नवीन लेखन...

बिनतारी यंत्रणेचा शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी

बिनतारी यंत्रणेचा जनक असलेल्या गुग्लिएल्मो मार्कोनीचे बालपण त्याच्या पूर्वजांनी १६०० साली बांधलेल्या आणि पिढय़ान्पिढय़ा वापरात असलेल्या इटलीमधल्या घरात गेले. अॅवनी नाव असलेली त्याची आई श्रीमंत ब्रिटिश घराण्यातली होती. अनेक शास्त्रज्ञांनी हॅन्रिच हर्ट्झच्या बिनतारी संदेशांच्या प्रयोगांमधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व स्वत:ही तसेच प्रयोग करून तपासले होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्षात असतात या विषयी कुणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींच्या संदर्भात मांडलेली समीकरणेसुद्धा पडताळून पाहतात येतात, हेही अनेक जणांना पटले होते. पण या सगळ्याचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते. पण या सगळ्यांहून वेगळा विचार करणारे कोणीतरी जन्माला येणे स्वाभाविकच होते.

गुग्लिएल्मो मार्कोनीच्या रुपाने असा माणूस पृथ्वीवर अवतरलाच. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनीने या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले. बोलोग्ना विद्यापीठातल्या ऑगस्टो रिघीने हर्ट्झच्या बिनतारी लहरींविषयी एक लेख लिहिला होता. तो वाचून मार्कोनीचे या विषयातले कुतूहल वाढले. मार्कोनीला रिघीकडे हर्ट्झने वापरलेले उपकरण मिळाले. त्याचा वापर करून त्याने आपले प्रयोग करायला सुरुवात केली. त्या उपकरणात बदल करून त्याने नंतर आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उभी केली. त्यावेळी त्याचे वय फक्त २० वर्षे होते. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या लक्षात एक गोष्ट अगदी पटकन आली होती, ती म्हणजे बिनतारी लहरींचा प्रत्यक्षात काही उपयोग करून दाखवायचा असेल तर त्या लहरी आपण दूरवर प्रवास करू शकतात हे सिद्ध करू शकलो पाहिजे.

अगदी थोडय़ा अंतरावर या लहरी पाठवून काहीच साध्य होणार नाही. हे त्याने ओळखले होते. तसेच या सगळ्याचा खर्च तारांमधून होत असलेल्या संदेशवहनाच्या खर्चाच्या तुलनेत कमी असला पाहिजे. नाहीतर एवढा खटाटोप करून लोक बिनतारी संदेशवहनाकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीत, याचीही त्याला जाणीव होती.

सुरुवातीला मार्कोनीनं आपल्या घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत बिनतारी संदेश पाठवायचा प्रयोग करून बघितला. त्यात यश आल्यानं त्याला हुरूप आला. पण पुढचे प्रयोग करायचे तर त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याच्या वडिलांना सुरुवातीला हे सगळं खूळ वाटायचं. पण मार्कोनीचा चुलतभाऊ असलेल्या डेझीवर त्यांचा विश्वास होता. तोही मार्कोनीच्या प्रयोगांमध्ये तथ्य आहे, असं म्हणायला लागल्यामुळे मार्कोनीच्या वडिलांनी नाराजीनं का होईना, पण ५०० लिरा मार्कोनीला खूप प्रश्न विचारून दिल्या. आता मार्कोनीनं आपले प्रयोग उघडय़ा वातावरणात करायला सुरुवात केली. त्या वेळी जितका जास्त उंच अँटेना वापरू तितका आपल्या बिनतारी संदेशाचा प्रभाव जास्त जाणवतोय आणि आपण जास्तीत जास्त अंतरावर संदेश पाठवू शकतोय हे मार्कोनीच्या लक्षात आलं. लवकरच तो शेकडो मीटर्स अंतरावरसुद्धा संदेश पाठवू शकतोय हे मार्कोनीच्या लक्षात आलं. लवकरच तो शेकडो मीटर्स अंतरावरसुद्धा संदेश पाठवू शकायला लागला.

१८९५ साली मार्कोनीनं केलेल्या या प्रयोगांमध्ये त्याला त्याच्या २९ वर्षे वयाच्या अल्फोन्सो नावाच्या भावाची आणि एका तरुण शेतकऱ्याची खूप मदत झाली. आता मार्कोनीनं एकीकडे उभं राहायचं, त्याच्या भावानं दूरच्या अंतरावर आणि मग मार्कोनीनं बिनतारी संदेश मॉर्स कोडच्या टिंब-रेघ या भाषेत पाठवायचा आणि मग तो यशस्वीपणे मिळाला की भावानं बंदुकीचा बार काढायचा असे संकेत ठरले. असे संदेश मार्कोनी आता कित्येक मीटर्स अंतरावर पाठवू शकायला लागला. एकदा तर मॉर्स आणि अल्फोन्सो यांच्यामध्ये एक टेकडी असूनसुद्धा संदेश एकीकडून दुसरीकडे गेले.

मार्कोनीच्या संशोधनाला खूप महत्त्व आणि आर्थिकदृष्टय़ा किंमत येणार हे आता हळूहळू सगळय़ांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे इंग्लंडच्या टपालखात्यानं मार्कोनीचं पेटंट विकत घ्यायची तयारी दाखवली, पण मार्कोनीनं त्याला साफ नकार दिला आणि त्याऐवजी वायरलेस टेलिग्राफ अँड सिग्नल कंपनी या नावानं स्वत:ची कंपनी काढली. या कंपनीत गुंतवणूकदारांनी त्या काळाच्या मानानं खूप जास्त म्हणजे १ लाख पाऊंड्सची गुंतवणूक केली. आपल्या वडिलांच्या सल्ल्यावरून १९०० साली मार्कोनीनं या कंपनीचं नाव बदलून मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी लिमिटेड असं केलं.

१८९७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मार्कोनीनं एका हॉटेलमध्ये आपल्या बिनतारी तारायंत्राचं कायमस्वरूपी प्रेक्षपण केंद्र उभं केलं. तिथून बॉर्नमथला बिनतारी संदेशांच्या माध्यमातून तारा पाठवायची सोय मार्कोनीनं केली.

त्याच वर्षी नंतर मार्कोनीला त्याचं पहिलं व्यावसायिक कंत्राट मिळालं. लंडनच्या लॉईड्स समूहानं ‘स्टीम बोटी किनाऱ्याला पोहोचल्याची वार्ता मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेतून पोहोचवता येईल का?’ अशी विचारणा केली. त्याबद्दल अनेक चाचण्या करून मार्कोनीच्या कंपनीनं लॉईड्सला तशी यंत्रणा बनवून दिली. १८९८ सालच्या जुलै महिन्यात डब्लिनमधल्या एका वृत्तपत्रानं मार्कोनीला एका बोटींच्या स्पर्धेचं वर्णन ती चालू असतानाचा पाठवण्याच्या कामासाठीचं कंत्राट दिलं. त्यामुळे प्रत्यक्षात ही स्पर्धा न बघतासुद्धा अनेक लोकांना या स्पर्धेचं जवळपास थेट वर्णन वाचायला मिळालं.

त्याचबरोबर मार्कोनीची यंत्रणा बरंच अंतर पार करून आणि अनेक प्रकारचे अडथळे ओलांडूनसुद्धा बिनतारी संदेश पाठवू शकते हेही सिद्ध झालं. यामुळे व्हिक्टोरिया राणी तिचा मुलगा राजपुत्र एडवर्ड यांनी खूश होऊन ओसबोर्नमधल्या राणीच्या महालापासून राजपुत्र या बोटीतून लांब लांब फिरायचा. त्या बोटीमध्ये एक बिनतारी संदेशवहनाची यंत्रणा उभी करायला सांगितलं. ते होताच १८९८ सालच्या ऑगस्ट महिन्यापासूनच राणी राजपुत्राबरोबर आजकालच्या अति लोकप्रिय असलेल्या ‘एसएमएस’चं बाळबोध स्वरूप वापरत होती.

गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म २५ एप्रिल १८७४ रोजी झाला. २० जुलै १९३७ रोजी त्यांचे निधन झाले.

अच्युत गोडबोले, अतुल कहाते
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..