नवीन लेखन...

बुद्धिवाद आणि सिद्धी ( एक निष्पक्ष वैचारिक मंथन )

  • प्रास्ताविक :
  • विसाव्‍या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगति केली आहे. काल ज्‍या गोष्‍टी अशक्‍य वाटत होत्‍या, त्‍या आज अस्तित्‍वात आलेल्‍या आहेत. याचाच अर्थ असा की, आज अशक्‍य वाटणार्‍या गोष्‍टी उद्या शक्‍य वाटूं लागतीलही, आज चमत्‍कार अथवा सिद्धी म्‍हणून गणल्‍या जाणार्‍या गोष्‍टींबद्दल कदाचित् उद्या वैद्यकीय स्‍पष्‍टीकरण सापडूंही शकेल.
  • अनेकदा दोन विरुद्ध बाजूच्या लोकांमध्ये वैचारिक वाद होत असतात. म्हणून, आपण याबद्दल निष्पक्ष विचार करण्याचा प्रयत्न करूं या.

 

  • पहिली बाजू :
  • काही शतकांपूर्वी लोकांना विमान म्‍हणजे एक कविकल्‍पना वाटणे साहजिकच होते, पण आता ती एक सामान्‍य आणि सर्वमान्‍य गोष्‍ट झाली आहे. ज्‍यूल्‍स व्‍हर्न ची, ‘फ्रॉम अऽर्थ टू दि मून’ या नांवाची एक सुरस कादंबरी होती. पण आज ‘चंद्रावर माणूस पोचणें’ ही एक सुरस कथा नसून सत्‍य घटना झालेली आहे. तसें प्रत्‍यक्षात घडतांना आपण पाहिलेलें आहे. ‘क्ष-किरण’, ‘इन्‍फ्रा- रेड किरण’, ‘मायक्रोवेव्‍हज्’ वगैरे अदृश्‍य लहरींमुळे शरीरावरील कातडीला अपाय न होता, आंतील अवयव दिसू शकतात , आंतील रोगही बरा होऊं शकतो. ही गोष्‍ट कांहीं शतकांपूर्वी चमत्‍कारात जमा झाली असती. एवढेंच काय, शंभरएक वर्षांपूर्वी जर कुणी म्‍हणाला असता की ‘माणसाची हुबेहूब जीवित प्रतिकृति कृत्रिमरीत्‍या तयार करणें शक्य आहे’, तर त्‍यावर किती लोकांनी विश्वास ठेवला असता ? परंतु तशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. वैज्ञानिकांनी या क्रियेला ‘क्‍लॉनिंग’ असें नाव दिलेलें आहे. यावर गेली काहीं दशकें बरेंच संशोधन चालू आहे व क्‍लॉनिंगने ‘घडवलेले’ गिनीपिग्‍ज अस्तित्‍वातही आलेले आहेत.

 

  • आजही शरीरशास्‍त्रज्ञांना अथवा मानसशास्‍त्रज्ञांना मेंदूतील सर्व भागांचे कार्य समजलेलें नाही. माणूस त्‍याच्‍या मेंदूच्‍या क्षमतेच्‍या फक्‍त एक दशांशाचाच उपयोग करतो असे शास्‍त्रज्ञ म्‍हणतात. तर मग उरलेल्‍या नव्वद टक्‍के भागाचा उपयोग काय? आणि निरुपयोगी भाग उत्‍क्रांतीवादाच्‍या सिद्धान्‍ताप्रमाणे कालांतराने अस्तित्‍वातून गेला नसता काय ? हिप्‍नॉटिझम अथवा संमोहनविद्या, टेलीपथी, टेलीकायनेसिस या गोष्‍टींची उदाहरणे बरेचदा वाचनात येतात. कांहीं लोकांना त्‍यांचा प्रत्‍यक्ष अनुभवही आलेला आहे. पण अजून कोणीही त्‍याबद्दल सर्वमान्‍य व सिद्ध होऊ शकणारे स्‍पष्‍टीकरण देऊ शकलेले नाही. साधारण- विज्ञानाच्‍या कक्षेबाहेरील अशा प्रकारच्‍या, मेंदूशी संलग्‍न अभ्‍यासास ‘पॅरासायकॉलॉजी’ (परामानसशास्त्र) म्‍हणतात व त्‍याचा अभ्‍यास भारतात आणि पाश्चिमात्त्य देशातही सुरू आहे.

 

  • थोडक्‍यात काय, तर मानवाचें ज्ञान हें कधीच परिपूर्ण असूं शकत नाही , व अजूनही , विज्ञानाला अनाकलनीय अशा अनेक गोष्‍टी आहेत, हें मान्य करायला हवें.

 

  • दुसरी बाजू :
  • परंतु , अतींद्रीय शक्ति अथवा सिद्धी प्राप्‍त असल्‍याचा दावा करणारांनी हें ध्‍यानात ठेवायला हवें की आजच्‍या विज्ञानयुगात अंधश्रद्धेला जागा नाहीं . इथें परीक्षण आवश्‍यक आहे. त्‍यांना माहीत असल्‍यास, त्‍यांनी आपल्‍या शक्‍तीची उपपत्ती सांगायला हवी. विद्या दिल्‍याने वाढते, कंजूषपणामुळे, कोषात साठवून ठेवल्‍याने अंती तिचा नाश होतो. सिद्धी प्राप्‍त असणार्‍यांना किंवा तसा दावा करणार्‍यांना मानवजातीचें खरें हित साधायचें असेल तर त्‍यांनी स्‍वतः होऊन पुढाकार घेऊन याविषयी वैज्ञानिकांना सक्रिय मदत करायला हवी.

 

  • पण असें होत नाही. मागे डॉ. कोवूर यांनी एका सुविख्‍यात बाबांना दिलेले आव्‍हान त्‍यांनी स्‍वीकारलें नाही. प्रख्‍यात जादूगार पी. सी. सरकार यांचाही असाच अनुभव आहे. बाबांच्‍या आश्रमात ‘दर्शना’चा कार्यक्रम चालू असतांना, बाबांनी दाखवलेल्‍या चमत्‍कारासारखाच दुसरा ‘चमत्‍कार’ श्री. सरकार यांनी लागलीच तिथल्‍या तिथेच करून दाखवला. श्री. सरकार यांना तात्‍काळ आश्रमाबाहेर काढण्‍यात आले. ‘सिद्धी’ हा श्रद्धेचा विषय नाही, अभ्‍यासाचा विषय आहे, हें या आधुनिक सिद्धांना वा बाबांना कधी समजणार ? आणि तशा अभ्‍यासाला त्‍यांनी सक्रिय मदत न केल्‍यास, त्‍याला ‘बुवाबाजी’ असें  बुद्धिवादी जर म्‍हणाले, तर त्‍यांना दोष कसा देता येईल ?

 

  • एक ‘क़ाबिले तारीफ़’ उदाहरण :

वैज्ञानिक अभ्‍यासाला सक्रिय मदत करण्‍याचें हल्लीच्या काळातलें उदाहरण म्‍हणजे अमेरिकेचे माजी अध्‍यक्ष रेगन यांचें . रेगन यांना ‘अल्‍झायमर’ हा दुर्धर रोग झाला होता. या रोगाच्‍या प्रादुर्भावाबद्दल फारच थोडी माहिती जगास उपलब्‍ध आहे व रोगमुक्‍तीसाठी एकही रामबाण औषध नाही. अल्‍झायमर हा मेंदूचा रोग असल्‍यामुळे रोग्‍याची आकलनशक्ति कमी कमी होत जाते, मेंदूचे शरीरावरील नियंत्रणही कमी होत जाते. या रोगातून सुटण्‍याचा एकच उपाय आहे, आणि तो म्‍हणजे मृत्‍यू .

 

पण रेगन यांनी आपल्‍याला हा रोग झाल्‍याचे लपवलें नाही. उलट त्‍यांनी तें जगासमोर उघड केले व स्‍वतःला या रोगाच्‍या अभ्‍यासासाठी डॉक्‍टरांपुढे उपलब्‍ध करून दिले. विज्ञानाची किती मोठी सेवा रेगन यांनी केली ! आजचे ‘बुवा’ किंवा ‘सिद्ध’ अशा अभ्‍यासाची संधी वैज्ञानिकांना कधी देणार ?

 

  • ‘सिद्दी म्हणजे बुबाबाजी’ , असें दर वेळी असेलच कां ?  : 

मात्र, बुद्धिवादी लोकांनीही एक अभ्‍यास म्‍हणून हा विषय हाताळला पाहिजे. कांहीं ‘गुरु’, ‘बुवा’ व ‘स्‍वामी’ चमत्‍कारांच्‍या व सिद्धींच्‍या झगमगाटाने भोळ्या भक्‍तांची दिशाभूल करतही असतील. त्‍यांचें थोडा वेळ बाजूला ठेवूं. पण यूरी गेलर या इस्त्रायली व्‍यक्‍तीच्‍या ‘टेलिकायनेसिस’ शक्‍तीचे काय ? एडगर कायसी (Cayce)  या अमेरिकन माणसाने संमोहनावस्‍थेत दिलेल्‍या ‘डेड सी स्क्रोलस्’ बद्दलच्‍या पूर्वसूचनांचे काय , ज्‍यानुसार नंतर खरोखरच कांहीं उपयुक्‍त माहिती उजेडात आली. टेलीपथी किंवा उत्‍स्‍फूर्तपणे भविष्‍यकथन करणार्‍या व्‍यक्‍तींची उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो. त्‍यातली कित्‍येक तर साधीसाधी माणसे असतात. त्‍यांना व्‍यक्तिशः कुठलाही धनलाभ होत नाही. ते कुठलेही मठ वा पंथ स्‍थापत नाहीत. मग तिथें बुवाबाजीचा प्रश्न कुठें  येतो ?

 

  • माझा स्वत:चा एक अनुभव :

माझ्या स्वत:च्या ओळखीच्‍या एक वृद्ध आजीबाई पुण्‍याला रहात असत. त्‍यांना काहीतरी आगळी अशी ‘शक्ती’ प्राप्‍त आहे असे अनेक परिचित सांगत. बाई संसारी होत्‍या. या शक्तीपासून कसलाही व्‍यक्तिगत लाभ त्‍यांनी होऊ दिला नाही. आर्थिक लाभ तर दूरच, पण त्‍यांनी आपल्या  शक्तीचें कसलेही भांडवल केलें नाही, स्‍तोम माजवलें नाही. स्‍वतःच्‍या सिद्धीचा त्‍यांनी कधी उल्‍लेखही केला नाही. ‘ते म्‍हणतात’ अशा शब्‍दांनी सुरुवात करून त्‍या काय तें सांगत. ‘ते’ म्‍हणजे त्‍या वृद्ध बाईंचे दिवंगत गुरु. अशी कुठलीही वेळ ठरवलेली नव्हती ( उदा. , गुरुवार संध्याकाळीं ) ,  की ज्या वेळी बाईंना भेटायला येऊन लोक त्यांना कांहीं प्रश्न विचारताहेत, पायाशी फूल-नारळ वगैरे ठेवताहेत . छे: ! त्या आजी तर  कुणालाही असें भेटतच नसत.  अगदी जवळच्या परिचितांनाच त्या काय तें सांगत असत, अन् तेंही आधी ठरवून असें नव्हेंच . आपण प्रश्न विचारायचेच नाहींत. पण अगदी अचानक, उत्स्फूर्तपणें त्यांना जें कांहीं सुचे, व त्या तें सांगत .

 

त्‍या आजींच्‍या सिद्धीचा मला स्‍वतःला एकदा नव्‍हे तर दोन वेळा अनुभव आलेला आहे. पण त्‍यामागील वैज्ञानिक स्पष्‍टीकरण मात्र मला माहीत नाही.  जर इतर कुणी मला अशा प्रकारचा अनुभव सांगितला असता, तर त्यावर विश्वास ठेवणें मला स्वत:लाही जड गेलें असतें. असा अनुभव फक्त ‘प्रत्‍यक्षप्रमाण’ च्‍या सूत्राप्रमाणेंच पटूं शकतो.

 

  • एक शक्यता , एक आशा : 

मी अंधश्रद्ध नाहीं, रूढिवादी नाहीं. कसलीही अंधश्रद्धा न बाळगतां, मला असें वाटतें की अशा प्रकारच्या कांहीं शक्‍ती माणसाच्‍या मेंदूत सुप्‍त स्थितीत असतात आणि फक्‍त काही व्‍यक्‍तींच्‍या ठिकाणीच त्‍या जागृत होत असतात. त्‍यांचा पद्धतशीर अभ्‍यास झाला , व त्‍यांचें रहस्‍य थोडें जरी उलगडलें तर , न जाणो, त्‍यातून मानवाच्‍या प्रगतीसाठी कांहीं नवीन सूत्र सापडूंही शकेल.

 

  • एक विचार  :  ‘खरा महात्‍मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यातील फरक  :

अखेरीस एक विचार मांडावासा वाटतो, आणि तो म्‍हणजे, ‘खरा महात्‍मा’ व एखादा ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यातील फरक.

आज अनेक लोक ‘बुवाबाजी’ करत आहेत ही गोष्‍ट नाकबूल करता येणार नाही. अंधश्रद्धेचे उच्‍चाटन झालेले नाही व तथाकथित ‘बुवा’ वा ‘स्‍वामी’ त्‍याचा फायदा घेतात, हे स्‍वाभाविकच आहे. म्‍हणून ‘खरा महात्‍मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यात फरक करायला एकच कसोटी लावायला हवी. अतींद्रिय शक्ति अथवा सिद्धि किंवा चमत्‍कार, ही ती कसोटी नव्‍हेच !  ती कसोटी आहे ‘प्रत्‍यक्ष आचरण’ . ज्‍या व्‍यक्ती स्‍वतःच्‍या सुखदुःखाची पर्वा न करता, निःस्‍वार्थ बुद्धीनें निरलसपणें परहितासाठी झटतात, तेच खरे महात्‍मे ; मग ते चमत्‍कार दाखवोत वा न दाखवोत, त्‍यांना सिद्धी प्राप्‍त असो वा नसो. आणि जे खर्‍याखोट्या चमत्‍कारांनी लोकांना भुलवून स्‍वतःची तुंबडी भरतात, ते बुवाबाजी करतात, असेंच म्‍हणायला हवें . समजा, त्‍यांच्‍या अतींद्रिय शक्‍ती पुढेमागे अगदी सिद्ध झाल्याच , तरीही ते ढोंगी बुवाच !

  • भारतात ‘टॉलरन्स्’ तसेंच ‘सत्यान्वेषण’ यांची दीर्घकालीन  परंपरा आहे. त्या मार्गानें,   ‘ओपन-माइंडेड्’ बुद्धिवादी व इतर विचारवंत हंसाप्रमाणें नीरक्षीरविवेक वापरून,  हा फरक जाणून घेऊ शकतील अशी आशा करावी कां ?

+ + +

[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती  दि. ०१.०७.१९७६.

बदल  :  दि. १५.०२.२०१८ ]

+ + +

 

– सुभाष स. नाईक    Subhash S. Naik
मुंबई.
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com  ,  www.snaehalatanaik.com

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..