कुणाच्या अंगावर कुणाचे ओझे
पोटामधील अवयव अत्यंत दाटीवाटीनी रहात असतात. जरा सुद्धा हलायला जागा नसते. एकाचा आधार दुसऱ्याला अश्या अवस्थेत, गाडी हलेल तशी हलत डुलत असतात.
लोकलमधे तीन सीटच्या बाकड्यावर बसलो असताना, चौथा येऊन म्हणतो, “थोडा आगे…” तेव्हा आपल्याला काय वाटते. बरं बसला तो बसला, परत पेंगायला लागतो, पेंगतो तो पेंगतो, आणि वर घोरायला लागतो, त्याच्या घरच्या जागरणाला आमचाच खांदा मिळतो. सहिष्णुता सहिष्णुता किती दाखवायची, त्याला पण काही हद्द असतेच ना !
खिडकीपर्यंत समोर पाय हलवायला जागा नाही एवढी चार माणसे उभी, बाजुला लेकुरवाळी बसलेली, मधल्या पॅसेजमधून दोन स्टेशन आधीपासूनच उतरणारी माणसे बॅगा पोटाला आवळून अगदी सज्ज असतातच. त्यात आपुल्याऽऽ खांद्यावर, कुणाचे हे ओझे कुऽणाऽचे ओऽऽझे.
एखादे वेळी त्यांच्या मांडीला गुदगुल्या करून, त्झुऽत्ऽझुत करून, त्याला उत्तिष्ठ जाग्रत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो. नंतर मात्र आपलेच स्थान सोडून, त्याचा भक्कम पाठींबा काढून घेण्याशिवाय पर्यायच नसतो.
अगदी तस्सं होत असेल या अवयवांचं !
त्यात वरून येणारा गॅसचा आणि अतिरिक्त चरबीचा दाब सहन करत करत आपले काम करीत रहायचे ? जरा कल्पना करून बघा. त्या यकृताच्या किडनीच्या स्वादुपिंडाच्या जागी स्वतःला बसवून बघून. हे अवयव थोडे दिवस, थोडे महिने बघून घेतात, काम करत रहातात आणि एक दिवस अचानक संपावर जातात. आतून घोषणा देत रहातात,
“आमच्या मागण्या मान्य करा, आमच्यावरील अतिरिक्त दाब काढून घ्या, आमच्या अंगावरचे ओझे दूर करा.”
सुरवाती सुरवातीला सहन करतात, नंतर मात्र
आपले लक्ष वेधून घेण्यासाठी वेदना निर्माण करणे हे प्रमुख शस्त्र बाहेर काढतात. आता मात्र आपल्याला लक्ष देणे भागच पडते. काही अवयवांचे तोंड तर एवढे आवळून घेतले जाते, की ओय् म्हणायला, आणि वेदना सांगायला सुद्धा चान्स नाही. त्या मुठीहून लहान आकाराचे स्वादुपिंड बिच्चारे चिरडून जाते. त्यातील इन्शुलीन बाहेर पडायला जागा तर हवी. वेदना पण सांगता येत नाहीत.
यकृताची तीच अवस्था, किडनी म्हणते, त्या मूत्राशयापासून भरत येऊन, ते दोन्ही युरेटर भरलेत, आता माझ्यापर्यंत परत बॅक वाॅटर येऊन भिडलंय, इतका वेग धारण होतंय, मी करू तरी काय ? फुगलेल्या किडनीचा दाब कुशी बरगड्यांवर, पोटातल्या आमाचा दाब अग्न्याशयावर, मलाशयाचा दाब गर्भाशयावर, बीजांडावर, किती सहन करायचं ना ?
या अवयवांचा एकमेकांना असलेला आधार हा आता त्रास वाटू लागतो. आणि पाठिंबा काढून घेण्याशिवाय पर्यायच रहात नाही. बंड करायचे तरी मुश्किल, बोललोच तर शिस्तभंगाची कारवाई, सुरवातीला प्रदेशाध्यक्षावर टीका करून पहायची, मुलुख मैदान तोफेने तोंड दाबून बुक्यांचा मार किती दिवस सहन करायचा ?
यालाच एक दिवस भुकंपाचे नाव मिळते. पण हा भुकंप कधीही अचानक होत नाही, छोटे मोठे धक्के देऊनही, वारंवार सांगूनही जर योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नाही, तर करायचे तरी काय ??
…. या अवयवांनी म्हणतोय मी. !
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.04.2017
Leave a Reply