स्नेह द्यावा, स्नेह ल्यावा,
स्नेह जीवीचा विसावा !
“जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे. तेल लावण्याएवढे आणखी दुसरे सोपे औषधच नाही. वाताच्या चिकित्सेतील पहिला शब्द आहे, स्नेह. स्नेह म्हणजे तेल.
वात / गॅस होऊ नये यासाठी महत्त्वाचे औषध म्हणजे तेल. बाह्य आणि आभ्यंतर. बाहेरून आणि आतून तेलाचा वापर करावा.
बाहेरून म्हणजे शरीर. शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. या त्वचेच्या माध्यमातून आपण आतमधे औषधी द्रव्य वा पोषण देऊ शकतो. पोट, बेंबी, कान, नाक, हात, पाय, डोळे, डोके या अवयवांच्या माध्यमातून तेल आत शोषले जाते. मेंदी लावली तर त्वचा रंगते की नाही ? हळद लावली तर पिवळेपणा दिसतो की नाही ? पाण्यात खूप वेळ काम झाले तर पाण्यात खूप खेळलो तर सर्दी होतेच ना ? त्वचा ही उत्तम शोषक आहे. जे वर लावले जाते, ते सर्व आत शोषले जाते.
आणि……. डायक्लोफेनॅक सारखी जेल त्वचेतून जिरतात की नाही ? तसेच तेल सुद्धा विशिष्ट पद्धतीने लावले तर ते आतपर्यंत पोचते, यात कोणतीही शंका, कोणीही घेण्याचे कारण नाही. (आता पटेल.)
बाहेरून म्हणजे मालीश साठी वापरणे. अभ्यंग. दिनचर्येमधे वर्णन आलेले आहे. नित्य नियमाने तेल मालीश करणे. आताच्या काळाचा विचार करून आपल्या सवडीनुसार केले तरी चालेल. मग रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर लगेच, आंघोळीच्या अगोदर, नंतर कसेही लावा, पण स्वतःचे तेल स्वतःच नियमितपणे लावा. कारण “तेल लावणाऱ्याची तब्येत सुधारते” असे म्हणतात. लावायचे म्हणजे रगडायचे, नुसते अत्तर लावल्यासारखे तेल लावले तर काऽऽही फरक पडणार नाही. तेल म्हणजे खोबरेल, तीळतेल शेंगतेल. आपण जिथे रहातो तिथल्या जमिनीमधून उपलब्ध होणारे तेल. (हे सविस्तर वर्णन गेल्या वर्षीच्या टीपांमधून आलेले आहे.)
आतून म्हणजे खाण्यासाठी तेलाचा वापर करणे . आणि पोटात घ्यायच्या तेलासाठी तोच नियम. आपल्या जवळ जमिनीमधून मिळणाऱ्या तेलबियांचे तेल वापरावे. कोकणात खोबरेल वर घाटावर तीळ तेल, शेंगतेल, योगीप्रदेश मे सरसोंका तेल. (युपीचं आता वाय पी झालंय ना ! )
तेल जेवताना मधे, भाकरीला वरून, चटणीमधे कालवून, औषध म्हणून, आहारीय पदार्थ म्हणून, काहीही करा, पण शरीराला तेल द्या. गाडीच्या चाकाला वंगण द्या. वंगण कमी पडले तर सांधे, स्नायु, कोरडे होतात. (नंतर बदलावे लागतात.) एवढेच काय ह्रदय सुद्धा कोरडे रूक्ष होऊन जाते.
ग्रंथामधे तर तेल वापरण्याच्या चौवीस पद्धती वर्णन केल्या आहेत. एवढे महत्व आहे या तेलाला !
आणि हो, कच्चे तेल खाण्यामुळे, ते कोलेस्टेरॉल वगैरे काही वाढत नाही. वैद्यकीय अंधश्रद्धा आहे ती ! स्नेह म्हणजे जसे तेल, तसे स्नेह म्हणजे प्रेम देखील.
स्नेह बाह्यतः जिरवावा,
स्नेह अंतरी पोचवावा ।
स्नेह ह्रदयी उरवावा
ह्रदयापासून ।।
तेल लावणे हा शुद्ध गावंढळपणा आहे, असे म्हणणारे काही भारतीय महाभाग, लहानाचे मोठे होताना अंगाला तेल लावून आणि डोळ्यात काजळ घालूनच मोठे झालेले आहेत, हे लक्षात ठेवावे. काही आयुर्वेदीय पदवीधरांना देखील असे वाटते, याचे दुःख फार मोठे !
पण जे योग्य आहे, ते पुनः प्रस्थापित करण्यात चुक ती कसली ? आणि आपण लाज तरी का बाळगावी ?
खरे बोलणे का सोडावे ?
वाटूनी जनात लाज,
‘जाण’ असूनी, ‘सोने’ टाकूनी
कशास धरसी ‘काच’ ?
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.04.2017
Leave a Reply