मध्यरंग (सन – १९९५)
पूर्वार्ध संपला तपापुर्वी महागाई गेली गगनापरी
पार्किंग स्पेसचे भाव, लाखापरी मुंबापुरीत वाढले ।।४२।।
वाशी आली मध्यावरी निर्माण झाली नवीन नगरी
दोन्ही मिळून अरबी सागरी नटून राहती की नवनवरी ।।४३।।
वांद्रा – कुर्ला नवीन कॉम्प्लेक्स आयडीबीआय अन् हिरे कक्ष
आयएसडी, एसटीडी अन् फॅक्स सर्वदा सेशी दक्ष ।।४४।।
आतंर्देशी कंपन्यांचे जाळे व्यापून टाकिती अवघेचि गाळे
मुंबापुरीची पोरे-बाळे निर्वासीत जाहली ।।४५।।
समाजवाद बुडाला सागरा अंतरी थैली बहाद्दरांची जाणावी मातब्बरी
डॉलर, मार्क अन् येनाची थोरवी मनोमनी साठवावी ।।४६।।
नवीन जगाचे नवीन नियम जगी असेना काहीच कायम
आयुष्याची दोरी भरभक्कम कधी न सोडावी रोकडी रक्कम ।।४७।।
जगणे हेचि आपुले गाणे नोकरीसमवेत पैसे खाणे
दिनरात देशचिंता करणे उदंड भरल्या उदरी ।।४८।।
हेचि असावे नवीन तत्त्वज्ञान पसापसा मागणे हीच खरी शान
आपण थोर सरकार चोर सर्वकाळ सर्वांशी सांगणे ।।४९।।
आपण स्वच्छ धर्मासारखे बाकी मात्र महाबेरके
शिव्या देण्यात म्होरके मास्तर, प्राध्यापक वा वार्ताहर ।।५०।।
स्वचक्षुतील झाकावे मुसळ पराचे दाखवावे कुसळ
यातचि मानावे भूषण जन सामान्य मानसी ।।५१।।
मुंबापुरी वाढती दाही दिशा कर्जत, कसारा वा पालघरच्या कक्षा
न करावी जागेची उपेक्षा महामुंबई नगरी ।।५२।।
अशातही राहती जे खरे ताठ ठकाठकांची पडे गाठ
उद्धटासि उद्धट सान थोर अन् भाट ।।५३।।
कोण थोर अन् कोण चोर कोण भा; अन् कोण उद्धट
पुंजी साठवावी फटाफट भारताच्या अर्थनगरी ।।५४।।
पैसे करणे हेचि असावे ध्येय पैसे खाणे आपले पांथेय
करावा ना कामाचा व्यय मिळे जिथे ना खाण्यास काही ।।५५।।
असो असो हे व्याख्यान मुंबई नगरीचे आख्यान
जयंते करितसे निरुपण जोडोनी दोन्ही कर वंदन ।।५६।।
असंच आपलं इकडलं तिकडलं
एक होता राजा त्याची काय मजा
त्यानं खाल्ला काऊ पोटात झाला बाऊ ।।१।।
एक होती मनीमाऊ तिचा काळा काळा भाऊ
त्याचं झालं लग्न मनी आपली खाण्यात मग्न ।।२।।
लाल लाल टोमॅटो अंगाने जाडजूड
त्याला भेटली मिरची गेला त्याचा मूड ।।३।।।
एक होती गाय तिला चार पाय
एका पायाने लंगडी शिंगात घाली बांगडी ।।४।।
उंदराच्या पाठीवर हत्ती झाला स्वार
हलेना बोलेना त्यानं खाल्ला मार ।।५।।
सिंहाच्या आयाळात लपून बसली ऊ
वाघाला वेडावते तुझी माझी गट्टी फू ।।६।।
आंब्याच्या वनामध्ये मोर झाला राजा
लांडोर मागून नाचते हीच त्याला सजा ।।७।।
वांदरात वांदर काला बंदर
नाकात घाली डूल कानानी हुंगी फूल ।।८।।
या कवितेचा उत्तर रंग २०१० मध्ये लिहिला गेला. संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली.
— द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
Leave a Reply