सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती ही सगळी मुले आठ ते अकरा या वयोगटातील आहेत. माझ्या मनात विचार आला “चला आजपासून धुमाकूळ चालू.”
साधारण दीड दोन तासाने कामे आटोपून घरी येत होते. बघितले कि ही सगळी ‘वानरसेना’ दोन तीन सायकलीवरून आलेल्या मुलांच्या मागे वेडी वाकडी धावत आमच्याच घराच्या बाजूने जात होती. मी थांबले आणि विचारले “अरे काय झाले?” सगळे एकदम चूप. तशी ही सगळी मला उगाचच घाबरत असतात. मला बघितल्यावर त्यांचे चेहरे हे कामासाठी निघालेल्या माणसाला मांजर आडवी गेली कि जितका वाईट होतो तेवढे वाईट झाले. क्षणभर मला वाटले शेजारच्या बाईच्या आंब्याच्या झाडावर चढण्याचा यांचा प्लॅन बहुतेक मला बघून फसलेला दिसतोय. शेजारचे दोघेही नवरा बायको नोकरी करतात त्यामुळे या मुलांना ही आयतीच संधी.
पण नाही. जशी घराच्या जवळ पोहोचले तसे लक्षात आले कि ही मुले या सायकल वरून आलेल्या मुलांच्याच मागे धावत होती. मी टोकल्यावर तशीच उभी राहिली आणि त्या मुलांकडे बघत होती. मला कळून चुकले कि काहीतरी गडबड या नवीन आलेल्या मुलांचीच आहे म्हणून जरा जोरातच त्या मधल्या एका मुलाला विचारले “काय आहे? काय गडबड चालली आहे?”
पण एक नाही की दोन नाही आणि माझ्याकडे बघतच तो शेजाऱ्यांच्या कंपाऊंडवर चढायला लागला. बाकीची मुले घाबरून उभी होती. क्षणभर वाटले की साप निघाला कि काय? या बाजूला बरेच वेळा लोकांनी साप बघितला आहे. म्हणून त्याला जोरात ओरडले “अरे चढू नकोस, तो साप उलटा तुझ्यावर येईल. खाली उतर.” तसा तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला “आँटी यहाँ साप नाही है.”
त्याला बघून माझी खात्रीच झाली हा सोसायटीतला नाही. दहा अकरा वर्षाचा असेल. सायकल चालवून चालवून दमलेला दिसत होता. हातात येशू ख्रिस्ताचा क्रॉस असलेली फिक्कट हिरव्यां रंगाची माळ होती. बहुतेक रेडियम सारखी असावी. ती त्यांनी हातात घट्ट धरून ठेवली होती. अगदी केविलवाणा, कावराबावरा. त्याच्याकडे बघून हा काहीतरी शोधत इथपर्यंत आलेला आहे आणि त्याचा त्या देवाच्या माळेवर अपार विश्वास असावा हे पटकन कळून येत होते आणि देव त्याला नक्कीच मदत करणार आहे अशी त्याला खात्री असावी. म्हणूनच एका हातात ती माळ घट्ट धरली असावी. त्याच्या बरोबरची मुले फक्त शांत उभी होती. त्यातल्या एकाच्या हातात एक काठी होती. दुसऱ्या जवळ बॅगेला गाडीत बांधायला वापरतात तशी एक साखळी होती आणि शर्टच्या खिशातून बिस्किटचा छोटासा डबा बाहेर डोकावताना दिसत होता.
मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, “ तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? आणि इथे काय करताय?” माझा तो शांत अवतार बघून सोसायटीतील चिटकी पिटकी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. आणि तो ही कंपाऊंडवरून खाली उतरला. त्याच्या बरोबरची मुले पण त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तो मला काही सांगणार तेवढ्यात कंपाउंडच्या आत एक छोटेसे पांढरे कुत्र्याचे पिल्लू दिसले. तसा तो धावत “जॉली जॉली” करत त्याच्याकडे पळाला. मला माहित होते हे कुत्रे तर इथलेच आहे. मग हा का त्याला हाक मारतोय? तो म्हणाला, “हा माझा कुत्रा आहे”. बाकीची मुले ओरडली, “हा कुत्रा त्याचा नाही.” तो अगदी रडवेला झाला.
म्हणाला, “ मी तेरा सेक्टर मध्ये राहतो. एकदा मला रस्त्यात एक कुत्र्याचे पिल्लू सापडले त्याच्या पायाला काहीतरी लागले होते. त्याला पट्टी लाऊन, औषधे देऊन मी बरे केले. तो माझ्याबरोबर खेळतो म्हणून शेजारच्या डॉ. काकांनी त्याला इंजेक्शनं पण दिली आहेत. त्याला मी जेवणही देतो. तो माझ्याच जवळ राहतो पण माझ्या बाबांना वाटले की मी त्याच्यामुळे अभ्यास करत नाही. म्हणून माझ्या परीक्षेच्या आधीच त्यांनी त्याला या बाजूला कुठेतरी सोडून दिले आहे. हा त्यांचा ऑफिसचा रस्ता आहे. म्हणून मला खात्री आहे की तो इथेच कुठेतरी आहे. माझी परीक्षा आज आता सकाळीच संपली. आम्ही लगेच त्याला सायकलवर शोधायला निघालो आहोत. आम्ही जॉलीला घरी घेऊन जायला आलो आहोत.”
ऐकून काय करावे हे क्षणभर सुचलेच नाही. मी विचारले “हेच कुत्रे तुझे आहे कशावरून?” तो म्हणाला “तो असाच आहे. माझा आवाज ओळखतो, मी हाक मारली की लगेच येईल” असे बोलत परत त्या कंपाऊंडवर चढून “जॉली जॉली” अशी हाक मारायला लागला.
त्याच्या आवाजातली ती आद्रता ऐकून असे वाटले हाच त्याचा जॉली असावा आणि त्याच्याकडे धावत यावा. पण तसे झाले नाही. अगदी नाराज होऊन ती मुले सायकलवर चढून दुसरीकडे त्याच्या शोधात निघाली. आम्ही सगळे त्यांच्याकडे नुसते बघतच राहिलो. एवढा वेळ हा त्याचा कुत्रा नाही म्हणून भांडणारी इतर छोटी मुले त्याच्या मदतीला धावून गेली. “अरे शेजारच्या गल्लीत एक नवीन पांढरे कुत्रे आहे. जाऊन बघा” आणि परत त्यांच्या मागे धावत गेली.
संध्याकाळी सोसायटीतील मुले खेळत होती. एकदा वाटले कि त्यांना विचारावे “अरे त्याचा कुत्रा मिळाला का?” पण मन घाबरले, कदाचित नाही ऐकण्याची माझ्या मनाची तयारी नसावी. पण मनोमन देवाला प्रार्थना करत होते कि “त्या लहान मुलाचा जॉली त्याला लवकर भेटू दे आणि या इवल्याशा चेहऱ्यावर परत खूप आनंद झळकू दे. तुझ्यावरच्या त्याच्या श्रद्धेला तडा नको जाऊ देऊ”.
आणि स्वत:ला एक प्रश्न विचारावा असे वाटले की, “कधी कधी आपण आपल्या मुलांवर किती अन्याय करतो नाही?”
Leave a Reply