एखाद्या वैवाहिक जोडप्याला एकत्र नांदूनही २ वर्षांत मूल न होणे याला वंध्यत्व म्हणतात.
या जोडप्यात पत्नीचे वय ३५ वर्षांखालील असणे आवश्यक असते कारण नंतर स्त्रीबीजाचा दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फलनाची क्रिया खालावू शकते.
लग्नानंतरच्या दोन वर्षांत या जोडप्याने मूल होऊ न देण्यासाठी कोठचेही कुटुंबनियोजनाचे उपाय मात्र अमलात आणलेले नसावेत. कधी कधी गर्भधारणा होऊन नंतर गर्भपात होतो व त्यानंतर मूल होत नाही.
वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. स्त्रीमध्ये- अंडाशयात अंड/ स्त्रीबीज तयार होणे, ते गर्भाशय नलिकेत सोडले जाणे- या क्रिया गर्भधारणेत अतिशय महत्त्वाच्या असतात.
आवाजाच्या सूक्ष्म लहरींनी (अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी) तसेच रक्तातील अंतःस्रावांच्या प्रमाणावरून सर्व व्यवस्थित आहे, की नाही याचे निदान करता येते. नलिका बंद असल्यास फलनाला अडथळा होतो. कधी कधी गर्भ गर्भाशयात येऊनही त्याचे रोपण होऊ शकत नाही. रोपण झाल्यावरही कधी कधी गर्भपात होऊ शकतो. प्रत्येक कारणांवर वेगवेगळे उपाय योजल्यास मूल होण्याची शक्यता असते.
बाहेरून अंतःस्राव स्त्रीच्या शरीरात टोचणे, नलिका बंद असल्यास उघडण्याचा प्रयत्न करणे व हे पण शक्य न झाल्यास स्त्री बीजाचे आणि शुक्रजंतूचे शरीराबाहेर फलन करून नलिका बालकाचा (टेस्टट्यूब बेबीचा) प्रयोग करणे, असे अनेक उपाय शक्य आहेत. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. शुक्रजंतू वृषणात तयार होतात. ते शुक्रवाहिनी या नलिकेतून शिश्नापर्यंत काही खास स्रावांमुळे वाहून शिश्नामध्ये येतात आणि वीर्यातून शरीराबाहेर पडतात. संभोगामध्ये ते स्त्रीच्या योनीमार्गातून, गर्भाशयातून गर्भनलिकेत दाखल होतात आणि तेथे त्या वेळी स्त्री बीज असल्यास फलनाची क्रिया होऊन गर्भ राहतो.
-डॉ. तरला नांदेडकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply