नवीन लेखन...

व्यायाम केलाच पाहिजे का?

‘आरोग्यम् धनसंपदा-’ या उक्तीचा साक्षात्कार झाला की मी व्यायाम चालू करतो आणि ते वेळापत्रक दोन दिवसात कोलमडते. एरव्ही व्यायामाची मला आवड आहे अशातला भाग नाही. कोणतरी हार्टफेलने गेला किंवा कुणाचे बीपी वाढलेले कानावर आले की मी नेमाने व्यायाम सुरू करतो. आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवायचेच म्हणून आपोआप आतून स्फुरण येते, पण ते फारच कमी टिकते. लहानपणीदेखील मी संध्याकाळी धावायला जायचो. पण ज्या दिशेला धावायचो त्या बाजूच्या विहीरीत एकाने उडी टाकून जीव दिल्यामुळे तो व्यायाम सुटला. दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर जाऊ शकलो असतो पण त्या बाजूला कुत्र्यांवर भयानक प्रेम असणारी दोन घरे होती. शिवाय कुत्री बांधून ठेवण्यावर त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता. बांधून ठेवल्यावर कुत्र्यांचा उपयोग काय हे त्यांचे रास्त मत होते. मग रस्त्यावरून येणार्‍या जाणारी सायकल, मोटारसायकल यांच्याबरोबर ती कुत्री शर्यत लावत आणि कुणाला चावायला नाही मिळाले की दुसरे कोणतरी यायची वाट पहात बसत. त्यावेळी कुत्रा चावल्यावर बेंबीत चौदा इंजेक्शने घ्यावी लागत म्हणून त्या बाजूला कधी पळण्याची रिस्क घेतली नाही. आमच्या गावापासून दोन किलोमीटरवर असणार्‍या एका सुनसान रस्त्यावर सकाळसकाळी धावायला जायचा दृढ निश्चय केला होता. ज्यादिवशीपासून जाणार होतो त्याच पहाटे त्याच रस्त्यावर झोपून व्यायाम करणार्‍या चौघांना एका ट्रकड्रायव्हरने उडवल्याचे समक्ष पाहिल्यावर तोही विचार बाजूला ठेवावा लागला. ट्रक आणि ट्रकड्रायव्हरची आपल्याला जाम भीती वाटते. भांडण लागल्यावर ते जाम चोपतात.

रोज व्यायाम करणारे लोक शूर असतात यात काही संशयच नाही. एका तासात हजार जोर काढणार्‍याला मी “अरे हजार जोर नकोस काढू. छातीत दुखेल.” हे सांगायला जात नाही किंवा एकावेळी पाच हजार बैठका मारणार्‍याला “कशाला एवढया बैठका काढतोयस, मांडया दुखतील की!” हा सल्ला देत नाही. जोपर्यत कोण आपल्या दंडाच्या बेटकुळया चेक करत नाही तोपर्यत मला त्याचे काहीही वावडे नसते. पण “नेमाने व्यायाम केलाच पाहिजे. किमान प्राणायाम तरी करतोस की नाही?” असा प्रश्न विचारून कोण पिदवायला लागला की त्याच्या कानाखाली गणपती काढावा वाटतो. प्राणायाम म्हणजे जीवावर बेतणारा व्यायाम अशी माझी एक समजूत होती. ती मनातून जायला बरीच वर्षे लागली.
हे लोक स्वखुशीने दंड बैठका मारतात, कुस्त्या खेळतात, कसल्या कसल्या लांब उंच उडया मारतात. मारू देत बिचारे! पण आपल्याला ते जमत नाही. देवाने आमचं शरीर फक्त लोकलच्या पाठीमागे धावण्यासाठीच बनवलं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर रोजच्या आयुष्यात खरा व्यायाम होतो तो धावती बस किंवा फलाटावरची लोकल पकडायलाच. हिने पहाटे पहाटे उठून तासभर पळायला जात जा असे एकदोनदा सुचवले होते पण तासभर पळण्यापेक्षा अजून थोडा पळालो असतो तर ऑफिसमध्येच पोहोचलो असतो. त्यामुळे “पळायला निघायच्या आधी डबा भरून बॅगही देत जा, ऑफिसला पळतच जात जाईन.” असे कुत्सितपणे मी म्हणाल्यावर घरात जी शांतता पसरली ती नष्ट करायला खूप कष्ट घ्यावे लागले.

मला ही वादळापूर्वीची शांतता आहे हे माहित नव्हते. पण बायकोने मनावर घेतले आणि मला जिम जॉईन करावी लागणार असे दिसू लागले. नुकतीच तिने स्वत:चे वजन कमी करायला हा प्रकार चालू केला होता. इथे माझ्या वजनाचा प्रश्नच नव्हता. पण त्या जिमवाल्यांनीही व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधून नवराबायकोसाठी व्हॅलेंटाईन पॅकेजची ऑफर चालू केली होती. एकाचे वर्षभराचे पैसे भरायचे आणि दोघांनी व्यायामाला जायचे अशी ती स्कीम होती. वास्तविक मी तिला एकाच्याच पैशावर दोघेही जाऊ शकतो ते सांगितले होते पण नवर्‍याचे स्पोर्टिंग स्पिरीटने ऐकतील त्या बायका कसल्या? वास्तविक पहाता वर्षाच्या सुरवातीला ती पैसे भरते, थोडे दिवस नेमाने जाते. मग पोरांच्या शाळा, स्कुलबसमधून घरापर्यंत त्यांची ने आण, त्यांचे अनोखे प्रोजेक्ट्स, शिवाय माहेरच्यांचे येणे जाणे यातून जिमकडे जायला तिला चारपाच महिने वेळच मिळत नाही. वर्ष संपायला आले की पुन्हा दोन तीन महिने जाते आणि पुढच्या वर्षाचे पैसे भरून येते. जिमवालेही लेकाचे वर्षभर फोन करत नाहीत पण नव्या वर्षाचे पैसे भरायला हात धुवून मागे लागतात.
तिने जिम लावल्यापासून कॅलरी, डाएट, हिरव्या भाज्या, सलाड, सीटअप्स, पुशअप्स, ट्रेड मिल, वेट ट्रेनिंग असे शब्द कानावर पडू लागले. एवढी गोड खाणारी ही पण वजन कमी करण्याचा निश्चय केल्यावर तिने गोड अजिबातच वर्ज्य केले. अगदी सकाळचा चहासुध्दा ती घेईनाशी झाली. मी पहिल्यांदा आग्रह करून पाहिला पण तिने निश्चय मोडला नाही (बायकांनी मनात आणल्यावर मनाविरूध्द का असेना, त्या काहीही करतात आणि निभावूनही दाखवतात हे जाणकारांनी ध्यानात घ्यावे). तुपाची बरणी आहे तशीच दिसू लागली. मिठाई संपेनाशी झाली. वेफर्सच्या बरण्याच्या ठिकाणी मोड आलेली कडधान्ये दिसू लागली. डायटेशियनच्या अपॉईंटमेंटनुसार सगळे चालू झाले. मोड आलेल्या मटकी, मुगाच्या उसळी चालू झाल्या. मग मी आणि पोरं ती संपवू लागलो. शिवाय भल्या मोठया रकमेचा एक अॅडिशनल सप्लिमेंट प्रोटीन्सचा डबा देण्यात आला होता. रोज एक ग्लास पाण्यात दोन चमचे पावडर टाकून डाएट चालू होता. एका महिन्यात तिचे वजन तब्बल पाच किलो कमी झाले.

सोसायटीतल्या बायकांच्या नाकावर टिच्चून त्यादिवशी आम्ही चायनीजला गेलो. आम्हाला एकत्र फिरताना ती जाडजुड आणि मी एकदमच लुकडा वाटतो असे बर्‍याचजणींचे मत होते. गुप्तहेरांकडून ते ऐकल्यावर ताबडतोब जिम लावून माझी बॉडी कमवणे आणि तिची बारीक करणे हा एकतर्फी निर्णय तिने घेतला होता. पण तिकडे जायला मी टाळाटाळ करत होतो. तसे पाहिले तर जिम, आखाडा, योगा तसा मला नवीन नाही. या सगळया दिव्यपरीक्षा मी दिल्या आहेत.

केवळ कुतुहल म्हणून मी एका खरोखरच्या आखाडयात नाव नोंदवले होते. पैसे घेणाराही अंगाला तेल लावून उघडाच बसला होता. मुकाटयाने पैसे दिल्यावर त्याने कोपर्‍यातली साहित्याची शाळा दाखवायला मला बरोबर घेतले. डंबेल, वेगवेगळी वजने, ती घालून उचलायचे बार, शिवाय हनुमानाची असते तसली गदा वगैरे दाखवून झाले. हा सगळा दाखवण्याचा कार्यक्रम चालू असताना लंगोट घातलेले उघडे सातआठ मल्ल गुपचूप मागून येऊन आमच्या सर्वेक्षणात सामील झाले. हे सगळे लोक मला त्या रूममध्ये घेऊन माझा गेम करतात की काय असे वाटू लागले. पण सुदैवाने तसे काही झाले नाही.

आम्ही पुन्हा आखाडयात आलो. मला कधी एकदा कुस्ती शिकतोय असे झाले होते. कपडे काढल्यावर कुस्तीची ओळख करून देतो म्हणून मी सावध व्हायच्या आधी मिशीवाल्या मास्तराने माझ्या पायात आडवा पाय घातला आणि मी लाल माती खाल्ली. दोन मिनीटे काय झाले ते कळेना. त्यानंतर बराचवेळ ट्रॅक्टरमधून पडल्यासारखं वाटत होतं. दुसर्‍या दिवशीपासून क्लास बंद झाला.

एका योगाच्या क्लासला गेलो. पहिल्याच दिवशी मला शिकवतो त्याच्यावर डाऊट आला. हा माणूस योगा कमी आणि इतर गोष्टीवर जास्त बोलत होता. तब्बल आठवडाभर नुसतेच शांत झोपायला लावूून “आता कसं वाटतंय?” हे विचारायचा. आणि त्याच्या भीतीने “शांऽत.” असं म्हणायला लागायचं. वास्तविक बाजूच्याच तालमीत घुमणारे पैलवान, त्यांचे शड्डू , दंड थोपटणे हे ऐकू यायचे पण आमचे “कसं वाटतंय?” शांऽत! इथे झोपण्यापेक्षा चार बांबूवर झोपलेले काय वाईट असा विचार करून मी तोही क्लास सोडून दिला. थोडे दिवस मी हे शवासन घरीही करायचो पण एका आगाऊ माहितीमुळे तेही करायचे सोडून दिले. आमच्या पोरांनी चाळीत “रोज आमचे पप्पा मरून जिवंत होतात.” ही बातमी पसरवली होती. गोष्ट एवढयावरच थांबली नव्हती तर माझ्या शवासनाच्यावेळी खिडक्या दारे वगैरे जिथून सहजगत्या चोरून बघता येईल तिथून बघण्याची हिने शेजार्‍यांना मुभा दिली होती. मलाही हा प्रकार बरेच दिवस माहित नव्हता. एकदिवशी मध्येच जागा झालो तर माझ्या उशाला पेल्यात कुणीतरी उदबत्त्या आणि पायाशी पांढरी फुले टाकली होती. पायाशी फुले बघितल्या बघितल्या मी ताडकन उठून बसलो. आमच्याच घरात काय झालं ते मला कळेना. अगरबत्ती का लावली म्हणून हिला विचारले तर वातावरण प्रसन्न वाटतं! नशीब माझ्या अंगावर कुणी पांढरे कापड टाकले नव्हते!

जिममध्ये न जाता घरच्या घरीच बैठका मारायचा निश्चयही करून झाला होता. झोपताना हिला लवकर उठवायला सांगितल्याप्रमाणे हिने लवकरही उठवले. मी ब्रश वगैरे करून बैठकांना सुरवात करणार इतक्यात हिने झोपेतून उठलेल्या रडणार्‍या बंडयाला बाहेर खुर्चीत आणून बसवले. मी हैराण होऊन विचारले, “ह्याला कशाला आणलेस बाहेर?”
ती माझ्याशी काही बोलण्याऐवजी बंडयालाच म्हणाली, “पप्पा व्यायाम करणार आहेत, बघत बस. तेवढयात मी डबा बनवते.”

काय बोलणार ह्यांना? आमचे डिमोटिवेशन इथून सुरू होते.

एक दिवशी गडबडीने चार माळे चढून आल्यावर मरणाची धाप लागली आणि तिला आयतेच कारण मिळाले. व्यायाम या विषयावर मला भले मोठे लेक्चर मिळाले आणि दुसर्‍या दिवशी ती मला जिममध्येच घेऊन गेली. लगेच माझेही पैसे भरण्यात आले. वास्तविक तिथे ट्रायलसाठी दोन दिवस फुकटात जाता आले असते पण लावायचीच आहे तर कशाला ट्रायलीच्या भानगडीत पडा म्हणून मी जॉईनच करून टाकली.

रिसेप्शनिस्टकडे पैसे भरून आत पाऊल टाकल्या टाकल्या तिथल्या गर्दीने मी हैराण झालो. सगळेजण अरनॉल्ड झाले होते. जो तो हातात वजने घेऊन दंडाच्या बेटकुळया वाढवण्यात दंग झाला होता. आपल्याला पाच किलोचा सनफ्लावर तेलाचा डबा उचलता उचलता नाकी नऊ येतात आणि ते लोक पंचवीस पंचवीस किलोचे डंबेल्स आरामात उचलत होते. नुसते उचलतच नव्हते तर ते वरखालीही करत होते. तेवढे वजन उचलल्यावर फाडकन आपला दंड फुटायचा. अशा या गर्दीत आपल्याला कसा आणि कधी व्यायाम करायला मिळणार म्हणून मी चिंतेत पडलो आणि जिमच्या सगळया भिंतीना आरसे असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणजे खरी गर्दी कमी होती! आत गेल्या गेल्या दहाबाराजणांनी माझ्याकडे कसे काय पाहिले या रहस्याचा मला नव्याने शोध लागला.

आत गेल्या गेल्या एका इन्स्ट्रक्टरने मला ताब्यात घेतले. बॉडीचा वॉर्मअप कसा करायचा ते सांगत होता एवढयात दुसरा एक नवशिक्या त्याला काहीतरी विचारायला आला,

“हं असं करा.”

त्याने आज्ञा दिल्यावर मी माझे अंग वाकडे तिकडे करू लागलो.
“तुम्ही नका हो करू. ह्याला सांगतोय मी.”

माझा पचका झाला. एकतर हा एवढा हळू बोलत होता की त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मी “काय?” म्हणून विचारत होतो. बाजुचा दुसरा इन्स्ट्रक्टर त्यामानाने चांगला शिकवत होता. मी पुन्हा कधीही या उदास मनुष्याकडे फिरकायचे नाही हा निश्चय केला आणि पहिला दिवस संपला.

दुसर्‍या दिवशी अतिउत्साहात जिममध्ये गेलो. दुसर्‍या इन्स्ट्रक्टरला पकडला. त्याने वार्मअप करायला सांगितल्यावर चालूच झालो. उत्साहाच्या भरात थोडया जास्तच उंच उडया मारल्या असाव्यात कारण सगळे व्यायाम करायचे सोडून माझ्याकडेच बघायला लागले त्यामुळे मी ओशाळलो आणि स्वत:ला जरा आवरले. हळूच मान फिरवून इकडे तिकडे पाहिले. कुणीही बघण्यासारखे नव्हते. मग जाग्यावरच धावण्याचे प्रात्यक्षिक केले. काहीही चूक नसताना उठाबशा काढल्या. अंगाची डाव्या आणि उजव्या बाजूला कमान केली आणि पुन्हा इन्स्ट्रक्टरला विचारले, “आता काय करू?”
मग त्याने मला एका पालथे झोपावे लागेल अशा मशिनकडे नेले आणि त्या मशिनवर झोपवले. आजुबाजूने हातात वजने घेऊन लोक सैरावैरा धावत होते. एखादे जरी चुकून पडले असते तर हातपाय वाचायची शक्यताच नव्हती. फ्र्रॅक्चरची शंभर टक्के सोय करण्यात आली होती. मी लगेच थोडा भिंतीच्या बाजूला सरकलो. पालथे झोपून पुढे असणार्‍या दोन दांडयाना पकडले. पाय मागच्या दांडयात अडकवले. त्याने बाजूच्या वजनाच्या थप्पीतली खीळ काढून वरच्या बाजूला लावली. म्हणजे मी नवीन असल्यामुळे वजन कमी केले. मग मला पायाने तो दांडा कसा उचलायचा ते सांगितले. वर येताना फास्ट आणि खाली घेताना स्लो असा व्यायाम चालू झाला. खाली येताना ती वजने एकमेकांवर आपटली नाही पाहिजेत असा दंडक होता. मी पाचव्या सहाव्यातच गार झालो. तरी हा पीटीच्या सरांसारखा बाजूला उभा राहून आकडे मोजत होता. वीस आकडे भरले आणि माझी सुटका झाली. थोडावेळ त्याने इकडे तिकडे हिंडून ये म्हणून सांगितले. मी हिंडून आलो तरी कुणी पाहण्यासारखे आले नव्हते. आठ ते दहा या वेळेत जिमला मुलीही असतात असे सांगून माझी उगाचाच फसवणूक करण्यात आली होती.

इकडे तिकडे फिरून झाल्यावर पुन्हा त्याच मशिनवर तसेच वीसपर्यत काऊंटिंग झाले. मग एका दुसर्‍या सांगाडयाकडे मला नेण्यात आले. हा काय प्रकार आहे हे मी पहातच होतो इतक्यात तिसर्‍याच सांगाडयावर लोंबणार्‍या एका मुलाने माकडासारखी माझ्यासमोरच उडी टाकली. जत्रेत नेलेल्या पोराने असंख्य दुकाने पाहिल्यावर त्याची जी अवस्था होते तशी माझी झाली होती. याही मशिनवर मी नवीन असल्यामुळे वजन कमी करण्यात आले. मग तिथे कसे बसायचे, दोन्ही हातात दांडा पकडून छातीपर्यत खाली कसा ओढायचा ते सांगण्यात आले. इथेही वीस काउंुट होते. मी पंधरापासून जाम थकलो होतो. हातातला दांडा काही झाले तरी ओढला जात नव्हता. शेवटी वीसाचा काऊंट झाल्यावर मी उठलो आणि बाजूच्या बाकावर बसलो इथपर्यत ठीक होते.

अचानक माझ्या डोळयांसमोर अंधारी आली. अंधार वेगाने वाढू लागला. डोळे आपोआप घट्ट मिटले जाऊ लागले. सगळी जिम गरगर फिरायला लागली. आजुबाजूला वजने घेतलेले लोक आणि सांगाडयावर लोंबणारे लोक हवेत उडत असल्यासारखे वाटू लागले. मी बाजूला कशाचातरी आधार घेतला. मला चक्कर आली आहे हे इन्स्ट्रक्टरने ओळखले आणि विचारले, “चक्कर आली का?”

मी मानेनेच होकार दिला.

“शांत बसा. पाणी पिणार का?”

काहीतरी करायला हवं म्हणून मी पुन्हा होकार दिला. त्याने पाण्याची बाटली आणून माझ्या हातात दिली पण डोळयांसमोरची अंधारी पूर्ण गेली नसल्यामुळे त्याचे टोपण उघडायला जमत नव्हते. एवढयात अजून एकाने काचेच्या ग्लासातून ग्लुकॉन डी आणले. कोल्ड्रींक पिल्यासारखा स्टाईलमध्ये मी ग्लुकॉन डी पिलो. थोडावेळ विश्रांती घ्या म्हणून त्यांनी माझी रवानगी आतल्या बाजूला असणार्‍या रेस्टरूम कम चेंजिंगरूममध्ये केली. माझ्या अंधारी आलेल्या डोळयांना बरेचजण माझ्याकडे बघत असलेले समजले आणि त्यात दोन मुली होत्या हे मला तशा अवस्थेतही कळले.

“असेच पडून रहा. ग्लुकॉन डी विरघळू दे.” म्हणून सांगण्यात आले म्हणून मी आत जाऊन एका बाकावर तसाच पडून राहिलो. एवढयात एक किरकोळ शरीरयष्टीचा एक व्यायामपटू आला. माझ्याकडे कमालीच्या सहानुभूतीने पहात त्याने विचारले, “काय खाऊन आला नव्हता काय?”

“चहा आणि एक केळी खाऊन आलो होतो.”

“अहो इकडे येताना चहा कधी प्यायचा नाही. अंडी खाऊन येत जा, वाटल्यास दूध पिऊन या पण चहा घेऊ नका.”
मी हो म्हणालो.

त्याचा व्यायाम बहुतेक संपला असावा. कारण त्याने जिमची कपडे काढून नॉर्मल पेहराव केला आणि पिशवीतून केळीची फणी काढली. माझ्या हातात दोन केळी देत तो म्हणाला, “घ्या!”

“कशाला उगाच?”
“घ्या हो. बरे वाटेल तेवढेच. केळीत मॅग्नेशियम असते.”

माझ्या बुद्धीची कीव करत मी केळी खाल्ली. खरोखर बरे वाटले. भूक लागलीच होती. केळीतले मॅग्नेशियम आणि ग्लुकॉन डी पोटात गेल्यावर त्या ग्लुकॉन डी च्या जाहिरातीतल्या माणसासारखे नाचावे असे वाटायला लागले. इतक्यात मला आत आणून सोडणारे दोघेजण, “ओके ना?” म्हणून विचारायला आले.

“हो.” म्हणून मी पोटावरून हात फिरवला आणि टीशर्ट काळा झाला. या सगळया गडबडीत मी नेमका कशात हात घातला होता ते काही आठवत नव्हते.

“मग चला बाहेर.”
ग्लुकॉन डीने मला चांगलाच उत्साह आला होता. आदेश मिळताच झटकन उठून मी बाहेर गेलो आणि त्याला म्हणालो, “आता मी लाईट वेटचे काहीतरी उचलतोच.”
“ओऽ बस झाले आज.”

हा असा का बोलतोय ते मला कळेना.

“उद्या या आता. आणि काही टेंशन घेऊ नका मीही पहिल्यांदा असाच चक्कर येऊन पडलो होतो. बॉडी लगेच चांगली होईल तुमची.”

माझा भ्रमनिरास झाला. काहीतरी उचलायला मला चांगलाच चेव आला होता. तिथे एका लायनीत ठेवलेली वजने पटापट उचलून पुन्हा ठेवातीत असे वाटायला लागले पण त्याने माझा पोपट केला. जाता जाता माझी फी भरून घेणारी रिसेप्शनिस्टही म्हणाली, “भरपूर खाऊन येत जा. पुन्हा चक्कर येऊन पडू नका.”

पुन्हा पोपट!

दोन दिवस ऑफिसमध्ये खूप काम असल्याने जिम चुकली. पण मी जाम फेमस झालो आहे हे मला बायकोकडून समजले. एका ओळख नसलेल्या बाईने तिला विचारले होते, “आता बरे आहे का तुमच्या मिस्टरांना?”
जणू काय मी दोनशे किलो वजन उचलताना अपघात होऊन अंथरूणावरच खिळलो होतो!
तेव्हापासून मी व्यायामाला साष्टांग दंडवत घातला.

— © विजय माने, ठाणे

http://vijaymane.blog

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..