ऊसाची कांडे चरख्यात घालून रस काढताना त्यात आले आणि लिंबू घालतात. रसातील कफ दोष जाण्यासाठी आले आणि चव येण्यासाठी लिंबू. रस काढत असतानाच हे आल्या लिंबाचे तुकडे त्या चरख्यात घातले जातात. पिळ पिळ पिळल्यानंतर त्यातील रस एका ठिकाणी जमा होतो आणि चोथाचिपाड दुसऱ्या ठिकाणी. एक भाग चांगला एक वाईट. सार आणि किट्ट.
तसेच अन्नरस तयार झाला की, त्यातून दोन घटक बनवले जातात. एक चांगला सार भाग दुसरा टाकावू किट्ट भाग. सार भागापासून सात धातुंची निर्मिती केली जाते. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे ते सात धातु. (धातु म्हणजे धातु, मेटल नव्हे.) आणि किट्ट भागापासून मल, मूत्र आणि स्वेद निर्माण होतात. या निर्माण कार्यात सात धातुंचे सात अग्नि, पंचमहाभूतांचे पाच अग्नि आणि मुख्य जाठराग्नि असे एकुण तेरा प्रकारचे अग्नि भाग घेतात. सार भागापासून उत्तम धातु निर्माण कसे केले जाते याचे वर्णन गेल्या वर्षीच्या आरोग्यटीपेमधील अन्नपचन या मालिकेमधे केलेले आहे.
टाकावू भाग जर योग्य वेळी, योग्य मार्गाने शरीराबाहेर टाकला गेला नाही, तर चांगला सार भाग कितीही उत्तम रीत्या तयार झालेला असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जसे उसाचा रस काढला जात असताना त्यातील कचरा रसात येऊ नये म्हणून रस दोन वेळा गाळून कचरा वेगळा केला जातो. ऊसाच्या रसापासून गुळ करताना देखील वारंवार त्यातील मळी वेगळी केली जाते, तरच उत्तम प्रतीचा गुळ तयार होतो. म्हणजे कचरा साफ करणारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.
तसेच अन्नरसातील कचरा, विषारी पदार्थ वेगळे करणारी यंत्रणादेखील शरीरात काम करत असते. यामधे यकृत, वृक्क हे प्रमुख अवयव आहेत. अन्नरसाचे रूपांतर शुक्रापर्यत करीत असताना वेळोवेळी त्यातील टाकावू भाग वेगळा केला जातो. योग्य त्या मलमार्गामधे ( वेशीवर ) आणून ठेवला जातो. घन भाग गुदमार्गाने, आणि द्रव भाग मूत्र आणि स्वेद (म्हणजे घाम ) मार्गाने बाहेर काढला जातो. हिवाळा पावसाळ्यात ऋतु बदलला की, लघवी जास्ती होते आणि उन्हाळ्यात घाम जास्ती येतो. हे बाहेरील ऋतु ओळखून तसे बदल आतमधे करवणारा तो सिंपली ग्रेट !
गावातील गटारे, कचऱ्याच्या कुंड्या, रस्त्यावरील घाण, जर योग्य वेळेला साफ केले गेले नाहीत, तर केव्हाही, साथीचे आजार वेशीवर, घुसखोरीच्या संधीची वाट बघत बसलेलेच असतात. म्हणून ही स्वच्छ भारत यंत्रणा पुनः एकदा नीट लक्ष देऊन कार्यरत करण्यासाठी आपण सगळे झटत आहोत.
जसे देशासाठी, तसेच देहासाठी सुद्धा जागरूक राहीले पाहिजे. जर देशातील आणि देहातील हा कचरा योग्य वेळी, योग्य यंत्रणामार्फत, सदैव जागरूक राहून, देहाबाहेर बाहेर काढला गेला नाही, तर वेशीवरचे राक्षस आत आलेच म्हणून समजा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.03.2017
Leave a Reply