होता एक गरीब बिचारा ।
किडूक मिडूक ते जगण्या चारा ।।
कौलारु जुनी पडवी निवारा ।
जन्म दरिद्री दिसे पसारा ।।
परिस्थितीनें गेला गंजूनी ।
आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।।
शरीर जर्जर झाले रोगांनी ।
जगण्याची आशा उरे न मनीं ।।
अवचित घटना एके दिनीं ।
धन सापडे जमिनीतूनी ।।
मोहरांचा तो होता रांजण ।
गेले सारे दारिद्य निघूनी ।।
जन्मभर ते त्याने भोगले ।
घरांत लक्ष्मी, परी सोसले ।।
अज्ञानातची हे घडले ।
असून पाण्यांत तरी तहानेले ।।
शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठा ।
लपला आहे अंतर्यामीं मोठा ।।
नसेल तेथे आनंदा तोटा ।
मिळतील सदैव यश वाटा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply