आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला “समाधान” म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर “माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही” अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात.
खाताना लक्ष अन्य गोष्टीमधे असणे, म्हणजे जसे, टीव्ही पहाणे, मोबाईलवर बोलणे किंवा चॅटींग, गोष्टीचे पुस्तक वाचणे, अभ्यास करत करत जेवणे, वृत्तपत्र वाचणे, वायफळ गप्पागोष्टी करणे, पटत नसलेल्या मुद्द्यांवर जेवताना भांडणे, लक्ष जेवणामधे नसणे, स्वतःच्याच विचारात असणे, किंवा दुसऱ्यांच्या विचारात असणे, लक्ष जेवणात असले तरी जेवणातले दोष दिसणे, आवडीचे पदार्थ अति खाणे, नको असतील त्यांची चव सुद्धा न पहाणे, एकाच पद्धतीचे, एकाच चवीचे जेवण घेणे इ. दोष आहेत, आणि रुग्णाला तपासल्यानंतर अनेक शारीरिक दोष देखील वैद्यांना समजतात. ज्यांचा संबंध खाल्लेले अन्न, अंगाला न लागण्याशी आहे. हे बालक पालकांनी लक्षात ठेवावे. याला म्हणतात, इंद्रियगम्य ज्ञान !
मग कितीही बॅलन्स डाएट द्या, काहीही उपयोग होत नाही.
बदाम अक्रोड हे पदार्थ पचायला जड असतात. ते अशा मुलांनाच द्यावेत, ज्यांना नारळ, शेंगदाणे, तीळ, काजूगर कधी मिळतच नाहीत. आणि ज्यांची भूक खूप जास्ती आहे. नाहीतर हेच पदार्थ पौष्टिक म्हणून कितीही खाल्ले तरी अजीर्ण होण्याशिवाय काही होणार नाही.
काय खातोय यापेक्षा कसं पचवू शकतोय हे जास्त महत्त्वाचे! मनापासून खाल्लं, आनंद निर्माण करत खाल्लं तरच पचते. रडत रडत, ताटातल्या अन्नाला नावे ठेवत, नाक मुरडत, चिडत चिडत, जेवलो तर आतील अवयव आणि इंद्रिये यांचे संतुलन बिघडते.
बाहेरील परिस्थिती जर बिघडलेली असेल तर आत कितीही भूक असेल तरी जेवण जात नाही. भले साग्रसंगीत पंचपक्वान्नाचे ताट समोर आहे, पण बाजूच्याच घरात एका कोणाचा मृत्यु झालाय तर जेवण जाईल ? घरात भांडण सुरू आहे तर जेवण जाईल ? काही रागाने भरलेलं ताट कोणी भिरकावून दिलं तर जेवण जाईल ?
आणि जबरदस्ती करून जेवलात तर ते नीट पचेल असे वाटतेय ?
नुसते अन्न गिळले म्हणजे सर्व धातु तयार होतात असे नाही. म्हणून पालक आणि बीट खाल्ला म्हणजे रक्त वाढेलच असं नाही आणि आवळाज्युस प्याला तर कॅल्शियम वाढेल असंही नाही.
बाहेरील शक्तीपेक्षा, आतली इंद्रियांची ताकद जास्ती काम करणारी असते, हे लक्षात घ्यावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.03.2017
Leave a Reply