आजच्या लोडशेडिंगच्या जमान्यात इनव्हर्टर हे यंत्र सर्वांना परिचयाचे झाले आहे. ‘… इनव्हर्टर असेल तर सारं चालेल निश्चिंतपणे’ ही जाहिरातही आपण पाहतो आहोतच, वीज नसली तर आपली घरातील सर्व उपकरणे बंद पडतात, पण इनव्हर्टरमुळे आपण ती वीज नसतानाही काही काळासाठी चालवू शकतो अगदी संगणकासोबत आपण जो यूपीएस वापरतो तो इनव्हर्टरचाच प्रकार असतो, त्याला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय असे म्हणतात. विद्युतप्रवाह हा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह असतो. त्यात डायरेक्ट करंट (डीसी) व अल्टरनेटिंग करंट (एसी) असे दोन प्रकार असतात.
मुंग्या जशा एकाच दिशेने शिस्तीत चालताना दिसतात, तसा एकाच दिशेने जाणारा विद्युतप्रवाह म्हणजे डायरेक्ट करंट असतो, तर सतत पुढे मागे हलणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह हा अल्टरनेटिंग करंट असतो. यात दिशा सतत बदलत असते, त्यामुळे त्याला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. कुठल्याही डीसी विद्युतप्रवाहाचे रूपांतर एसी विद्युतप्रवाहात करणाऱ्या यंत्राला इनव्हर्टर असे म्हणतात. रेक्टिफायरच्या अगदी विरोधी असे हे तंत्र आहे. यात इंडक्टर्स, कॅपॅसिटर्स वापरून यात विद्युतप्रवाहाचे रूप बदलले जाते. यात ट्रान्सफॉर्मरचा वापरही केलेला असतो. इनव्हर्टर्सचे तीन प्रकार तांत्रिकदृष्ट्या सांगितले जातात त्यात साईन वेव्ह इनव्हर्टर, मॉडिफाईड साईन वेव्ह इनव्हर्टर व स्क्वेअर वेव्ह इनव्हर्टर हे तीन प्रमुख प्रकार आहेत.
यातील मॉडिफाईड साईन वेव्ह इनव्हर्टर हा तांत्रिकदृष्ट्या अधिक योग्य आहे. प्युअर साईन वेव्ह इनव्हर्टर हा आणखी प्रकार अधिक सक्षम मानला जातो, पण तो महाग असल्याने त्याचा वापर काही विशिष्ट कारणांसाठीच केला जातो. ५० व्होल्ट अॅम्पियरपासून ते ५०००० व्होल्ट अॅम्पियरपर्यंत इनव्हर्टर उपलब्ध असतात. इनव्हर्टर खरेदी करताना आपल्याला घरातील नेमकी किती उपकरणे त्याच्यावर चालवायची आहेत याचा विचार करावा लागतो, तसेच साधारणपणे कुठले यंत्र किती वीज वापरते याचाही अंदाज त्यासाठी घेणे आवश्यक असते. साधारणपणे दोन पंखे, दोन ट्यूब लाईट व एक टीव्ही एवढी साधने चालवायची असतील तर त्यासाठी ३८० वॉट वीज लागते व इनव्हर्टरमध्ये वाया जाणाऱ्या विजचे प्रमाण १.१५ धरले तर या ठिकाणी आपल्याला ३८० गुणिले १.१५ म्हणजे ४३७ व्होल्ट अॅम्पियर म्हणजे अदमासे ५०० व्होल्ट अॅम्पियर इतक्या पॉवर रेटिंगचा इनव्हर्टर घेणे उपयुक्त ठरते. व्होल्ट अॅम्पियरमध्ये लोड क्षमता दर्शवली जात असते.
Leave a Reply