संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स हे भारतीय चित्रपट संगीतातील एका गुणी कलाकाराचं नाव. इनॉक डॅनियल्स यांचा जन्म १६ एप्रिल १९३३ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या नव्वदाव्या वर्षा नंतर देखील ते त्याच तडफेने अकॉर्डियन वाजवतात.
शंकर-जयकिशन, राम कदम, सी. रामचंद्र यांच्यासारख्या अनेक संगीतकारांसोबत इनॉक यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या संगीत संयोजनानाने आणि वादनाने सर्व संगीतकारांना मोहून टाकलं. अप्रतिम गाणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर त्यांची कमालीची पकड आहे .
पंचहौद मिशनच्या चर्चसमोर असलेल्या ख्रिस्ती जमातीसाठी बांधलेल्या चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बेंजो, मोठा भाऊ व्हायोलिन तर दुसरा भाऊ क्लॅरियोनेट वाजवत होते. या सुरिल्या परिवारामध्ये इनॉक यांचा ‘बालपणीचा काळ सुरांचा’ गेला. इनॉक यांच्या वादनाची सुरुवात ड्रमसेटवर झाली. नियतीच्या मर्जीनुसार इनॉक यांच्या नशिबी अॅ्कॉर्डियन होते, पण उपलब्ध असलेल्या वाद्यांत ते नव्हते. त्यांचे वडील ख्रिश्चन बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक होते. चर्च संबंधित असलेल्या युरोपियन फादर यांना वाटले की, हॉस्टेलमधील मुलांना एखादे तरी वाद्य यावे, संगीताची ओळख व्हावी, सुरांची माहिती व्हावी. या उद्देशाने त्यांनी विविध प्रकारची वाद्ये युरोपातून मागवली आणि ती इनॉकला सुवर्णसंधी वाटली; कारण फक्त पाहण्यासाठीही दुर्मिळ असणारी ट्रंपेट- ट्रॉम्बोनसारखी वाद्ये त्याला उपलब्ध झाली. सदर फादर मुलांना आवडेल ते वाद्य शिकवत असत. छोटा इनॉक त्याकडे आसुसून पाहात असे.
युरोपातून एक रेव्हरंड फादर स्लेड पुण्याच्या पंचहौद मिशनमध्ये आले होते. त्यांची मराठी शिकण्याची इच्छा होती. त्यांची आणि इनॉकची चांगली गट्टी जमली. इनॉक यांचे शिक्षण मराठीतूनच झाल्याने त्याच्याकडे मराठीचे ज्ञान होते- आजही ते अस्खलित मराठीतच बोलते- पण इंग्रजी मात्र त्या वेळी चांगले नव्हते. मोडक्यातेडक्या इंग्रजी-मराठीत त्यांचा संवाद चाले. त्यांचा आग्रह होता ‘तुम्ही इंग्रजी बोलू नका. मी मराठीत बोलताना ज्या चुका होतील त्या दाखवा व दुरुस्त करा.’ यामुळे त्यांची चांगली दोस्ती झाली. त्यांना वाटले की, या मुलाला थोडेफार वाजवायला शिकवले पाहिजे. ते उत्कृष्ट पियानोवादक होते. चर्चमध्ये रविवार प्रार्थनेसाठी ऑर्गन असतेच. ऑर्गन व पियानोच्या स्वरपट्टय़ा एकच असतात. रेव्हरंड स्लेडच्या मार्गदर्शनाखाली इनॉकची शिकवणी सुरू झाली. एका वर्षांतच ते ऑर्गन मोठय़ा सफाईने वाजवू लागले. घरीच ऑर्गन असल्याने शिकलेल्या पाठाची उजळणी वेळ मिळेल तेव्हा ते करीत असे. चर्चमधील क्वायर्स, हीम्स आदी प्रार्थना वाजवू लागले.
संगीतातील गायन, हार्मनी, मेलडी हे प्रकार चर्चमध्ये वारंवार वाजवले जातात. प्रख्यात पाश्चात्त्य संगीतकार बिथोवेन, बाख, मोझार्ट यांच्या रचनांचा त्यामध्ये समावेश होते. त्यांचे थोरले बंधू रेल्वेमध्ये नोकरी करीत होते. कानपूर येथे बदली झाली तेव्हा एक अँग्लो-इंडियन परिवार भारत सोडून ऑस्ट्रेलियाला चालले होते. त्यांच्याकडून त्यांचा पियानो स्वस्तात मिळाल्याने आपल्या धाकटय़ा भावासाठी ते रेल्वेने पुण्यास पाठवला. घरचेच वाद्य मिळाल्याने इनॉक चोवीस तास रियाज करून कुशल वादक बनला.
इनॉकने पियानो अॅवकॉर्डियनवर वाजवलेले पहिले गाणे ‘आह’ चित्रपटातील ‘सुनते थे नाम हम..’ होते. खूप धमाल आली. इनॉकला पियानो अॅ कॉर्डियन खूपच आवडले. (ओरिजनल ‘पतिता’, ‘आह’, ‘दाग’ या चित्रपटांतील अॅइकॉर्डियनचे सूर मात्र व्ही. बलसारा याने हार्मोनियमवर काढले होते ही माहिती अनेक संगीतप्रेमींना मनोरंजक वाटेल) दिल्लीमध्ये झालेल्या कॉलेज यूथ फेस्टिवलमध्ये इनॉकच्या वादनाने खूपच प्रसिद्धी मिळवली व वाडिया कॉलेजला पहिले बक्षीस मिळाले. त्यांची ओळख व्हॅन शिप्ले या प्रख्यात हवाईयन गिटारवादकाशी झाली व एक चांगला सुरेल ग्रुप तयार झाला. त्यांचे संयुक्त वादन श्रवणीय होत असे. शिप्ले मेलडी वाजवत असे तर इनॉक हार्मनीने गाणे सुशोभित करीत असे. साथीला स्पॅनिश गिटार व दोन रिदमिस्टही होते. कॉलेजमधून संगीताकडे वाटचाल चालू झाली व अर्थार्जनही सुरू झाले. त्यांच्या कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी गाणी व ‘कम सप्टेंबर’, ‘लाराज थीम फॉर अ फ्यू मोअर डॉलर’ यांसारखी इंग्रजी गाणीही असत.
आता इनॉकचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण अपरिहार्य होते. पुण्याच्या नवयुग स्टुडियोमध्ये चित्रपट चित्रीकरणाबरोबरच गाण्यांचेही ध्वनिमुद्रण होत असे. सुधीर फडके, वसंत पवार, पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर इनॉकचा परिचय झाला. पु. ल. देशपांडे हे आपल्या ‘गुळाचा गणपती’चे चित्रीकरण व ध्वनिमुद्रण करीत होते. त्यांना अॅ्कॉडयन खूप आवडत होते, कारण पेटीवादनात ते प्रवीण होते. त्यांनी अॅीकॉर्डियन ऐवजी पियानो वाजविण्याची सूचना केली. खरे तर पियानोमध्येच इनॉक प्रवीण होता. त्यांचे पहिले चित्रपटवादन पियानोनेच झाले. राम कदम वसंत पवारचे साहाय्यक होते, पुणे आकाशवाणीवर क्लॅरियोनेट वादक म्हणून कामाला होते. त्यांना इनॉकचे वादन आवडत असे. त्यांनी स्वतंत्र काम मिळाल्यावर इनॉकला संगीत संयोजक नेमण्याचा शब्द दिला. राम कदम यांच्या सर्व चित्रपटांना इनॉकनेच संयोजन केले. वादन हेच अंतिम ध्येय ठेवणाऱ्या इनॉकचे मुंबईला प्रयाण आता अपरिहार्य होते.
१९६०-६१ ला इनॉक यांनी मराठी चित्रपटात वादन व संगीत संयोजनाला प्रारंभ केला. मुंबईत आल्यावर त्याला पहिला हिंदी संगीतात ब्रेक बिपिन-बाबुल यांच्या संगीत संयोजनाने मिळाला आणि ते लोकप्रिय झाला. त्याने संगीतकारांचे लक्ष वेधले. संगीताची प्रचंड आवड असलेल्या श्रोत्यांना अरेंजमेंट तथा संगीत संयोजनाबद्दल कुतूहल नसल्याने संगीत संयोजक यांची योग्य दखल घेतली गेली नाही. संगीतकारांच्या असामान्य प्रतिभेला सुचलेल्या चालींचे सोने संयोजकांनी केले, अगदी तेडीस तेड काम करून गाण्याला भरजरी रूप दिले व त्यांचे सौंदर्य नटवले, खुलवले.
संगीतकार खय्याम यांनी स्वरबद्ध केलेल्या कैफी आजमी यांच्या ‘शगुफ्ता’ अल्बमला इनॉक संयोजक होते. एका गाण्याचे संयोजन इनॉक यांनी इतके अप्रतिम केले की, कलाकार, वादक व ध्वनिमुद्रक सर्वाना ते आवडले. त्यांनी मनापासून दाद दिली.. ध्वनिमुद्रणाच्या वेळी खय्याम नव्हते. त्यांना जेव्हा ती रचना ऐकविली तेव्हा त्यांनी लागलीच इनॉकला रात्रीच फोन केला. ते म्हणाले, ‘डॉन! गाना बहुत अच्छा हुवा है, लेकिन उसमें पोएट्री छूट गयी है। हमें उसकी अरेंजमेंट बदलनी चाहिए, और कल फिर से रेकॉर्ड करेंगे। वैसी ते तुम्हारी अरेंजमेंट गाने से भी बढिम्या हो गई है।..’ त्यानुसार इनॉकने अॅकरेजमेंट बदलून गाणे ध्वनिमुद्रित केले. राम कदम स्वत: वादक असल्याने त्यांच्याबरोबर काम करणे इनॉक यांना सोपे जाई. त्यांची चतुरस्र प्रतिभा रामभाऊ जाणत असल्याने त्याच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळे. रामभाऊंचा झपाटाही विलक्षण होता. एकेका दिवशी पाच-सहा रचना ते ध्वनिमुद्रित करत. मुंबईच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रण होत असल्याने पंडित विधाते या तालवादकाला व इतरही कोरस कलावंतांना पुण्यावरून मुंबईला आणीत. मैलाचा दगड असलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.. त्यामागची कहाणी सांगण्यासारखी आहे. गीतकार, संगीतकार व इनॉक यांच्या अलौकिक मेहनतीची कल्पना येते. शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, रामभाऊंची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र यांच्या कडे इनॉक यांनी खूप काम केले. शंकर-जयकिशनकडे अॅीकॉर्डियनसाठी गुडी सिरवाई, धीरजकुमार, सुमित मिश्रा यांसारखे वादक असल्याने इनॉक यांनी त्यांच्याकडे मोजकेच काम केले. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे इनॉक यांच्या अॅजकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. त्यांची सुरुवात कशी झाली याचा योगायोगही विलक्षण आहे. १९५५ ते ५७ मध्ये इनॉकने व्हॅन शिप्लेबरोबर आफ्रिकेचे अनेक दौरे केले.. तेथील संगीतप्रेमींना त्या दोघांचे वादन खूपच पसंत होते.. त्या वेळी तलत मेहमूद व सी. एच. आत्मा यांचेही कार्यक्रम होत. जानेवारी १९५७ ला भारतात परतताना इनॉक व शिप्ले भेटले. त्यांची लोकप्रियता आत्मानेही अनुभवली होती. भारतात आल्यावर सी. एच. आत्माने एचएमव्हीचे जनरल मॅनेजर चढ्ढांना इनॉकच्या वादनाच्या तबकडय़ा काढण्याची सूचना केली.. एचएमव्हीने त्यानंतर इनॉकच्या खूप गाण्यांच्या तबकडय़ा काढल्या. त्यांचा अभूतपूर्व खप रसिकांमध्ये झाला. इनॉक संयोजक म्हणून अपरिचित असलेल्या गानरसिकांना अॅणकॉर्डियन वादक इनॉकला मात्र आजही खूप जण ओळखतात. त्याच्या रेकॉर्ड्सही संग्रही आहेत. त्यांची रेकॉर्ड झालेली पहिली धून ‘सोलवा साल’मधील ‘है अपना दिल ते आवारा’ आहे. कानसेनांच्या दुनियेत रेडिओ सिलोनचे नाव अग्रगण्य आहे. त्यावर गोपाल शर्मा, विजयकिशोर दुबे नंतर आले. त्यांनी लोकप्रिय झालेल्या कितीतरी कार्यक्रमांची संकल्पना आखली. त्यामध्येच ‘साज और आवाज’ हा कार्यक्रम आहे.. होता वैशिष्टय़ संगीतकार गायक/वादकांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांनी गायलेली/ वाजवलेली/ संगीत दिलेली गाणी पूर्ण वेळ ऐकवली जातात. १६ एप्रिलला सिलोनने पूर्णवेळ इनॉक यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षांच्या वाढदिवशी रेडिओ सिलोनने इनॉकचे वाद्यसंगीत ऐकवले व त्याचा फोन नंबर दिला. तलत महमूद, व्हॅन शिप्ले व इनॉकचे संयुक्त दौरे आफ्रिकेला झाले. अॅंकॉर्डियनमध्ये ‘गोरे गोरे, ओ बाके छोरे’ वाजवणाऱ्या रेगोला व शंकर-जयकिशनकडे वाजवणाऱ्या गुड्डी सिरवाईला ते गुरुस्थानी मानते.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ विलासदत्त राऊत
इनॉक डॅनियल्स यांची वेबसाईट
इनॉक डॅनियल्स यांचे वादन
https://www.youtube.com/watch?v=mnZM8ANG2Kc
Leave a Reply