अगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच . २०२० च्या सुरुवातीलाच आर्थिक क्षेत्रात जी पडझड या कोरोनामुळे झाली त्यामुळे गुंतवणुकीचे पर्याय पूर्णपणे बदलले . किंबहुना असेही म्हणता येईल की मध्यम व उच्च मध्यम वर्गास हे पर्याय सक्तीने बदलावे लागले . आतापर्यंत हा वर्ग व मुख्यत्वे करून निवृत्त वर्ग हा सुरक्षित ठेवी व वेळेवर मिळणारे व्याज यासाठी बँकांना अग्रक्रम देत होता . त्यांच्या घरचे नियोजन हे मिळणारे व्याज , मुदत ठेवींवर एकरकमी चांगल्या व्याजासह मिळणारी रक्कम यावर ठरत होते . बँकांविषयी आत्मीयता होती . पण कोरोनाचे झंझावाती आगमन अनपेक्षितपणे झाले .. आणि वाऱ्याच्या झोताने नारळाच्या झाडावरून धडाधड नारळ पडावे तसे बँकांचे व्याजदर खाली आले व अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे . त्यात काही बँकांनी नको ते फ्रॉड केले आणि बँकिंग क्षेत्र गुंतवणुकीसाठी पाठी ढकलले गेले . आता फक्त बँकांमधील गुंतवणूक राहू शकते . बँकांनी उत्पन्नासाठी सुरू केलेले अनेक चार्जेस यामुळे गुंतवणूक हा टॉप ऑप्शन बदलला आहे . DICGC चे वाढलेले कव्हर हा फक्त एक दिलासा सुरक्षिततेचा .
मग आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय कुठले ? यासाठी आपणाकडे सकारात्मक परिस्थिती आहे ती म्हणजे –
१. आजकाल सर्व युवा पिढी व नोकरदार , व्यावसायिक , हे computor savy झाले आहेत . चांगल्या तऱ्हेने लॅपटॉप , मोबाईल वापरू शकतात . उलट मोबाईलवर काम करणे सोपे झाले आहे . पेन ड्राईव्हमध्ये आर्थिक व्यवहार जतन करून ठेवता येतात , प्रिंटाऊट घेता येतो . बँका म्युच्युअल फंड , शेअर ट्रेडिंग सर्व दुनिया मेरी मुठ्ठी में !! शिवाय चोवीस तास सेवा .
२. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कायदे . गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी ( Investors
Protection ) SEBI ACT 1992 , Security Contract Regulation Act 1956 हे दोन कायदे महत्त्वाचे आहेत . गुंतवणूकदारांना या कायद्यांमुळे संरक्षण तर मिळतेच परंतु फसवणूक देखील होत नाही .
३. हल्ली सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी तरुण पिढी शेअर ट्रेडिंग करणे फायद्याचे समजते . त्यामुळे सर्व जण बँक बचत खात्याबरोबर DMAT खातेही उघडतात . योग्य मार्गदर्शन मिळवतात . यातही व्यवहार मोबाईलद्वारे करता येतात ही मोठी सोय आहे . आपण KYC NORMS पूर्ण केले की DMAT खाते सुरू करता येते . बँकांचे help desk चोवीस तास उपलब्ध असतात . आपल्या अडचणींचे निवारण ते त्वरित करतात .
४. SEBI ACT नुसार शेअर ट्रेडिंग , म्युच्युअल फंडांचे सर्व व्यवहार Contract Note द्वारे email व कुरिअरने कळवले जातात . गुंतवणूकदारास ते त्वरित तपासता येतात .
५. मुख्यत्वे करून टीव्हीवर आर्थिक व्यवहारांसंबंधी अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत . त्यातल्या त्यात CNBC – AWAZ , Zee BUSINES ही चॅनेल्स २४ तास उपलब्ध असतात . त्यात अनेक बाबींचे मार्गदर्शन केले जाते , सल्ला दिला जातो , यशस्वी गुंतवणूकदारांच्या मुलाखती घेतल्या जातात . याचा गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतो . SEBI तर्फे मार्गदर्शन मेळावे , सेमिनार्स आयोजित केले जातात . त्यांचे Investors Education Department कॉलेजेस , संस्थांना विनामूल्य लेक्चर्स देतात . या सकारात्मक बाबींवर गुंतवणूक पर्यायांचा विचार करता येईल .
बँकांनंतर हा योग्य पर्याय आहे . यात गुंतवणूक थोड्या काळासाठी ( Short Period ) नफा कमवण्यासाठी व दीर्घ मुदती ( Long Term ) साठी करता येते . मात्र यासाठी धीर असणे अत्यावश्यक आहे . शेअर मार्केट हे कधीही बदलणारे मार्केट आहे . नफा मिळेल पण वेळ आली तर तोटाही सहन करण्याची मनाची तयारी हवी . दुसऱ्या शब्दात धोका पत्करण्याची आणि या संबंधी basic knowledge ही पाहिजे . जसे जसे ज्ञान वाढेल तसे तसे Intra Day / Delivery / Derivatives व्यवहार करता येतात .
यासाठी बँकेत किंवा ब्रोकरकडे DMAT खाते उघडणे आवश्यक आहे .
दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक . ज्यांना शेअर ट्रेडिंग करणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे . आता तर प्रत्येक बँक , आर्थिक संस्था या क्षेत्रात आहेत व येत आहेत . गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे कारण
१. बँक व्याजदरापेक्षा यात परतावा जास्त मिळतो . बहुतेक फंड हे व्याजदरापेक्षा जास्त उत्पन्न देतात .
२. असे फंड अत्यंत तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून ( Fund Managers ) नियंत्रित केले जातात . आर्थिक क्षेत्राचा त्यांचा अनुभव असतो व शेअर बाजाराचा ट्रेंड बघून ते त्वरित निर्णय घेतात . ज्यामुळे फंड फायद्यातच आहेत . ग्राहक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे व वाढवणे अशी मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते .
३. SEBI ACT नुसार प्रत्येक म्युच्युअल फंडला दरमहा त्यांचा Investment Portfolio प्रसिद्ध करावा लागतो . तसेच फंड गुंतवणूकदाराला email द्वारे माहिती द्यावी लागते . ते बघितले तरी आपली गुंतवणूक फायद्यात आहे की नाही हे समजते व अपेक्षा पूर्ण होत नसेल तर फंडमधून बाहेरही पडता येते .
४. प्रत्येक फंड गुंतवणूकदारास जेव्हा लागेल तेव्हा किंवा दरमहा डिटेल स्टेटमेंट पाठवतात . त्यात आतापर्यंतची गुंतवणूक , किती युनिट्स आहेत , त्याची नक्त किंमत ( Net Asset Value ) कळवतात . त्यातच रक्कम काढण्याचा / वाढवण्याचा फॉर्मही दिला जातो . आणि मुख्य म्हणजे हे सर्व ONLINE होते .
५. यातील व्यवहार हे पारदर्शक असतात . ( काही अपवाद वगळता ) . आकडेवारी , ग्राफ , सिग्नल्स यातून सर्व माहिती मिळते . तर म्युच्युअल फंड असो वा शेअर ट्रेडिंग धोका दोन्हीतही असू शकतो व तसे Disclaimer Statement प्रत्येक जाहिरातीत , मीडियात दाखवले जाते . तेव्हा हा निर्णय स्वजबाबदारीवर घ्यायचा असतो .
आपले आवडते लेखक व . पु . काळे म्हणाले होते , ‘ आपण मध्यमवर्गीय लोक जेव्हा सोने खरेदी करतो तेव्हा आपला चेहरा आनंदाने फुललेला असतो , मात्र जेव्हा काही कारणामुळे सोने विकायची वेळ येते तेव्हा ती घटना अत्यंत क्लेशकारक असते . ‘ पण आता हे दुःख राहिले नाही , कारण GOLD ETF फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सोने घेऊन ते electronic स्वरूपात ठेवू शकतात . विकायचे तेव्हा मार्केट रेट व कुठलीही घट नाही ! मेकिंग चार्जेस नाही ! सोने मोडल्याचे दुःख नाही !!! सोन्याच्या वाढत्या किमती बघता दीर्घकाळासाठी हा उत्तम पर्याय आहे .
Income Tax वाचवणे हे तर आपले उद्दिष्ट , यासाठी टॅक्स सेविंग्ज फंडस् , डिपॉझिट्स योजना असतात . पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड अकाउंट , टॅक्स बचतीसाठी चांगले . पण १५ वर्ष थांबण्याची तयारी पाहिजे आणि मुख्य म्हणजे १५ वर्षानंतर रुपयाची किंमत काय असेल ? कमीतकमी ५०० रुपये व जास्तीत जास्त १,५०,००० रुपये यात गुंतवता येतात . NSC / किसान विकास पत्र यांची लोकप्रियता कमी झाली आहे .
मग विचार येतो कुठे गुंतवणूक करावी ? यासाठी अनेक वृत्तपत्रात मान्यवरांचे अभ्यासपूर्ण , आकडेवारीसह लेख असतात ते जरूर वाचावे . काही संस्था विनामूल्य सेमिनार घेतात , चांगली माहिती देतात . ते अटेंड करावे .
दुसरा पर्याय , FINANCIAL ADVISOR ( गुंतवणूक सल्लागार ) यांचा सल्ला घ्यावा . हा एक व्यावसायिक मार्ग आहे . ज्यांना मोठी गुंतवणूक करायची आहे त्यांना असे सल्लागार पुढील ५ – १० वर्षांची व १ ते ५ वर्षांची गुंतवणूक कशी , कोठे करावी याचा सल्ला देतात . मात्र त्यांची फी , त्यांची जनमानसातली प्रतिमा , प्रामाणिकपणा , नीतिमत्ता बघून मग व्यवहार करावा . सहसा असे सल्लागार चुकीचा सल्ला देत नाहीत . म्हणून कायम त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये रहावे .
तर असा आहे हा गुंतवणूक बाजार …
— अरविंद खडमकर
( माजी मुख्य प्रबंधक , स्टेट बँक ऑफ इंडिया )
Leave a Reply