एव्हरेस्ट हिमालयाच्या कुशीत विसावलेले जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर ८८४८ मीटर. जगातील गिर्यारोहकांनी त्याचा माथा सर करण्याचे १९ व्या शतकापासून पाहिलेले स्वप्न अखेर २९ मे १९५३ रोजी पूर्ण झाले. त्या दिवशी एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोरगे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला.या घटनेला आज २९ मे रोजी ६७ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत जगभरातील असंख्य कसलेले गिर्यारोहक, साहसी वृत्तीचे व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले पर्यटक यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यात विविध वयोगटाच्या स्त्री-पुरुष गिर्यारोहकांचा समावेश आहे.
दरवर्षी एव्हरेस्टच्या मोहिमांदरम्यान विविध प्रकारचे विक्रमही नोंदविले जातात. गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे की नाही याबद्दल जगभर जरी वाद सुरु आहे. मात्र निसर्गातील प्रतिकुलतेशी गिर्यारोहणात झुंजल्याशिवाय कोणत्याही शिखर किंवा सुळक्याचा माथा सर करताच येत नाही या वस्तुस्थितीबाबत मात्र कोणाचेही दुमत नक्कीच नाही.
एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी एप्रिल ते जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत अनेक चढाई मोहिमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या गिर्यारोहकांची सरासरी संख्या दरवर्षी तीनशे ते चारशे इतकी असते. त्यातील काही जणांच्या हाती यश किंवा अपयश लागते. काही जणांचा चढाई दरम्यान अपघातात मृत्यू ओढवितो. मात्र एव्हरेस्टचा माथा सर करायचाच ही जिद्द अनेकांच्या मनात अभंग उरते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply