नवीन लेखन...

गुंतवणूक – पोर्टफोलिओ आणि सोने

गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमती प्रचंड वेगात वाढल्या त्यामुळे सध्या सोने हे खूप महागडी गुंतवणूक ठरू शकते असे काहींचे म्हणणे आहे. यात थोडेसे तथ्य जरी असले तरीही आतापर्यंतचा इतिहास पाहता सोन्याच्या किमती खाली येण्याची शक्यता तशी कमी वाटते आणि घसरले तरीही जास्त घसरणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष बाळगलेले सोने कायम तुमच्या जवळ राहते,


गुंतवणुकीचा पोर्टफोलियो तयार करताना कुठलाही गुंतवणूकदार उपलब्ध असलेले गुंतवणूकेचे पर्याय, किमान गुंतवणुकीची रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी, रोकड सुलभता आणि अर्थातच मिळणारा परतावा इत्यादी बाबींचा विचार करत असतो. अजूनही सर्वसाधारण गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलियोत शेअर्स, म्यूचुअल फंड, मुदत ठेवी, कर बचतीच्या योजना, रोखे/बॉण्ड इत्यादी पर्यायांचा विचार करताना दिसतो. मात्र आपल्या पोर्टफोलिओत सोन्यातील गुंतवणूक समाविष्ट करावी का आणि करायची असल्यास त्याचे प्रमाण किती असावे याचाही विचार करायला हवा. गेल्या दशकभरातील बाजाराचा ट्रेंड पहिला तर पोर्टफोलियोमध्ये सोन्यातील गुंतवणूक आवश्यक वाटू लागली आहे. याच मुख्य कारण म्हणजे सोन्यातील गुंतवणुकीमुळे तुमचा तोटा कमी होऊ शकतो. हे कसे ते आपण आता सोदाहरणचं पाहूया :

एखाद्या आर्थिक वर्षात शेअर बाजार निर्देशांकात 12% घट झाली. मात्र त्याच आर्थिक वर्षात सोन्यात 9.5% नि वाढ झाली. म्हणजे तुमचा संपूर्ण पोर्टफोलियो शेअरमधील गुंतवणुकीत असेल तर तुम्हाला 12% तोटा होईल पण पोर्टफोलिओतील केवळ 5% गुंतवणूक जरी सोन्यात केली असेल तर तुमचा तोटा 1% नि कमी होऊन तो 11% वर येईल. आणि हेच प्रमाण 25% असते तर तुमचं तोटा कमी होऊन 6.7% आला असता. म्हणजेच पोर्टफोलियोमध्ये सोन्यातील गुंतवणूक ही तुमचा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा धोका कमी करते. अर्थात हेच उदाहरण शेअर बाजारवर गेला तर बदलूही शकते म्हणूनच पोर्टफोलियो बॅलेन्स्ड असावा. पोर्टफोलिओत सर्वच गुंतवणूक पर्यायांचा विचार करून समतोल गुंतवणूक केली तर ती फायद्याची आणि सुरक्षित ठरते. तज्ज्ञांच्या मते पोर्टफोलिओत सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण 15% पेक्षा जास्त नसावे. सध्याची शेअर बाजाराची परिस्थिती पाहता पोर्टफोलियोमध्ये सोन्याचा अंतर्भाव आवश्यक वाटतो.

रोकड सुलभता

कुठल्याही गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्याची रोकड सुलभता सर्वात जास्त आहे. म्यूचुअल फंड, मुदत ठेवी, शेअर्स किंवा पोस्टातील गुंतवणूक या सर्वांची द्रवणीयता चांगली असली तरीही  रोकड मिळायला तुम्हाला 1-2 दिवस लागतातच. सोन्यात गुंतवलेले पैसे मात्र तुम्हाला सराफाकडून ताबडतोब मिळू शकतात. गेल्या काही वर्षात सोन्याने उच्चांक गाठल्यापासून तर सोने तारण ठेवून तुम्हाला कर्जही लगेच मिळते. मुथुत, मन्नापुरमसारख्या कंपन्या तर केवळ सोन्यावरच धंदा करीत आहेत. सध्या आपल्या देशातील चालू खात्यातील तूट कमी करण्याकरिता सरकारने आणि रिजर्व्ह बँकेने सोन्याच्या आयातीवर कर लावून तसेच इतरही निर्बंध लादून या आणि दागिने बनवणाऱ्या कंपन्यांवर चाप बसवला आहे. अर्थात सोने आयातीवर मर्यादा घालून किंवा त्यावर शुल्क लावून देखील सोन्याच्या उलाढालीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. आतापर्यंतचा इतिहास पाहता मंदीच्या काळात, चलनवाढीत, युद्धाच्या वेळी किंवा अस्थिर राजकीय परिस्थितीत तुम्हाला तारणहार ठरत ते सोनेच. सोने आपण स्वतः जवळ बाळगत असल्यास शेअर्स किंवा इतर युनिट्स प्रमाणे ते हस्तांतर करायला कागदपत्रे किंवा स्टॅम्प ड्यूटी लागत नाही. सासूकडून सुनेला किंवा आजीकडून नातवाला अगदी सहजपणे सोने दिले जाते.

सोन्याचा भाव ठरतो कसा?

गेली काही वर्ष सर्वच गुंतवणूकदारांच्या चर्चेचा विषय असलेल्या या बहुमूल्य सोन्याचा भाव ठरवतं कोण आणि कसा? लंडनमध्ये रोज सकाळी 10.30 आणि दुपारी 3 वाजता लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) सोन्याच्या किमती ठरवते आणि जाहीर करते. या असोसिएशनमध्ये जगातील 100 हून अधिक मोठ्या बँका तसेच वित्तीय संस्था आणि सोन्याचे मोठे साठेदार सहभागी आहेत. याच असोसिएशनतर्फे सोन्या-चांदीचे प्रमाणीकरण, उलाढालीचे नियम आणि अर्थात किमतीचे नियंत्रण होते. या असोसिएशनमधल्या बहुतांश कंपन्या मार्केट मेकर्स म्हणून ओळखल्या जातात. रोज ठरलेल्या वेळी दोन कॉन्फरन्स कॉल्समध्ये मागणी आणि पुरवठा तत्त्वावर या किमती ठरवल्या जातात. जगभरातील एकूण सोन्याच्या उलाढालीपैकी 80% उलाढाल लंडन येथील या OTC (Over The Counter) वर होते. पुरवठा आणि मागणीबरोबरच आर्थिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती, चलनवाढ आणि चलन व्यवहारवरही सोन्याच्या भावाचा संबंध जोडता येतो. थोडक्यात जितकी अनिश्चितता वाढेल तेवढा सोन्याचा भाव चढेल. लंडनखेरीज न्यूयॉर्क, दुबई येथेही सोन्याच्या मोठ्या उलाढाली होतात. अर्थात तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला दिसणारा सोन्याचा भाव हा स्पॉट एक्स्चेंजवर ठरत असतो. लंडन मार्केटवरील ठरलेल्या किमतीवरून स्पॉट एक्स्चेंज वर (NSEL) उलाढालीत  दिसणारे भाव हे त्या वेळचे भाव असतात. त्यामुळेच गुंतवणूकदारांसाठी स्पॉट एक्स्चेंज वरचे भाव तर सर्वसामान्य माणसांसाठी पेढीवर दिसणारे भाव.  पेढीवर किंवा सराफाकडे दिसणारे भाव हे जाहीर झालेल्या भावापेक्षा कमी जास्त आढळतात. याची दोन मुख्य कारणे म्हणजे एकतर घाऊक बाजारातील आणि किरकोळ बाजारातील दारातील फरक तसेच लागू असलेले कर. त्यामुळे सोन्याचा भाव जो जाहीर होतो त्यात 2% फरक आढळेल. अर्थात सोनं विकत घ्यायचं असेल तर 2% जास्त आणि विकायचे असेल तर 2% कमी. लंडन, न्यूयॉर्क, झुरिक, इस्तंबूल, दुबई, सिंगापूर, हाँगकाँग, टोकिओ, मुंबई ही सोन्याच्या व्यापाराची महत्त्वाची जागतिक केंद्रे असून त्यांपैकी हाँगकाँग, झुरिक, लंडन व न्यूयॉर्क ह्या सोन्याच्या बाजारपेठा दररोज चोवीस तास व्यापारासाठी खुल्या असतात.

गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमती प्रचंड वेगात वाढल्या त्यामुळे सध्या सोने हे खूप महागडी गुंतवणूक ठरू शकते असे काहींचे म्हणणे आहे. यात थोडेसे तथ्य जरी असले तरीही आतापर्यंतचा इतिहास पाहता सोन्याच्या किमती खाली येण्याची शक्यता तशी कमी वाटते आणि घसरले तरीही जास्त घसरणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष बाळगलेले सोने कायम तुमच्या जवळ राहते, ते  दागिन्यांच्या स्वरूपात वापरता येते. शेयर्सच्या बाबतीत मात्र गुंतवणूक केलेली कंपनी बुडल्यास शेअर सर्टिफिकेटला रद्दीचा भाव येतो. सोन्याचे चढेभाव हा कृत्रिम फुगवलेला फुगा नाही हे निश्चित. त्यामुळेच अजूनही सोन्यातील गुंतवणूक आकर्षक वाटते.

सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय

लेखात वर म्हटल्याप्रमाणे सोने आता गुंतवणूक पर्याय म्हणून आपण स्वीकारू लागलो आहोत किंबहुना पोर्टफोलियोमध्ये सोन्याची किमान 5% ते 15% तरी गुंतवणूक हवी असं अर्थतज्ज्ञांचेही म्हणणे आहे. पण मग ही गुंतवणूक करायची कशी? त्या आधी आपण सोन्यातील गुंतवणुकीसाठी कुठली माध्यमे उपलब्ध आहेत ते पाहू.

(1) प्रत्यक्ष सोने खरेदी (फिजिकल फॉर्म) : सरळ सराफाच्या पेढीवर जाऊन सोने खरेदी करणे ही आपली पारंपरिक पद्धत आहे. परंतु ही खरेदी आपण दागिन्यांच्या स्वरूपात करत असल्याने यात घडणावळ आणि मजुरीचा समावेश होतो. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करताना शक्यतो ते बँकेतून खरेदी करावे. हे सोने 99.5% शुद्ध असून ते नाण्यांच्या स्वरूपात मिळते आणि  विक्री करताना यात घट होत नाही.  तसेच यात घडणावळ आणि मजुरीचा खर्च देखील वाचतो. ही नाणी तुम्हाला 5 ग्राम ते 100 ग्रामपर्यंतच्या वजनात मिळू शकतात.

(2) ईटीएफ अर्थात एक्स्चेंज ट्रेडेड फंड: सामान्य गुंतवणूकदाराला पेपर स्वरूपात सोने खरेदी करायची ही उत्तम संधी ईटीएफतर्फे मिळू शकते. म्यूचुअल फंडचाच हा एक प्रकार असल्याने गुंतवणूकही म्यूचुअल फंडच्या यूनिटसारखीच करायची असते.  गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेचे सोने खरेदी केले जात असल्याने सोन्याच्या भावाच्या चढ उतारा प्रमाणे याच्या युनिट्सचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) बदलत असते. ईटीएफचा महत्त्वाचा फायदा म्हणजे याची युनिट्स शेअरप्रमाणे शेअर बाजारात ट्रेड करता येतात.

(3) म्यूचुअल फंड : म्यूचुअल फंडच्या या योजनेत ज्या कंपन्या सोन्याच्या किंवा संबंधित व्यवसायात आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. तसेच मल्टी अ‍ॅसेट्स फंड किंवा फंड ऑफ फंडतर्फे देखील सोन्यात गुंतवणूक केले जाते. सोन्याचा भाव वधारल्यावर साहजिकच त्याचा फायदा गुंतवणूकधारकाला होतो. सोन्यातील ही एक प्रकारची अप्रत्यक्ष गुंतवणूक म्हणायला हरकत नाही.

(4) इ गोल्ड : स्पॉट एक्स्चेंजमध्ये बुलियनप्रमाणे सोने खरेदी करता येते. अर्थात हे ही सोने डी मॅट स्वरूपातच असते आणि तुम्हाला ट्रेडिंग अकाऊंट उघडणे आवश्यक असते. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तुमचे सोने री मॅट करून त्याचे प्रत्यक्ष सोन्यात रूपांतर करून घेऊ शकता. इ गोल्ड हे कधीही प्रत्यक्ष सोन्यात रूपांतर करता येणे शक्य असल्याने दीर्घकालीन भांडवली नफ्याप्रमाणे कर कपातीसाठी किमान 3 वर्ष बाळगणे आवश्यक असते.

(5) सोवरीन गोल्ड बॉन्ड : गेली काही वर्ष केंद्र सरकारच्या रिजर्व्ह बँकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजने अंतर्गत 1 ग्रॅम सोन्याच्या भावाप्रमाणे प्रत्येक बॉन्ड  विक्रीस काढला जातो. बॉन्डचा कालावधी 8 वर्षाचा असून पाच वर्षांनंतर सहाव्या, सातव्या आणि आठव्या वर्षी तुम्हाला त्या वेळच्या सोन्याच्या बाजारभावाने रक्कम परत मिळते. तोपर्यंत गुंतवणूकदाराला दर साल 2.50% व्याजही मिळते.

वरील सर्व पर्याय अभ्यासल्यावर मला ईटीएफ मधील गुंतवणूक सोपी, सुटसुटीत आणि फायदेशीर वाटते. प्रत्यक्ष सोने खरेदी केवळ  जिकिरीची नाही तर जोखमीची आणि महागही आहे. ईटीएफमार्फत सोन्यातील गुंतवणूक फायद्याची का याची प्रमुख करणे पुढीलप्रमाणे देता येतील :

(1) छोटे गुंतवणूकदार आपल्या ऐपतीप्रमाणे युनिट्स खरेदी करून पोर्टफोलियोमध्ये सोन्याचा समावेश करू शकतो.

(2) खरेदी/विक्री शेअर बाजारात शेअर्सप्रमाणेच होत असल्याने हवे तेव्हा आणि चढ-उताराप्रमाणे शक्य होते. म्यूचुअल फंडातील गुंतवणूक असल्याने SIP देखील करता येते.

(3) युनिट्स डी-मॅट स्वरूपात असल्याने सोन्याची राखण करणे, त्याची सुरक्षा बघणे इत्यादी प्रकार करावे लागत नाहीत. तसेच आपल्याकडे सोन्यातील गुंतवणूक किती आहे आणि त्यातील फायदा व तोटा ऑनलाइन कळू शकतो,

(4) शेयर्सच्या तुलनेतही ईटीएफ खूपच फायद्याचे ठरतात कारण ईटीएफ ला STT (Security Transaction Tax) लागू होत नाही. तसेच ईटीएफ वर्षभर ठेवल्यास ते दीर्घकालीन भांडवली करास पात्र ठरतात. या उलट प्रत्यक्ष खरेदी केलेले सोने दीर्घकालीन भांडवली नफ्यास पात्र ठरण्यासाठी 3 वर्ष ठेवावे लागते.

(5) ईटीएफ स्वरूपातील सोन्याच्या गुंतवणुकीला संपत्ती कर लागू होत नाही.

इतके फायदे पाहिल्यावर ईटीएफमधील गुंतवणूक उत्तम का याची कारणे लक्षात आली असतीलचं. ईटीएफच्या खरेदी-विक्रीसाठी शेअर्स प्रमाणे ब्रोकरेज द्यावे लागते हे ही ध्यानात घ्यायला हवे.

सोने गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली?

1925 मध्ये 10 ग्रॅम सोने 18.75 रुपयांना मिळत होते. तर गेल्या दहा वर्षात सोन्याच्या भावाची चढती कमान पहिली, तर सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची ठरू शकते याची कल्पना येईल. 2003 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 5600 रुपये होता. तो सध्या 50,000 वर आहे. इतका उत्तम परतावा दूसऱ्या कुठल्याही गुंतवणुकीने दिला नसेल. मात्र इतक्या वेगात वाढलेले हे सोन्याचे दर या पुढेही असेच चढे राहतील का, हा खरा प्रश्न आहे. सध्याची जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, वाढते कर्ज, कच्च्या तेलाच्या किमती, घसरता रुपया, चलनांचे युद्ध आणि अवमूल्यन, चलनवाढ इत्यादी पाहता शेअर बाजाराची परिस्थिती अशीच राहील. सोन्याच्या भावातही  चढउतार अटळच आहेत मात्र तरीही सोन्यातील गुंतवणूक शहाणपणाची ठरेल. सामान्य गुंतवणूकदाराला कमी धोका पत्करून गुंतवणूक करायची असेल तर ईटीएफमधील डखझ दीर्घकालीन गुंतवणूक, सुरक्षित आणि फायद्याची ठरू शकेल. परिपूर्ण पोर्टफोलियोमध्ये सोन्याला विसरून नाही चालणार. (लेखातील काही माहिती आणि संदर्भ मराठी विश्वकोशातून घेतले आहेत.)

(शेअर गुंतवणूक विश्लेषक)

–अजय वाळिंबे

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..