प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.
इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.
‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.
१९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला.
‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र ’ एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह. इरावतीबाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी.
संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते.
इरावती कर्वे यांनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.
समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.
ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.
’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.
मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते – असे त्यांचे पाठांतर होते. इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply