नलिका बालक (टेस्टूब बेबी) इनव्हिट्रो फरटिलायझेशन ॲण्ड एम्ब्रियो ट्रान्स्फर. १९७८ साली डॉ. रॉबर्ट एडवर्ड आणि डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांनी ल्युईस ब्राऊन या नलिका बालिकेला जन्माला घातले आणि त्याबरोबरच एक नवीन युग सुरू झाले. स्त्री बीजाचे शुक्रजंतूंशी (पु. बीजाशी) फलन हे गर्भाशय नलिकेत होते; पण जर नलिका बंद असतील तर? यावर मात करण्यासाठी डॉ. एडवर्डनी एक नवा मार्ग शोधला. डॉ. स्टेप्टोनी पत्नीच्या अंडाशयातून पक्व झालेले स्त्रीबीज शोषून घेतले आणि तिच्या पतीच्या शुक्र जंतूंवर प्रक्रिया करून ते फलनासाठी स्त्री बीजाबरोबर एका काचेच्या बशीत ठेवले.
फलन झाल्यावर तो गर्भ दोन दिवस वाढवून ६-८ पेशींचा झाल्यावर मग त्याचे त्या स्त्रीच्या गर्भात रोपण केले. गर्भ ९ महिने आईच्या पोटात वाढल्यावर ल्युईसचा जन्म झाला. या यशस्वी प्रयोगानंतर जगभर अनेक डॉक्टरांनी प्रयोग करून हजारो नलिका बालकांना जन्माला घातले. बऱ्याच वेळा स्त्रीच्या शरीरातील अंतःस्रावांना (गोनॅडोट्रापिनस्) अडथळा आणून बाहेरून अंतःस्राव दिले जातात.
यामुळे एकापेक्षा जास्त स्त्री बीजे पक्व होतात आणि त्यामुळे शरीराबाहेर अनेक गर्भ तयार होऊ शकतात. त्यातील दोन किंवा तीन उत्तम प्रतीचे गर्भ गर्भाशयात पुढील वाढीकरिता रुजविता येतात. यामुळे कधी कधी जुळे किंवा तीळे होण्याची शक्यता असते. स्त्री बीजाची अंडाशयातील वाढ, तसेच गर्भाची गर्भाशयातील वाढ हे सूक्ष्म आवाजाच्या लहरींच्या यंत्राद्वारे (अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासोनोग्राफी) बारकाईने पाहिले जाते. प्लास्टिकची नळी योनीमार्गे घालून स्त्री बीजाचे शोषण केले जाते. ज्या स्त्रियांचे काही कारणांमुळे नैसर्गिकरीत्या शरीरात फलन होत नाही त्यांना नलिका बालकाचा प्रयोग हे एक मराठी विज्ञान’ वरदानच आहे. जगभर नलिका बालकाचा प्रयोग ३५-४७ टक्के प्रत्येक चक्रा (सायकल) मागे यशस्वी होतो आणि ६ किंवा ७ चक्र (सायकल्स) प्रयत्न केल्यास ६०-७० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो; पण स्त्रीचे वय ४० किंवा त्यापेक्षाही जास्त असल्यास मात्र ही शक्यता खूपच कमी होते.
-डॉ. तरला नांदेडकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply