एका मोठ्या कार्यक्रमाची जुळवाजुळव दोन महिने आधीच सुरू झाली होती. माझा जवळचा मित्र महेश वर्दे ‘इंद्रधनू’ या संस्थेचा अध्यक्ष होता. इंद्रधनूचा वार्षिक कार्यक्रम भव्य स्वरूपात एका मोठ्या ग्राऊंडमध्ये आयोजित करण्याचा त्यांचा विचार चालू होता. राजकपूर आणि व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील गाणी असा मोठा विषय त्यांनी निवडला होता. सुप्रसिद्ध संगीत संयोजक अप्पा वढावकर संगीत संचालन करणार होते. तर भाऊ मराठे आणि मंगला खाडिलकर असे महाराष्ट्रातले दोन मातब्बर निवेदक सूत्रसंचालन करणार होते. माझ्याबरोबर माधुरी करमरकर, अजित परब, सुचित्रा भागवत, गौरी कवी, उमेश वाजपेयी असे अनेक प्रसिद्ध कलाकार गाणार होते. कार्यक्रम पाच तासांचा होता. महेश अतिशय मनापासून आणि काळजीपूर्वक कार्यक्रमाची आखणी करत होता. कार्यक्रम संध्याकाळचा असल्याने ग्रँड रिहल्सल त्याच दिवशी सकाळी घेण्याचे त्याने ठरवले. महेश आणि मी जवळचे मित्र असल्याने
या कार्यक्रमात गाण्यासाठी माझे मानधन या विषयावर आम्ही बोललोच नव्हतो आणि त्याची काही गरजही नव्हती. रिहल्सलच्या मध्यंतरात महेशचा मुलगा रिशू सर्वांना ताजे मावा केक्स वाटत होता. केक्स फारच छान होते म्हणून मी अजून एक केक उचलला. रिशू लहान होता. तो म्हणाला,
“बाबांनी प्रत्येकाला एकच केक द्यायला सांगितला आहे, काका.
मी रिशूला सांगितले, “बाबांना माझा निरोप सांग की अनिरुद्ध काकाने एक जास्त केक घेतला आहे. त्याचे पैसे त्याच्या मानधनातून कापून घ्या.”
रिशूने आज्ञाधारकपणे माझा निरोप महेशला सांगितला. पण महेश कसला वस्ताद ! तो काय हे ऐकून घेणार की काय? त्याने मला रिशूकडून उलट निरोप पाठवला.
“बाबा म्हणाले, अनिरुद्ध काकाला सांग की एका मावा केकचे पैसे तुझ्या मानधनातून कापून घेतल्यावर तुला देण्यासाठी काही पैसे उरणारच नाहीत. उलट तुलाच काही पैसे द्यावे लागतील.”
अजित परब आणि माधुरी करमरकर हे ऐकून आवाक्च झाले. “हे काय चालले आहे?” त्यांनी विचारले.
“काही नाही रे! रिहल्सलचा ताण कमी करण्यासाठी आम्ही गंमत करतोय.” मी उत्तरलो. अर्थात् अशी गंमत करण्यासाठी, आमची किती जवळची मैत्री आहे हे मी त्यांना कसं सांगणार? असे असंख्य जवळचे मित्र मला मिळाले आणि त्या सर्वांनी माझे आयुष्य समृद्ध आणि आनंदी केले. राज कपूर आणि व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील बहतेक गाणी लोकप्रिय असल्यामुळे या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. ३० डिसेंबर २००५ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा मानाचा पुरस्कार मला मिळाल्यामुळे एक स्मृतीचिन्ह देऊन या कार्यक्रमात इंद्रधनुतर्फे माझा सत्कार करण्यात आला. एकूण २००५ हे वर्ष मला बरेच काही देऊन गेले.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply