नवीन लेखन...

महिला दिन – वाचा आणि विचार करा

  • अगदी पुरातन काळात, जेव्हां मनुष्यप्राणी ‘हंटर-गॅदरर’ अशा प्रगतीच्या स्थितीत (डेव्हलपमेंटल् स्टेज्) होता, तेव्हां स्त्री आणि पुरुष यांच्या कामांची सर्वमान्य अशी वाटणी झालेली होती, व स्त्री-पुरुष समानता होती.
  • मनुष्यप्राणी शेती करूं लागला तेव्हांही कामांची विभागणी होती, व स्त्रीची स्थिती (पोझीशन) बरोबरीची (ईक्वल्) होती.
  • पुरातनकाळात मातृदेवतेला समाजात मानाचें स्थान होतें. पृथ्वी काय , किंवा स्त्री काय, ‘उत्पादन’ ( प्रॉडक्शन्) हा गुण फक्त त्यांच्याकडेच होता. म्हणुन त्यांना त्या समाजात मान होता.
  • वेदोपनिषदीय काळात आपल्याला मैत्रेयी, गार्गी, लोपामुद्दा अशा ज्ञानवंत स्त्रिया आढळतात. पण हा मान नंतरच्या काळातील स्त्रियांना मिळाला नाहीं.
  • मात्र, रामायणकाळीं स्त्रीची जागा ‘खालच्या पायरीवर’ गेलेली ( लोअर लेव्हल् ) दिसते. ज्याला मर्यादापुरुषोत्तम असें अभिधान आहे, अशा रामानें सीतेला लंकेत अग्निदिव्य करायला लावलेंच! आणि त्यानंतरही (संदर्भ-उत्तररामचरित्र) , एका रजकाच्या ( धोब्याच्या ) बोलण्याच्या अनुषंगानें रामानें सीतेला वनवासाला धाडलें, सीतात्याग केला. सीतेनें त्या गोष्टीचा प्रतिवाद कसा केला , तर स्वत: जमिनीत सामावून जाऊन !
  • महाभारत काळात, जर पती मेलेला असेल किंवा ‘अकार्यक्षम’ असेल तर, स्त्रीला नियोगाला सामोरें जावें लागे. पंडूनें स्वत:च कुंतीला नियोगानें संतती उत्पन्न करायला सांगितलें होतें. तिनें माद्रीलाही सामील करून घेतलें.
  • विचित्रवीर्याचा मृत्यू झाला तेव्हां तो निपुत्रिक होता. तेव्हां सत्यवतीनें तिच्या सुना अंबिका व अंबालिका यांना नियोग करायला लावला होता. नियोग म्हणजे, परपुरुषाशी समागम. आणि, हा समागम स्त्रीनें राजीखुशीनें केला असेलच असें नाहीं. कारण तसें असतें तर धृतराष्ट्र व पंडु हे दोघेही ‘व्यंग असलेले’ असे निपजले नसते.
  • नियोगानंतर उत्पन्न झालेल्या संततीवर त्या स्त्रीच्या पतीचा अधिकार कसा ? तर त्यासाठी ‘बीज-क्षेत्र न्याय’ हा नियम वापरला जात असे. त्याचा अर्थ असा की – बीज ( बी) कुठल्याही शेतात पडलें तरी, येणार्‍या पिकावर अधिकार असतो तो त्या शेताच्या मालकाचा. म्हणजे, स्त्री ही एका शेतासमान मालमत्ता आहे आणि तिचा पती हा तिचा मालक आहे !
  • स्त्री ही ‘प्रॉपरटी’ आहे, असा समज त्या काळीं होताच ! राजकन्येचें लग्न हा एक राजकीय व्यवहार होता. म्हणूनच गांधारीचें लग्न आंधळ्या धृतराष्ट्राशी झाले. तिनें त्याचा प्रतिवाद कसा केला, तर डोळ्यांवर पट्टी बांधून ! बिचारी आणखी काय करूं शकणार होती ?
  • स्वयंवर म्हणजे खरें तर, ‘राजकन्येनें स्वत: वराचें चयन करायचें’ असें अभिप्रेत आहे. पण ज्याला पुरातन साहित्यात स्वयंवर म्हटलेलें आहे, तें खरोखरच ‘स्वयंवर’ होतें कां ? मुलीचा पिता एक ‘पण’ लावीत असे, आणि त्यात जो सफल होत असे, त्याच्याशी त्या राजकन्येचा विवाह होत असे. अनुक्रमें राम व अर्जुन यांच्याऐवजी जर कुणी दुसर्‍यानें ‘पण’ पूर्ण केला असता, तर सीता व द्रौपदी यांना त्या त्या पुरुषाशी विवाह करावा लागला असता.
  • आणि अगदी कथानायक अर्जुनानें द्रौपदीसाठीचा ‘पण’ पूर्ण करूनही, पुढें काय झालें ? द्रौपदीला पाची भावांशी विवाह करावा लागला.  जशी कांही ती एखादी वस्तू होती, जी ‘कॉमन प्रॉपरटी’ होऊं शकते !

[द्रौपदीच्या व्यथेची थोडीशी कल्पना (संपूर्ण नव्हे) आपल्याला इरावरी कर्वे यांच्या ‘युगान्त’ मधील द्रौपदीवरील लेख वाचून येते ].

  • एखाद्या पुरुषानें मुलीला पळवून/ जिंकून नेऊन तिच्याशी विवाह करणें समाजाला मान्य होतें. त्याला ‘राक्षस विवाह’ म्हणत. भीष्मानें अंबा-अंबिका-अंबालिका यांना असा प्रकारेंच पळवून नेलें होतें, व तेंही स्वत:च्या भावाकरता. खरें म्हणजे, स्त्री काय एखादी वस्तू आहे की जिला जिंकून आणावें ? पण तरीही , विचित्रवीर्याकडे एवढेंही शौर्य नव्हतें की स्वत:च्या बळावर त्या काशीराजपुत्रींना ‘जिंकून’ आणूं शकेल.
  • अंबेच्या कहाणीनें तर स्त्रीची हतबलता स्पष्ट होते. समाजातील प्रथेची आणि शाल्वाच्या पुरुषी अहंकाराची, त्याच्या  भ्रामक स्वप्रतिष्ठेच्या कल्पनेची , बिचारीअंबा शिकार झाली. अंबेचे क्लेश हे स्त्रियांचें प्रातिनिधिक क्लेश आहेत. ( १९४७ ला फाळणीव्या वेळीं स्त्रियांचें काय झालें, कसा त्यांच्या कुटुंबियांनी, पतीनें , त्यां चा अस्वीकार केला, याच्या कितीतरी ‘नोऽन्-अन् नोऽन्’ कहाण्या आहेत ).
  • रुक्मिणीनें कृष्णाला प्रेमपत्र धाडलें होतें, ही कथा खरी नाहीं. वस्तुत: तिचा विवाह शिशुपालाशी होणार होता. त्याला कृष्ण हजर होता. तेथून त्यानें रुक्मिणीला तिच्या विवाहापूर्वीच पळवून आणलें.
  • आणि म्हणून, राजकन्या असूनही, रुक्मिणीचें स्थान नेहमीच सत्यभामेपेक्षा ‘खालचेंच’ राहिलें. रुक्मिणी फार समंजस होती म्हणतात. असेलही. पण खरें तर, तिला दुसरें कांहीं गत्यंतरही नव्हतें.
  • कुणी म्हणूं शकेल की या तर पुरातन कालच्या गोष्टी झाल्या. म्हणून आपण मध्ययुगातही डोकावूं.
  • मध्ययुगीन युरोपमध्ये जेव्हां एखादा सरदार युद्धावर जात असे, तेव्हां तो पत्नीला ‘चॅस्टिटी बेल्ट’ बांधायला लावी, आणि त्याची किल्ली स्वत:कडे ठेवी. म्हणजे, आपल्या गैरहजेरीत बायकोचें ‘शील’ सुरक्षित रहावें. ( म्हणजेंच, खरें तर, तिने अन्य कुणाशी संग करूं नये ). किती मोठें हें ह्यूमिलिएशन ! पण तें स्वीकारण्यांवाचून तत्कालीन स्त्रियांना गत्यंतरच नव्हतें !
  • आधुनिक युगात, स्त्रियांना मतदानाचा अधिकार झगडूनच मिळवावा लागला. अन् , खरें तर जागतिक महायुद्ध झालें नसतें तर, तोही कधी मिळाला असता, हा प्रश्नच आहे ! या युद्धांमुळे जगाची खूपच हानी झाली हें खरें, पण त्यांच्यामुळेंच स्त्रियांना घराबाहेर पडतां आलें, नोकरी करतां आली, आर्थिक स्वातंत्र्य मिळालें , हें नाकबूल करतां येणार नाहीं. त्यामुळे, कदाचित् , स्त्रिया , या महायुद्धांना दुवाही देत असतील !
  • आजही अशा अनेक बायका आहेत की ज्या शक्तीबाहेर काम करून घर चालवतात; आणि ज्यांचा नवरा फक्त दारू पिऊन मारहाण करतो.
  • एकपत्नी कायदा असतांनाही, एका धर्मातले पुरुष ४ विवाह करूं शकतात. अर्थातच, हा अधिकार स्त्रियांना नाहीं. पुरुष तीन वेळा ‘तलाक़’ असें बोलून ( किंवा ई-मेलनें पाठवूनही) विवाहबंधन सहज तोडूं शकतो. स्त्रियांना हा अधिकार प्राप्त नाहीं , हें सांगणें नकोच.
  • आजही स्त्रियांना शनी शिगणापुर, साबरीमाला असा स्थानीं प्रवेश मिळावा म्हणून झगडावें लागतआहे !
  • आजही ‘#मीऽ टू’(#Me Too) , ‘राइट् टु पी’ (Right to Pee) यांसारख्या movements (चळवळी) स्त्रियांना  कराव्या लागत आहेत.
  • आजही नायजीरियातील कांहीं जमाती, भारतातील बोहरी जमात, कजंजरभाट जमात, अशा विविध जमाती-जनजातींमधल्या स्त्रियांना ‘खटनी’ ला (circumcision of female genitalia) सामोरें जावें लागतें.
  • आजही स्त्रियांना ‘रेऽप (Rape) , ‘इन्डीसेन्ट् टच्’ (Indecent Touch), अशा अपमानांना सामोरें जावें लागतें आहे ! डॉ. स्नेहलता नाईक या सोशल सायंटिस्ट सांगतात , ‘स्त्री कितीही शिकलेली असो, कितीही पुढारलेल्या समाजात रहात असो, कुठल्याही वयाची असो, तिला नेहमीच संभाव्य रेऽपची चिंता  वाटते, आणि असुरक्षित वाटतें’. ( यावर अधिक टिप्पणीची गरज नाहीं ) .
  • आजही जेव्हां एखादी मेरिल् स्ट्रिप् किंवा अन्य कुणी सुशिक्षित स्त्री कांहीं टिप्पणी करते, तेव्हां एखादा उच्चपदस्थ ‘मुजोर’ पुरुष स्त्रियांबद्दल खालच्या दर्जाची  कॉमेंट् करतो ! , आणि,  स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच नको होता, अशी टिप्पणी त्याच्याकडून केली जाते.
  • या सगळ्याचं सार काय – ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयीं अमृत नयनीं पाणी’.
  • महिला दिन साजरा करून काय साधतें, कल्पना नाहीं. तो साजरा करा किंवा करूं नका, पण स्त्रीला समाजातलें तिचें हक्काचें   , बरोबरीचें स्थान मात्र द्या.
  • एक आगळा विचार मनांत आला – हिजडे फक्त स्त्रियांची वस्त्रें घालतात. पण एखाद्या ‘मुजोर’ , पुरुषी-संस्कृतीप्रमानें वागून स्त्रियांना ‘खाली पहाणार्‍या’ , अपमानित करणार्‍या, त्यांचा गैरफायदा घेणार्‍या कुणा पुरुषाला, ‘सेक्स्-चेंज्’ची ( लिंग-बदल) शस्त्रक्रिया करून जर ‘स्त्री’ बनवलें , ( हल्ली अशी शस्त्रक्रिया सहज शक्य आहे, व केलीही जाते), तर काय होईल ? त्याचा मुजोरपणा स्वत: ‘स्त्री’ बनल्यावर तसाच राहील कां ? नाहीं  नाहीं, तो  खचितच बदलेल ! ‘वेअरर नोऽज् व्हेअर दु शूऽ पिंचेस् ’. तसेंच नक्की त्याचें होईल. असें जर कांही पुरुषांच्या बाबतीत केलें गेलें , तर समाजमन बदलायला वेळ लागणार नाहीं.

कायद्यानें आपल्याला (अगदी सरकारलाही)  तसें करतां  येणार नाहीं, हें खरें; पण कल्पना करायला , आणि एकीकडे समाजधुरीणांना आणि दुसरीकडे अत्याचार्‍यांना, तशी (केवळ ) कल्पना तरी करायला सागण्यांस , काय हरकत आहे  ?  किमान, त्यांना त्या  प्रकारचा ‘रोऽल् प्ले’ ( Role Play) तरी करायला लावावा ! कदाचित् त्या सर्वांतून कांहीं चांगलें निघेलही !

 

  • ताजा कलम – पुरुष स्त्रियांवर अन्याय करत आलेले आहेत, हें तर सिद्धच आहे. पण स्त्रियाही स्त्रियांवर अन्याय करतात ! अरेरे ! सुनेला जाच करण्यांत , सुनेला जाळण्यांत, सासू हिरिरीनें भाग घेते , तें कां ? ‘क्वीन बीऽज्’ ( Queen Bees , अर्थात् उच्चपदस्थ स्त्रिया) या आपल्या संस्थेतील, स्वत:पेक्षा ज्यूनियर स्त्रियांशी उद्धटपणें (rudely) वागतात , त्यांना जाच करतात (संदर्भ- टाइम्स् ऑफ् इंडिया, दि. ०६-०३-२०१८) , तिथें त्यांची आंतरिक  insecurity काम करत असते काय ? यशस्वी होण्यांसाठी पुरुषाला जेवढे प्रयत्न करावे लागतात, त्याच्या दसपट प्रयत्न यशस्वितेसाठी स्त्रियांना करावे लागतात ,असें  बरेच विचारवंत म्हणतात. या बाबीचा स्त्रियांच्या मानसिकतेवर कितपत परिणाम होत असेल ?

स्त्री जरी ‘वरच्या पोस्ट’वर पोचली, तरी तिचे सहकारी (colleagues) तिला योग्य तो मान देत नाहींत. खरें तर, तो मान ‘केपेबलिटी’ला आहे, असायला हवा ; ‘स्त्री वा पुरुष असणें’ या बाबीला  नव्हे. आणि तसें न झाल्यास, तें स्त्रियांना अपमानास्पद वाटणारच !

जसें दलितांना शतकानुशतकें समाजातील ‘खालचा दर्जा’ सहन करावा लागला, आणि त्यामुळे आज त्यांच्यातील असंतोष खदखदून बाहेर पडत असतो ;  तशाच प्रकारच्या भावनेचें  पण वेगळ्या प्रकारचें प्रगटीकरण या सासवा, या ‘क्वीन बीऽज्’ यांच्या वर्तणुकीत होत असेल काय ? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

मात्र, ‘जेंडर-बेस्ड् अन्इक्वॅलिटी’ दूर व्हावी म्हणून प्रयत्न होत असतांना,  स्त्रियांनी स्वत:च स्त्रियांशी अयोग्यप्रकारें वागूं नये, अशी अपेक्षा  करावी काय  ?  ‘आपण विरुद्ध जग’ ही वृत्ती कुठपर्यंत खेचायची, हेंही महत्वाचें आहे.

 

  • अंतिमत: – स्त्रियांना समानता मिळावी म्हणून स्त्रिया लढा देतच आहेत. त्यात त्यांना सपोर्ट करणें, कृतिद्वारें साथ देणें, हें पुरुषांचें कर्तव्यच आहे, आणि तें त्यांनी पाळायलाच हवें. त्याचबरोबर, एकीकडे समाजाशी लढत असतांना, आपल्याच ‘गटातील’ इतरांना (म्हणजे अर्थातच अन्य स्त्रियांना ) , आपण स्वत: ‘फेअर ट्रीटमेंट्’ ( fair treatment ) देणें हेंच योग्य आहे, याचें भान महिलांनी सुटूं न देणें श्रेयस्कर आहे.

‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे.

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
मुंबई
M-9869002126.
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik .com ;  www.snehalatanaik.com

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..