओळख होते… समाधिस्थ हलकेपणा येतो आपल्याला कवटाळून घेतो…
हलकेच गाडीत येऊन बसायचं…
सारथ्याला खूण करायची…
गाडी मुक्कामाच्या दिशेने निघालेली असते… आपण आपलं अन्नदाता सुखी भव म्हणत ब्रह्मानंद समाधीत भान विसरलेलो असतो…
अशी आहे इंदौरी खाऊ गल्ली
आणि
इंदौरी मेहमान नवाजी़…
खरंखुरं अतिथी देवो भव हे तत्त्व जपणारं इंदौर …!!!
आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला प्रेम करायला लावणारी…
उमेश कुलकर्णी.
Leave a Reply