आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.
बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, “नीट चावून चावून गिळा.” यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.
हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.
प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.
किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.03.2017
Leave a Reply