आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे ‘इंटिग्रेटेड प्रॅक्टिस’. शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ एकात्मिक असा असला तरी आयुर्वेदात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने पाहिला जातो. इंटिग्रेटेड म्हणजे आयुर्वेदाची पदवी घेऊन आधुनिक शास्त्राचे उपचार देणे वा त्यांची सरमिसळ करणे. आयुर्वेदाची विद्यमान शिक्षणपद्धती आणि धोरणे ठरवणाऱ्या शीर्ष परिषदेची उदासिनता यामुळे सध्याचा आयुर्वेदाचा विद्यार्थी ग्रंथांपासून दूर आणि औषधी विक्रेत्यांच्या जवळ कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याने असे विचार बऱ्याचदा वाढीला लागतात.
ज्या दोन शास्त्रांचे मूलभूत सिद्धांतच न जुळणारे आहेत त्यांना इंटिग्रेट करण्याचा विचार करणं म्हणजे तेलात पाणी ओतून ‘एकजीव मिश्रण’ तयार केल्याचा दावा करणे होय. या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळू शकतील का? नाही. आहारापासून विचारापर्यंत कोणतीच गोष्ट जुळत नाही; किंबहुना अगदी विरुद्ध टोकाची आहे अशा व्यक्तींची लग्न जुळवण्याचा अट्टाहास हा सप्तपदीपासूनच घटस्फोटाच्या दिशेने पावले टाकणारा असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाचे आहे. आयुर्वेदाचा अवघा डोलारा ज्या दोष- धातू- मल आदि संकल्पनांवर आधारित आहे त्यांनाच आधुनिक शास्त्र मानत नाही. पुढे बोलण्याचा प्रश्नच येतो कुठे?! याकरताच MBBS नंतर MD/MS (Ayurved) करायला देण्याच्या आत्मघातकी निर्णयावरील चर्चेला आम्ही वैद्यांनी विरोध दर्शवला होता.ज्यांना आयुर्वेद शिकायचा आहे त्यांनी BAMS करूनच तो शिकावा हे स्वच्छ गणित आहे. काहीजण मात्र उफराटे कारभार करत आयुर्वेदानुसार निदान आणि आधुनिक चिकित्सा वा आधुनिक शास्त्रानुसार निदान आणि आयुर्वेदीय चिकित्सा असे विचार करत असतात. काहीजण तर त्यापलिकडे जाऊन आधुनिक औषधे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार कशी कार्य करतात हे ‘ओढून ताणून बसवून’ सांगत असतात. मात्र त्याच वेळेला आयुर्वेदानुसार ही औषधें कोणत्या ‘भैषज्यकल्पनेत’ बसतील यावर मात्र गुळणी धरून (बिटाडीनची?!) गप बसतात.
आयुर्वेदाला कोणाहीसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आचार्य चरकांच्या शब्दांत हे शास्त्र ‘शाश्वत’ आहे. पण मग आयुर्वेद स्वतःला फारच ग्रेट समजतो किंवा आयुर्वेदाचे आधुनिक विज्ञानाशी वावडे आहे का; तर मुळीच नाही. आयुर्वेदाला व्यक्त होण्यास आधुनिक वैद्यकाच्या कुबड्यांची गरज नाही इतकेच आमचे मत आहे. पण मग आयुर्वेदीय वैद्यांना तपासणीची प्रयोगशालेय साधने का लागतात? असा प्रश्न कित्येकजण उपस्थित करत असतात. मुळात हा प्रश्नच फसवा आहे. स्टेथोस्कोपपासून ते एमआरआय पर्यंतचे सगळे शोध हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इत्यादि मूलभूत शास्त्रीय शाखांचे आहेत; आधुनिक वैद्यकाचे नाहीत!! त्यामुळे वैद्यांनी त्यांचा गरज पडेल तेथे वापर करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. मात्र पुन्हा हा वापर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हवा. ही परीक्षणे आयुर्वेदानुसार प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. त्यापुढील अनुमान, युक्ति आदि प्रमाणे वापरताना आणि निदान-उपचार ठरवताना ते आयुर्वेदाच्या संकल्पना वा सिद्धांतांनुसार असायला हवे. याला खऱ्या अर्थाने ‘इंटिग्रेटेड’ म्हणता येईल. वैद्यांनी आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिणे बंद करावे असे मला तरी वाटते. काही घ्यायचेच असेल तर आपले शास्त्र सार्वभौम करण्याची आधुनिक वैद्यकाच्या पदवीधरांची वृत्ती आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी हे गुण घ्यावेत. त्यातच शास्त्राचे खरे ‘उपबृंहण’ करण्याची क्षमता आहे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply