अंडर प्रेशर कारनामे
समजा तुम्हाला कुणी तुम्ही झोपलेल्या अवस्थेत घट्ट बांधून टाकले, तर तुम्हाला तुमची कामे करता येतील का ? हात पाय हलवता येतील ? उठता येईल का ?
तुम्ही उठण्याचा प्रयत्न जरूर कराल, पण तुम्हाला ते शक्य होणार नाही.
नाही ना. ?
तुम्हाला उठता येत नाही, म्हणजे खरोखरच तुम्हाला काही गंभीर आजार झालेला असतो का ? तुम्ही अधु अपंग झालात का ? तुम्हाला उठता येणारच नाही का ?
तसंही नाही.
जर तुम्हाला ज्याने बंधनात ठेवलं आहे, ते बंधन काढून टाकले, तर तुम्हाला सहज उठून बसता येईल. तुम्हाला तुमची नेहेमीची काम करता येतील !
बरोबर ना !
म्हणजे तुम्हाला तुमचं नेहेमीचे काम करण्यापासून कोणी अडवून धरले होते ?
त्या बंधनाने !
मला उठून बसण्यासाठी, हे बंधन तोडणे महत्त्वाचे.
या बंधनातून मुक्त झालो की, मी माझी कामं करायला मोकळा !
अगदी तस्संच पोटाच्या या गुहेत चाललेलं असतं.
काय काय दडलंय या पोटात. फार अजब आहे, ही त्याची यंत्रणा ! उजव्या बाजूला लिव्हर म्हणजे यकृत, किडनी , डाव्या बाजूला अग्न्याशय, स्वादुपिंड, किडनी, आमाशय, अगदी खाली मलाशय, मूत्राशय, गर्भाशय, बीजग्रंथी, पौरूष ग्रंथी, आणि सर्वात खाली असलेला पाठीचा कणा आणि या सर्वांच्या वर, गुंडाळून ठेवलेल्या रबरी पाईप प्रमाणे असलेले आतड्यांचे एक भले मोठे बंडल ! या सर्व आतड्यांना आवळून धरणारा आणखीन एक पडदा, (ज्याचा हल्लीच म्हणे शोध लागलाय,) ओमेंटम !
या आतड्यांच्या वळ्यांना आणि उरःप्रदेशातील ह्दय, फुफ्फुस यांना वेगळा करणारा एक पडदा, त्यामुळे हे सगळे अवयव कसे जागच्या जागी राहून काम करत असतात. नशीब यांना हात पाय नाहीत, नाहीतर एखादी किडनी म्हणाली असती,
” चला, आज मी शाॅपिंगला जाऊन येते”
यकृत म्हणालं असतं, “चला आज मी टुरवर जातोय. माझ्या ठिकाणी दुसरं कुणीतरी काम करेल”.
पण नाही, यातील एकही अवयव, असं स्वमनाने काहीच काम करत नाही. त्याने नेमून दिलेलं काम निमूटपणाने करीत राहायचं, केवळ आज्ञापालन करायचं, एवढंच त्यांना माहिती. “मीच का” असा प्रतिप्रश्न विचारायचा नाही.
शिष्य असावा तर असा ! पण गुरू कोण? तर साक्षात तो !
या अवयवांवर त्याचेही काही बंधन नसते, गरज पडेल तेव्हाच फक्त वर सल्ला मागायचा. नाहीतर आहे त्यात ‘अॅडजेस्ट’ करायचे ! त्याने अशी सवय जन्मापूर्वीपासूनच लावून पाठवलेली !
आता बऱ्याच वेळा आमच्या बाहेरून केलेल्या चुका, या अवयवांना एका घट्ट बंधनात ठेवतात. नको तेव्हा, नको ते खाणेपिणे, नको तेवढे जागरण करणे, नको नको तेवढे जीभेचे चोचले पुरवित रहाणे, जेव्हा तो सांगेल तेव्हा मल मूत्रविसर्जन न करणे, व्यायाम न करता पडून रहाणे, इ.इ.इ.इ. अनेक कारणांनी अपचन होत जाते, त्याची लक्षणे दिसू लागतात. तरी सुद्धा अशक्तपणा येईल म्हणून, कोणीतरी मोठ्या डाॅक्टरने सांगितले म्हणून, दर दोन चार तासांनी खात राहातो. पाणी ढोसत रहातो, आणि व्हायचे तेच होते. न पचलेल्या अन्नाचे रूपांतर चिकट वजनदार आमात होते, पोट जड वाटू लागते, टम्म फुगते, आतडी फुगतात. आत तयार होत असतो, तो गॅस गॅस आणि गॅस.!
या गॅसचा दाब, या गॅसचे बंधन, या आतड्यांच्या वळ्यांचे गॅसने फुगलेले बंडल, आणि काही वेळा वाढवलेल्या चरबीच्या टायरचे प्रचंड वजन या पोटातील बाकीच्या नाजूक साजूक अवयवांवर पडत रहाते. जन्मोजन्मीच्या सवयीमुळे हे अवयव आपले काम निमूटपणाने करत रहातात. वरचा दाब, वरून येणारा दाब सहन करीत रहातात. हे बंधन झुगारून द्यायची ताकद या छोट्या छोट्या अवयवांत असत नाही. या अवयवांना आपले काम पूर्ण क्षमतेने करता येत नाही. कारण वरून आलेले बंधन ! आणि या बंधनाचे कारण कुठेही बाहेरून दिसत नाही. अगदी सरकारी यंत्रणेप्रमाणे ! ?
तेरे मेरे बीच मे, कैसा है ये बंधन, अंजाऽनाऽऽ
मैंने नही जाना, तूने नही जाऽनाऽ
या अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.
अगदी तुम्हाला जसे आडव्या अवस्थेत बांधून घातलेले असते, तस्से त्यांचे होते…..(आता परत पहिल्यापासून वाचा.)
आणि आतून धडधाकट असूनही, त्या अवयवांना, त्याने नेमून दिलेले, आपले नैसर्गिक काम करताच येत नाही. …
अंडर प्रेशर काम करना, बहोत बुरा हाल होता है यार !
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.04.2017
Leave a Reply