आपले मुल साडे तीन वर्षाचे झाले की आता माँटेसरीत घालणार असे म्हणतो, माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणाना माहित असेल.
शाळा प्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही ‘विज्ञान बनवणाऱ्या बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० रोजी झाला.
माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे की लहान मुलांच्या शाळेला आता जगभर सर्वत्र ‘माँटेसरी’ असेच म्हटले जाते.
माँटेसरी यांचा इटलीत शेअरवेल या गावात झाला. वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारीयाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळया शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मा.मारीयानी इंजिनियर होण्याचे ठरवले. पण पुढे त्यांना वनस्पतीशास्त्रात गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला. पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते. त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारीयांनी स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले. बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती याविषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
शिशुशिक्षणाची त्या पुरस्कर्ती होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्र व उद्योग शोधून काढली. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो. असे त्यांचे म्हणणे होते. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत. माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग माँटेसरींनी १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धांनंतर माँटेसरीं यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविले.
शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना सामुहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. मा.माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये चर्चासत्रे घेतली होती.
उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा त्यांचे नामांकन झाले. मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. मा.माँटेसरी यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे (१) द माइंड, (२) द डिस्कव्हरी ऑफ द चाइल्ड, (३) माँटेसरी मेथड (१९१२) (४) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४) (५) द अँडव्हान्स्ड माँटेसरी मेथड (१९१७). मा.माँटेसरी यांचे ६ मे १९५२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
>>माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. <<
पुण्यातील माँटेसरी वर्गांत अनेक सुरेख बाालगीते शिकवत. कुणाला ही भावगीते पाठ आहेत, असल्यास लिहून द्यावीत.
उदा० १. डोक्यावर चंद्रमा आणि गंगा,जटाधारी देवाचे नाव सांगा
२. माझं नाव चिंच, आडनाव आकडे, छळतात मला मुले नि माकडे; माझा भाऊ आवळा जरासा बावळा
वगैरे.