इक्बाल दरबार यांचा जन्म ३१ मार्च १९४९ रोजी झाला.
पुण्यातील ऑर्केस्ट्रा विश्व ज्या काही मोजक्या कलाकारांनी वैभवास नेले त्यात इक्बाल दरबार यांचे नाव पाहिले घेता येईल. इक्बाल दरबार यांनी सुरुवात मेलडी मेकर्सने केली.
प्रो.सुहासचंद्र कुलकर्णी यांचा सुरुवातीला थंडर ऑर्केस्ट्रा होता.. या गृपमधे चंद्रशेखर गाडगिळ, इक्बाल दरबार, अशोक सराफ वगैरे मंडळी होती. या गृपच्या विभाजना नंतर चंद्रशेखर-दरबार म्युझिकल नाईटस् या ऑर्केस्ट्रा गृपची निर्मिती झाली.
पुढे चंद्रशेखर-दरबार गृपचे पण कालांतराने विभाजन होऊन इक्बाल दरबार यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम करणेस सुरुवात केली.
पं.सुधाकर मराठे यांचे मार्गदर्शनाखाली शास्त्रीय बैठक लाभलेला भारदस्त व रियाजाने कमावलेला आवाज, अंगी विनयशिलता, निर्व्यसनी, मितभाषी, समोरच्या कलाकारांस छोटा असो की मोठा,अत्यंत आदरयुक्त वागणूक देणारे इक्बाल दरबार जे गाणे सादर करतात, ते अत्यंत कलात्मक पद्धतीने रसिकांसमोर पेश करतात.
“अजहून आये बालमा, मधुबनमें राधिका” ही ऐकावीत तर त्यांच्या गळ्यातूनच… अक्षरशः सरस्वतीच वास करते त्यांच्या गळ्यात… त्याचबरोबर इक्बाल दरबार हे आपल्या स्वतःच्या गेटअपकडे पण विशेष लक्ष देतात… अगदी हेअर स्टाईल पासून ते कपडे,शूज पर्यंत.. सर्व काही अल्टिमेटच… ही परंपरा ते स्वतः तर आजपावेतो जपून आहेत.. आजच्या पिढीतील कलाकारांनी त्यांचे हे गुण अवश्य फॉलो करावेत.. तसेच मुलांना पण त्यांनी त्याच संस्कारात वाढविले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रिहर्सल पासून कार्यक्रम पार पडेपर्यंत स्वतः जातीने लक्ष देतात. त्यांच्या कार्यक्रमाच्या गाण्यांचे सिलेक्शन पण हटके असते.
त्यांच्या कार्यक्रमाच्या गाण्यांचे सिलेक्शन पण हटके असे.. रफिसाहेबांची गाणी फार अप्रतिमपणे पेश करतात व अजूनही त्याच स्टाईलने व तन्मयतेने गातात,याचे मला फार कौतुक वाटते. त्यांचे जमिर व आवेज ही दोन मुले पण छान गातात. आजही सँक्सोफोन या वाद्यावरही इक्बाल दरबार यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे.
कश्मिर की कली या चित्रपटातील ” है दुनियाँ उसिकी ” हे सँक्सोफोनचा पूर्णपणे वापर केलेले गाणे, इक्बाल दरबार जेव्हा सँक्सोफोन वाजवून गातात.. तेव्हा श्रोत्यांच्या तोंडून सहजच “वाह् उस्ताद” वन्स मोअर असे शब्द बाहेर पडतात..
इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत.
इक्बाल दरबार यांना पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार, लंडनमधील एका मैफिलीच्या वेळी “द गोल्डन व्हॉईस ऑफ रफी पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
इक्बाल दरबार पुण्यातील ‘मोहम्मद रफी आर्ट्स फाऊंडेशन’ पुणेचे हे संस्थापक व अध्यक्ष आहेत जी संस्था सामाजिक कारणासाठी निधी गोळा करण्यासाठी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करते, या संस्थेने आत्ता पर्यत कारगिल युद्ध, गुजरात भूकंपातग्रस्त लोकांना मदत, सीपीला कर्करोग व एड्स असोसिएशन, ‘निवार’ वृद्धाश्रम, पुणे ब्लाइंड स्कूल फॉर गर्ल्स ‘, सीआर रंगनाथन मूकबधिर शाळा आणि मुंबई सीरियल ट्रेन स्फोटग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.
इक्बाल दरबार यांचे संपूर्ण कुटुंबच संगीत सेवेस वाहून घेतलेले आहे. वडील महंमदभाई क्लॕरोनेट तर त्यांचे चुलत बंधू अख्तर दरबार उत्कृष्ट ट्रँपेट वाजवीत असत तर अख्तरभाई यांचा मुलगा समिर किबोर्ड प्लेअर आहे. इक्बाल दरबार यांचे धाकटे बंधू नसीरभाई हे सँक्सोफोन ,क्लॕरोनेट,गिटार ही वाद्य वाजवितात व त्यांचे एक बंधू इस्माईलभाई हे किबोर्ड वाजवित असत. अय्युब भाई हे त्यांच्या दरबार ब्रास बँडच्या व्यवसायात त्यांना मदत करतात. इक्बाल दरबार यांची मुले सुद्धा जहीर(किबोर्ड ), जमीर व आवेज (गायक) हे उत्तम प्रशिक्षित असे कलाकार आहेत अन् वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून संगीत सेवेचा वारसा पुढे नेत आहे. हे दरबार कुटुंबिय पुण्यातील ऑर्केस्ट्रार्केस्ट्रा विश्वाची शान आहे ,असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.. त्यांचे ८०/९० च्या दशकांत ऑर्केस्ट्रा 7 स्टार गृपचे भरपूर प्रयोग होत असत.. आजही त्यांचे अंदाज-ए-रफी, गॉड गिफ्ट हे प्रयोग श्रोत्यांची गर्दी खेचत असतात.पुण्याच्या सर्वात जुन्या ब्रास बँड परंपरेची पिढीतील असलेल्या त्यांच्या दरबार ब्रास बॅन्डने ११५ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.
संपूर्णपणे महाराष्ट्रात प्रसिद्ध असेलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूकीत वादन करण्याचा मान हा गेली कित्येक वर्षे दरबार ब्रास बँड कडेच आहे ,यातच या कुटुंबियाचे संगीत विश्वातील योगदान दिसून येते..
इक्बाल दरबार यांचे ६५ जणांचे एकत्र कुटुंब असून एकाच छताखाली ते राहतात.
पुण्यातील ऑर्केस्ट्रा जगाच्या वैभवाच्या शिखरावर पोहोचविण्यात इक्बाल दरबार व त्यांच्या कुटुंबियाचा मोलाचा वाटा आहे.
Leave a Reply