सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक वाचनात आलं “द गर्ल हू चोज्” रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु जणू काही आपल्या सर्वच समस्यांचे उत्तर देऊन जाते.
आपल्या समस्यां काय? आपल्याला जे मिळते ते आपल्याला मान्य नसल्याने होणारा त्रास म्हणजे आपल्या सर्व समस्यांचे मूळ. जीवन हे एक चक्रात सुरु असते. कधी चांगले तर कधी वाईट प्रसंग येत असतात. जे वाईट भासते ते व्हायलाच नको अशी आपली धारणा असल्याने त्याचा आपल्याला त्रास होतो. पण जास्त त्रास होतो जेव्हा आपण जे आपल्याला नकोसं असतं त्याचा दोष दुसऱ्या कुणाला तरी देत असतो.
आपला समज असा आहे की ” मी स्वतःसाठी वाईट कसे निवडणार”? त्यामुळे जे होत आहे त्याला दुसरे कुणीतरी, किंवा नशीब आणि देव तरी कारणीभूत आहे. आणि असा विचार करून आपण जास्तच दु:खी होतो.
रामायणात सीतेच्या परिस्थितीला आणि भोगाला रावण आणि रामालासुद्द्धा कुठे ना कुठे कारणीभूत ठरवले जाते. पण खरंच तसे होते का?
पटनाईकांनी सीतेने केलेले पाच निर्णय संपूर्ण रामायणाला आणि सीतेच्या भोगाला कसे कारणीभूत ठरले ते आपल्या समोर ठेवले आहे.
ते पाच निर्णय असे :
१. रामाला वनवास ठोठावला गेल्यावर सीतेने त्याच्यासोबत वनवासात जायचा निर्णय स्वतः घेतला.
२. लक्ष्मणाने निक्षून सांगितले असतांनाही तिने रावणाला भिक्षा द्यायला लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा निर्णय घेतला.
३. जेव्हा हनुमानाने सीतेला लंकेतून चलण्याचा आग्रह केला तेव्हा सीतेने निर्णय घेतला की रामाने तिथे येऊन रावणाचा पराभव करून तिला नेल्याशिवाय ती अयोध्येला परतणार नाही.
४. रावणाला हरवल्यावर रामाने सीतेला सांगितले की त्याने आयोध्येची आणि कुळाची मर्यादा राखली, आता सीता तू कुठेही जायला मोकळी आहे. त्यावेळी सीतेने रामासोबत जायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अग्निपरीक्षा देण्याचाही निर्णय घेतला.
५. सरते शेवटी जेव्हा लव- कुश भेटल्यावर आणि जनमानसाने कौल दिल्यावर रामाने सीतेला अयोध्येला परत चलण्याची विनंती केली, त्यावेळी सीतेने भूमीत परत जाण्याचा निर्णय घेतला.
ह्या सर्व निर्णयामागचे कारणं कुठलीही असोत, पण अधिकांश वेळी सीतेला निर्णय घेण्याचा अधिकार होता.
त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात होत असलेल्या अधिकांश घटनाक्रमांमध्ये आम्हाला निर्णय घेण्याची संधी मिळते. त्या वेळी आपण कुठला निर्णय घेतो हे आयुष्यातल्या पुढच्या घटनांना कारणीभूत ठरते.
तुमची पत्नी तुम्हाला हवं तशी वागत नाही? पण लग्न करताना तुम्ही तिची निवड केली होती… कुठल्या कारणाने ? ती सुंदर दिसते ? शिकलेली आहे ? पैसा कमावते ? व्यवस्थित रहाते ? स्मार्ट आहे ? स्टाइलिश आहे ? ती तुम्हाला आवडली होती, पण त्यावेळी तिने तुमच्या इच्छेप्रमाणेच वागायला हवं अशी अट तुम्ही ठेवली होती का ?
तुम्हाला नोकरीत हवा तेवढा पैसा मिळत नाही. पण ज्यावेळी शाळेत आणि कॉलेजला अभ्यासात मेहनत करायची वेळ होती त्यावेळी तुम्ही पूर्ण मेहनत करायचा निर्णय घेतला होता का? की त्यावेळी दोस्तांसोबत वेळ घालवायचा निर्णय तुम्ही घेतला होता? नोकरीत बढतीसाठी नवनवीन शिकायची आवश्यकता असते हे माहीत असतांना तुम्ही मेहनत घेतली की दिवसभर काम करून थकून जातो म्हणून सोडून दिलं ?
आणि ब्लड प्रेशर वाढणे चांगले नाही, डायबिटीसमुळे डोळे आणि किडनी खराब होतात, सिगरेटी आणि तंबाखू सेवनाने आजार होतात इत्यादींची संपूर्ण जाणीव असतांना तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा निर्णय घेता का… ?
आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो.
रामायणाच्या ह्या वेगळ्या पैलूला आपल्या घरात जरूर जागा द्या. त्रास असतांना देखील आयुष्यातली संतुष्टी वाढेल आणि मुलांनाही जीवनाचा एक आवश्यक पहेलू देता येईल.
Leave a Reply