जपानी सामुराई महिला
गजा पानमधील कॅमेलॉट सरदारांच्या फार पूर्वीच सामुराईंनी खानदानी लढवय्यांच्या वर्गाची एक श्रेणी निर्माण केलेली होती. सामुराई पंथात वा श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी माणूस धष्टपुष्ट असणे, शिस्तबद्ध असणे आणि निर्भय असणे अत्यावश्यक होते. मात्र त्यासाठी स्त्री-पुरुष हा लिंगभेद नव्हता! असा लिंगभेद नव्हता याचे कारण तत्कालीन लढायांमुळे छिन्नविच्छिन्न झालेला किंवा खंडित झालेला सरंजामशाही जपानचा भूखंड होता! त्या जपानी भूखंडातील सामुराई पंथाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून आपल्या जमातीच्या संरक्षणासाठी सुयोग्य असणे अपेक्षितच होते!
जपानच्या प्रारंभीच्या काळात पुरुषांप्रमाणेच अनेक महिला सामुराई कुटुंबात जन्मलेल्या होत्या. ‘नागिनाता’ तलवार चालविण्याचे, युद्धातील घोड्यांवर बसण्याचे आणि ऐतिहासिक सन्मान्य लढवय्या वर्गाच्या युद्धनीतीचे शिक्षण त्या सामुराई महिलांनाही दिले जात होते. अनेक महिलांनी या प्रशिक्षणाद्वारे उत्तम लढवय्येगिरी प्राप्त केली होती. त्यापैकी काही महिलांना जपानच्या इतिहासात गौरवपूर्ण स्थानही प्राप्त झाले !
चौदाशे वर्षांपूर्वी, म्हणजे सहाव्या शतकात, जपानच्या इतिहासात सामुराई महिलांच्या लढायांच्या नोंदीही आहेत. अगदी प्रारंभीच्या काळातील पुरुष सामुराई कामित्सुकेन काटाना याच्या पत्नीच्या संदर्भातील एक कथा सांगितली जाते. कामित्सुकेन काटानाची पत्नी आपल्या पतीची वाट पाहून तिने किल्ल्यात बसून बसून कंटाळत असे. दमूनथकून जात असे. म्हणून लढायांत उडी घेण्याचा निर्णय घेतला. कामित्सुकेन काटानाच्या त्या लढाऊ वृत्तीचे पत्नीचे नाव मात्र जपानच्या इतिहासात नोंदविलेले नाही! अशा प्रकारे तिचे नाव इतिहासकारांनी नोंदविले नसण्याच्या कारणाची शक्यता म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीतील ऐतिहासिक नोंदी करणाऱ्यांचा पुरुषी अहंकार असावा, असे भाष्य एका लेखकाने त्या संदर्भात केलेले आहे! इतिहासात नावाने अज्ञात राहिलेल्या त्या कामित्सुकेन काटानाच्या पत्नीने आपल्या जीवनक्रमात क्रांतिकारक बदल स्वीकारला. ईर्षेने तिने अनेक स्त्रियांनाही प्रेरणा दिली. आपल्या पंथात सामील करून घेतले. शस्त्रांच्या वापराबाबत गांभीर्याने प्रशिक्षण घेतले. विशेषतः धनुष्य-बाण वापराचे प्रशिक्षण घेऊन अनेक सहचारिणी आपल्या मातृभूमीच्या संरक्षणार्थ सिद्ध झाल्या.
परंतु खऱ्या अर्थाने नामवंत महिला सामुराईंचा उदय पाहण्यास अनेक शतकांना ओलांडून १२व्या शतकाच्या आसपासच्या काळाचा विचार करावा लागतो. या काळात इटागाकी या महिला सामुराई वीरांगनेची आणि दंतकथेतील नायिकेची कथा ऐकायला मिळते. सरंजामशाही जपानमधील ताइरा कुटुंबातील अत्यंत महत्त्वपूर्ण नेतृत्व करणारी, नागिताना तलवारीचा वापर कौशल्यपूर्णरीत्या करणारी आणि घोडेस्वारीच्या कलेत पारंगत असलेली इटागाकी ही, महिला सामुराईंच्या इतिहासातील मैलाचा दगडच मानली जाते!
युद्धभूमीवर अनेक समरप्रसंगांत इटागाकीने वीरश्रीयुक्त पराक्रम गाजविले. परंतु तिच्या जीवनाच्या अखेरीस जी लढाई ती खेळली ती तिच्या सुप्रसिद्ध पराक्रमाची द्योतकच ठरली होती. त्या लढाईत तिच्या लष्करातील सैनिकांचे शत्रूच्या सैनिकांशी एकास तीन असे प्रमाण होते! तरीही त्या लढाईतून पळ काढणे इटागाकीने पत्करले नाही. ती लढाई जिंकू शकणार नाही याची खात्री असूनही ऐतिहासिक नोंदीनुसार इटागाकी अत्यंत शौर्याने अखेरपर्यंत शरणागती न पत्करता लढत राहिल्याचे दिसून आले. तळपती तलवार हाती घेऊन आणि प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का न लावू देता एखाद्या शूरवीर खऱ्याखुऱ्या सामुराईसारखी ती मृत्यूला सामोरी गेली होती.
इटागाकीच्याच काळात अनेक तलवारबहाद्दर महिला जपानच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटवून गेल्या आहेत. अत्यंत प्रसिद्ध लढवय्यी म्हणून हात्सू-जो हिचे नाव सांगता येते. हात्सू-जोच्या सूडभावनेतून दाखविलेल्या पराक्रमांची दंतकथाच जपानमधील एका सुप्रसिद्ध काबुकी नाटकातून दाखविलेली आहे. हात्सु-जो ही संघर्ष वा संकटे निर्माण करीत नव्हती किंवा लढाया वा मारामाऱ्यांसाठी संधी मिळावी म्हणून ती टपून बसलेली नव्हती. केवळ अनैतिक प्रवृत्तीचा एक मुलगा तिच्या कुटुंबाच्या नावाला नेहमीच काळीमा फासत असल्याने तिच्या सूड घेण्याच्या परंपरेचे पालन करणे भाग पडले. हा प्रकार वा हे नाटक सर्वत्रच तिचा पाठलाग करीत राहिले. त्यामुळेच तिला अत्यंत प्रिय असणाऱ्या व्यक्तींना गैरवागणूक देणाऱ्या किमान एका तरी शिक्षापात्र गुन्हेगारास ठार मारणे तिला क्रमप्राप्त ठरत असे.
जपानमधील इतिहासाच्या पुस्तकांत इतर अनेक सूड घेणाऱ्या सुप्रसिद्ध महिलांची नोंद आहे. आपल्या वडिलांच्या खुन्याचा शोध घेऊन त्याची शिकार करणारी मियाजिनो ही महिलाही सूड घेण्याची विधीनिती पालन करणारीच होती. त्याचप्रमाणे न्यायाच्या शोधयात्रेतील आपल्या दोन भावांच्या घेण्याच्या कृतीत मदत करणारी सुप्रसिद्ध तलवारबहाद्दर टोरा गोझन गोझेनची सूड कथाही जपानच्या इतिहासात नोंदविलेली आहे.
सामुराई लढाई महिलांची सतर्क वृत्ती किंवा दक्ष राहण्याची पद्धती ही आजच्या नितीनियमांच्या कसोट्यांवर रक्तपिपासू वाटेल; परंतु आजच्यासारखी पोलीस यंत्रणा त्या काळी नसल्याने आणि पोलीस स्टेशनला फोन करून संरक्षणार्थ मदत घेण्याचीही सोय नसल्याने सूड घेण्याच्या पद्धतीतून न्याय मिळविणे हाच तत्कालीन समाजाला योग्य पर्याय वाटत असावा! स्वसंरक्षण हाच तत्कालीन कायदा होता. ‘काटाकी- उची’चे तत्त्व त्या वेळच्या सरंजामशाही जपानमध्ये दक्षता घेण्याचे नीतिनियम म्हणूनच मान्यता पावलेले होते! ‘काटाकी-उची’ याचा अर्थ तत्कालीन सरंजामशाही जपानमधील ल एक प्रकार प्रकारचा सूड घेण्याचा सन्माननीय कायदाच असे म्हणता येईल!
जपानच्या सरंजामशाहीच्या काळातील एकसत्ताक राज्यपद्धतीच्या प्रारंभीच्या वर्षांत महिला या सत्ताधारी होत्या, हे विसरता येणार नाही. इ.स. ७७० पूर्वी एकूण सात वेगवेगळ्या महिला जपानमध्ये सम्राज्ञी होत्या, हेही लक्षात घ्यायला हवे.
जपानमधील सामुराई महिलांचा विचार करीत असतानाच असे म्हटले जाते की, तलवारबहाद्दर महिला ही काही केवळ जपानचीच मक्तेदारी नव्हती! जगातील सुप्रसिद्ध असलेल्या महिला योद्ध्यांमध्ये ‘मुलान’ नावाची चिनी महिला समाविष्ट आहे. चौथ्या किंवा पाचव्या शतकात चिनी भाषेत लिहिलेल्या मान्यताप्राप्त काव्याचा विषय झालेली मुलान ही वाङ्मयीन व्यक्तिरेखा असली तरी ती महिला योद्धा म्हणून चित्रित झालेली आहे, हे ध्यानात ठेवावे लागते.
चिनी काव्यातील मुलान ही महिला आपल्या पित्याची जागा युद्धात स्वीकारून अनेक वर्षे पुरुष म्हणून वेषांतर करून राहते. शूरवीर सैनिकाप्रमाणे नेतृत्व करते. विजयी होऊन ती परतते; परंतु तिच्या सहकारी सैनिकांपैकी कुणा एकालाही ती स्त्री असल्याचा सुगावाही लागत नाही! जेव्हा मुलान आपले चिलखत काढून टाकून स्त्रीवेषात अवतीर्ण होते तेव्हा तिचे देशवासीय थक्कच होतात. आपल्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या योद्ध्यांपैकी एक योद्धा म्हणजे एक महिला आहे हे पाहून मुलानच्या दे देशवासीयांना आश्चर्य वाटले नसते तरच नवल ठरले असते!
जपानी सामुराई महिलांचा विचार करताना चिनी काव्यातील मुलान किंवा ङ्गमॅग्नोलिआफ हिला विसरता येणार नाही, हेच सत्य!
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply