नवीन लेखन...

इतिहासातील भविष्यवाटा

जगाच्या इतिहासाचा अभ्यास बारकाईने व डोळसपणे केला तर किती तरी नावीन्यपूर्ण माहिती आपल्यासमोर येते. जगाची जडणघडण कुठल्या गोष्टींवर आधारित आहे, त्याचा पाया कसा रचला गेला आहे, ह्याचे ज्ञान आपल्याला मिळते. हिंदुस्थानाचा विचार केला तर जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एका प्रमुख संस्कृतीचे आपण वारसदार आहोत ह्याची जाणीव आपल्याला होते. संस्कृती आणि सभ्यता ह्यातील फरक न जाणवणाऱ्या अशा पुसट रेषेचा आहे. त्यामुळे आपल्या प्राचीन संस्कृतीमधून देशाची जडणघडण घडवणारी सभ्यता आपल्याला वेगळी करता येत नाही. हिंदुस्थानात पाच हजार वर्षांचा इतिहास उराशी घेऊन संस्कृती व सभ्यता वाटचाल करताना दिसून येतात.

इतिहास म्हटले की, नजरेसमोर तरवारींचा खणखणाट, रणभूमी, राजे-महाराजे हेच चित्र बहुतांशी उभे राहते. इतिहासाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण आजही काहीसा उदासीन, मागासलेपणाची भावना असणारा, भूतकाळाचा कसा उपयोग करायचा, जे घडून गेले आहे त्याचा विचार कशाला करायचा, ह्या विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो. नाही तर इतिहास म्हणजे कथा, दंतकथा, कल्पनाविलास असाही काहींचा समज आहे. त्यामुळे स्वत: इतिहास हा विषय निवडून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प असेच आहे.

जो आपल्या इतिहासाला विसरतो त्याला जग विसरते, असे म्हणतात. परंतु ह्या विचारातूनही आपण फारसा काही बोध घेत नाही कारण घड्याळाच्या काट्यावर चालणारे शहरी जीवन आणि परिस्थितीशी झुंज देणारे ग्रामीण जीवन हे बाह्य प्रलोभनात अडकून पडलेले दिसते. मात्र तरीही काही व्यक्ती, विद्यार्थी इतिहासाचा प्रामाणिकपणे मागोवा घेतात. तो अभ्यासतात. त्यामुळे इतिहास जिवंत ठेवला जात आहे. पण तरीही इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलण्याची नितांत गरज असल्याचे आजही जाणवते.

दहावीनंतर पुढे काय? हा विचार आजचा विद्यार्थी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर करत असतो. गुणांच्या आधारावर मिळणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्याचे ध्येय निश्चित झालेले नसते.

आपली आवड, आपल्याला भविष्यात काय करायचे आहे, ह्याची जाणीव व तसा विचार करून त्यासाठी तयारी फारच थोडे विद्यार्थी करत असतात. अर्थात ह्यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. ध्येयनिश्चितीबाबतचे हे कटु वास्तव आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रथम पसंती विज्ञान शाखेला, द्वितीय पसंती वाणिज्य शाखेला आणि तृतीय पसंती कला शाखेला असते. त्यातही आवड म्हणून फार थोडेच विद्यार्थी इतिहास विषयातून पदवी प्राप्त करतात आणि बाकीचे शिक्षण पूर्ण करण्यापुरते पदवी मिळवतात. ह्या संपूर्ण वास्तवतेचा विचार करूनच मी आज तुमच्यासमोर इतिहासातून कोणते करिअर करता येते ह्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे. इतिहास हा विषय घेऊन कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते, भविष्य निश्चितीचे कोणते मार्ग उघडे होतात, उदरनिर्वाहासाठी इतिहास विषयही उपयुक्त कसा ठरतो ते मांडणार आहे.

१) इंडॉलॉजी

म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास होय. ह्यात भारतीय धर्म, प्राचीन लिपी, नाणकशास्त्र, प्राचीन काळातील भारताचे परदेशीय संबंध, संस्कृती, भाषा, प्राचीन साहित्य इत्यादी गोष्टी अभ्यासता येतात. उच्च शैक्षणिक संस्थांचे शिक्षक, ग्रंथपाल, पत्रकार इत्यादींसाठी हा अभ्यास उपयुक्त ठरतो.

२) प्राध्यापक/शिक्षकीपेशा

इतिहास विषयामध्ये पदवी प्राप्त करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित कार्य करता येते. शाळा ते महाविद्यालयीन शिक्षणामध्ये इतिहास हा विषय शिकवला जातो. त्यामुळे इतिहासात पदवी प्राप्त करून शिक्षकीपेशासाठी कार्य करता येते.

३) ग्रंथपाल

इतिहास ह्या विषयातील ज्ञान ग्रंथपालांसाठीही आवश्यक आणि उपयुक्त ठरते. शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रांत ग्रंथपालांना खूप मागणी आहे. प्राध्यापकांना संशोधनासाठी साहाय्यक म्हणूनही काम करताना, प्रबंधलेखन करताना, ग्रंथपालांच्या इतिहासज्ञानाचा उपयोग होतो. शाळा, महाविद्यालय, संशोधन केंद्र अशा ठिकाणी ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावतात.

४) MPSC/ UPSC

राज्यशासनाच्या किंवा केंद्रशासनाच्या अधिकारपदांवर कार्य करण्यासाठी ही परीक्षा देणे आवश्यक ठरते. ह्या परीक्षेसाठी ज्या विषयाची तयारी करावी लागते त्यातही इतिहास हा विषय उपयोगी ठरतो.

५) पत्रकारिता

पत्रकार म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचे भाषेवर प्रभुत्व आवश्यक असते. तसेच त्यांना इतिहासाचे ज्ञान संदर्भासाठी उपयोगी असते. आपल्या देशाचा इतिहास, समाजाची बदलती भूमिका, धोरणे हे इतिहासाच्या अभ्यासातून समजते.

६) लेखक

करिअर म्हणून लेखक होणे हे आपल्याकडे अजूनही फारसे विचारात घेतले जात नाही. पण हा एक आनंद देणारा भविष्यमार्ग आहे. तुम्ही इतिहासविषयातून पदवी घेतली असेल व लेखनाची आवड असेल तर ऐतिहासिक नाटके-कादंबरी इत्यादी लेखन करणे सहज शक्य आहे.

७) क्युरेटर

संग्रहालये, ग्रंथालये, सांस्कृतिक वारसा संस्था इत्यादी ठिकाणी असलेल्या मौलिक वस्तूंची काळजी घेण्याचे कार्य क्युरेटर करतात. इतिहास विषयातील शिक्षण ह्या पदासाठी आवश्यक ठरते.

८) पुरातत्त्व विभाग

आर्कियॉलॉजी ह्या विषयाच्या आधारे संशोधन क्षेत्रात कार्य करता येते. प्राचीन शहरे, मंदिरे, गड-दुर्ग इत्यादी ठिकाणी उत्खनन करून इतिहास शोधता येतो. पुरातत्त्व खात्यात काम करायचे असेल तर इतिहासज्ञान व शिक्षण गरजेचे आहे.

९) म्युझियोलॉजिस्ट

संग्रहालयाचे व्यवस्थापन ह्या क्षेत्रातील करिअर आकर्षक आहे. संग्रहालयात पुरातत्त्व विभाग, इतिहास, संग्रह इत्यादींचा समावेश असतो. खाजगी व सरकारी संग्रहालये भरपूर प्रमाणात कार्यरत आहेत. इतिहासविषयक ज्ञान ह्या क्षेत्रासाठी योग्य ठरते.

१०) पुराभिलेख

भूतकाळातील नोंदी समजून घेण्यासाठी आर्काइव्हिस्ट नियुक्त केले जातात. अभिलेखीय माहिती जतन करणे, वाचन करणे, तिची नोंद ठेवणे इत्यादी कामे ह्या क्षेत्राशी निगडित आहेत. हस्तलिखिते, नाणी, नकाशे, छायाचित्रे, कागदपत्रे इत्यादी संबंधित कार्य करताना इतिहास ह्या विषयाचा उपयोग होतो.

११) पर्यटनक्षेत्र

इतिहासविषयात पदवी घेतल्यानंतर पर्यटन क्षेत्रात करिअर करणे खूप सोयीस्कर होते. विविध पर्यटन क्षेत्रांची माहिती, तेथील इतिहास, प्रथा- परंपरा ह्यांचे ज्ञान उपयुक्त ठरते. येणाऱ्या पर्यटकांना त्याबद्दल माहिती देता येते.

१२) नाणकशास्त्र

इतिहासाचे बोलके माध्यम म्हणजे नाणी. इतिहासमाध्यमातून नाण्यांचा अभ्यास करता येतो. त्याद्वारे इतिहासाचे संदर्भ शोधता येतात.

१३) संग्रह

पुरातन मूर्ती, शस्त्रे, वस्तू ह्यांचा संग्रह करून त्याचे प्रदर्शन मांडणे, त्याद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहचवणे हा इतिहासविषयाशी संबंधित चांगला पर्याय आहे. इतिहासाचे ज्ञान ह्या संग्रहाला बोलके करू शकते. तसेच आपला छंदही जोपासता येतो.

१४) इतिहास मार्गदर्शक

इतिहासविषयातील ज्ञान तुम्हाला ऐतिहासिक स्थानांचे मार्गदर्शक बनवू शकते. मंदिरे, लेण्या, इत्यादी ठिकाणांची माहिती पर्यटकांना देताना इतिहासाचा अभ्यास अवास्तवतेपेक्षा वास्तव ज्ञान देतो.

१५) माहितीपट

एखाद्या ठिकाणाचा इतिहास ज्ञात असेल तर त्याचे चित्रण करून माहितीपट बनवणे सोपे जाते. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात ह्या माहितीपटांचा वापर अनेक जण करतात. इतिहास ह्या विषयाशी निगडित माझ्या ज्ञानानुसार ह्या भविष्यवाटा मी तुमच्यासमोर मांडल्या आहेत.

इतिहास का शिकला पाहिजे, ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे म्हणून असे आहे. इतिहासातून करिअर करता येते. इतिहास ह्या विषयाची आवड असेल तर ते काम करताना प्रसन्नता जाणवते. उत्साह वाढतो. इतिहास, विज्ञान, भूगोल ह्यांचा त्रिवेणी संगम निसर्गाशी संबंधीत आहे. त्यामुळे तो अनुभव कायम आनंददायी असतो, हे मात्र खरे आहे.

-शिल्पा परब-प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..