मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.
पूर्वरंग (सन – १९८२)
इये मुंबईचिये नगरी महाराष्ट्राचा राजदंडधरी
तरी श्रवणावी तियेची थोरवी सावधान चित्ती ।।१।।
कोळी, पाठारे आणि पारसीक गुर्जर, अंग्रेज अन् भंडारी
निर्मिती ही बाका नगरी पश्चिम सागराचे तीरी ।।२।।
सातार्याचे घाटी कोलशे, गोव्याचे पै, बेलोसे
रत्नांग्रीचे पानसे नांदती सुखे समाधाने ।।३।।
कानपूरचे चौधरी जालंदरचे कलंदरी
येता अंतरी जाती ना परी माघारी आपापल्या घरी ।।४।।
ऐसे चारी दिशांचे बिलंदर मुंबैत राहती जैसे उंदीर
त्यात मिसळती लुंगीधर अय्यंगार अन् नायर ।।५।।
ऐशा मुंबापुरीचा डंका वाजे चारी दिशांत बाका
उचलूनी आपापल्या बॅगा आग्रवाल धावती ।।६।।
मुंबापुरीचे भाग दोन राव आणि रंक छान
नगर आणि उपनगर पश्चिम किंवा पूरब ।।७।।
मराठी अथवा अमराठी पकडूनी दोघांना वेठी
धंदा करिती दिनराती पटेल, मस्तान किंवा शेट्टी ।।८।।
हाती जयाच्या तगडा दंडा तोचि मानावा की तगडा बंडा
सर्व संकटांचा तोडगा त्यापाशी सापडे ।।९।।
जियाचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी
जयाच्या हाती युनियनची नाडी तो मुंबईकरांना ताडी ।।१०।।
हाती जयाच्या परजलेला सुरा किंवा हाणी जो लोखंडाच्या शिगा
असल्या काळ्याकुट्ट नरपुंगवा प्रणाम घालावा पहिला ।।११।।
रोटरी, लायन किंवा जेसी जायंट किंवा परदेशी
हरे राम हरे कृष्ण यांच्याशी घसट ठेवावी दुरूनी ।।१२।।
आर के, मेहबूब किंवा फिल्मीस्तान मशहूर अवघ्या हिंदूस्थान
चंदेरी, रुपेरी नकली शान काय तियेचि वर्णावी ।।१३।।
महालक्ष्मीचा रेसकोर्स ब्रेबॉर्न वा वानखेडेचा जोश
मुंबापुरीच्या वास्तु खास यथाशक्ती अवलोकाव्या ।।१४।।
मटका, सट्टा किंवा ट्रिबल पूल तीन पत्ती अन् महाराष्ट्र लॉटरी
पैसे लावावे दैवावरी करावा नंतर शंखध्वनी ।।१५।।
दक्षिणेच्या सागरतीरी नामदारांच्या राहत्या घरी
काय वर्णावी तिथली बजबजपुरी अरबी सुरस कथेपरी ।।१६।।
दिवसा चाले राजकारण सायंकाळी अर्थकारण
रात्रंदिन भोजन समयानुसार वेगळे ।।१७।।
भाकरीसवे कांदा चटणी किंवा चोपावी मुर्गी मटणी
संगे युनियनचे लीडर बेरकी किंवा कधी नर्तकी ।।१८।।
वेळेनुसार वागण्याचे नियम खुर्ची पकडावी कायम
सत्तेचा न सोडावा लगाम ना तरी येते मूर्खपणा ।।१९।।
असो असो हे मंत्री आख्यान कृतीपेक्षा थोर व्याख्यान
सरतेशेवटी इंदिरेचे निरुपण सदासर्वदा उच्चारावे ।।२०।।
टॅक्सी, बी ई एस टी वा रिक्षा सेंट्रल वा वेस्टर्न रेल्वेच्या कक्षा
उतरावी मुंबईकरांचा नक्षा कुठे केव्हा अन् कसाही ।।२१।।
काय वर्णू या बी ई एस टी चा थाट टॅक्सीवाल्यांची वेगळीच जात
मध्यरेल्वेची त्यावर मात भरडूनी काढती मुंबईकरा ।।२२।।
नऊसातची डोंबिवली फास्ट शीव स्थानकावर थांबणे मस्ट
मस्टरवरच्या सहीचे उद्दीष्ट कधी सफल न करावे ।।२३।।
गिरगांव, पार्ले नि दादर बाबू लोकांचे आगर
लालबाग, परेलचे मजदूर ठिय्या देउनी बैसले ।।२४।।
काळबादेवी अन् भुलेश्वर नोकरीपेक्षा धंदा थोर
चांदी सोन्याचे व्यवहार रातंदिन चालती ।।२५।।
मलबार हिल अन् वाळकेश्वर लक्ष्मीपुत्रांचे माहेरघर
प्राणापेक्षा पैसा थोर साव संभावित अन् चोर ।।२६।।
व्हिटी स्टेशनची वास्तू छान जीपीओ ची कृती महान
बीएमसी अन् टाउन हॉल हॉलमार्क मुंबईचे ।।२७।।
म्युझियम अन् एस्प्लनेड कोर्ट हुतात्मा चौक अन् कुलाबा फोर्ट
मरीन ड्रायव्हची शोभा क्यूट अवघ्या भारती प्रसिद्ध ।।२८।।
चोर बाजारी वस्तू स्वस्त बाजारापेक्षा भावही रास्त
घासाघाशी चाले खास्त आपल्याच मालाची ।।२९।।
वर्सोव्याचा बीच छान माहीम दांड्याचा धंदा लहान
स्मगलिंग मालाची तृष्णा महान सर्वकाळ पुरवितसे ।।३०।।
प्रेसिडेंट, ओबेरॉय अन् नटराज अरबी शेखांचे कामकाज
मुंबापुरीच्या गणिकांची शेज सुखनैव साधती ।।३१।।
काय सांगू या नगरीच्या गमती गंगु होई तल्लख मती
स्वर्ग अन् नरकाची स्थिती गुण्या गोविंदे नांदती ।।३२।।
रोज रोज नवे विचार बेचाळीसचे बंड थोर
चव्वेचाळीसचा स्फोट घोर मुंबापुरीचा इतिहास ।।३३।।
सन पंचेचाळीस साली नेव्ही देई बंडाची होळी
हिंदु-मुस्लिम दंग्याची आरोळी सेहेचाळीसाव्या वर्षातली ।।३४।।
सत्तेचाळीसात देशभंग मुंबापुरीचा बेरंग
राष्ट्रपित्याचा दुर्भंग त्यानंतर जाहला ।।३५।।
संघावरची बंदी उठवा सत्याग्रहाचा एकच जोगवा
संयुक्त महाराष्ट्राचा गाजवा दणादण गजर ।।३६।।
चव्हाण, नाईक नि कन्नमवार पवारांनंतर अंतुले घातवार
भोसल्यांचे कुळ थोर सर्व छत्रपतींचे अवतार ।।३७।।
शिवसेनेचे सेनापती घाटकोपरचे महारथी
मुंबईकरांची दैवगती काळानुसार ठरवती ।।३८।।
सांगू किती हा इतिहास भूगोल वाढला वाशी पास
भविष्याचा घोर ध्यास म्या पामरे सांगू काय ? ।।३९।।
जे जे होईल ते ते पहावे जे जे भोगणे ते भोगावे
पकडूनी लोकल जिवेभावे काळासवे वर्तावे ।।४०।।
ऐसी सुरस मुंबईची कथा पैशासाठी खाव्या लाथा
जनमाणसाची सामान्य व्यथा सादर करितसे जयंते ।।४१।।
या कवितेचा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली.
— द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
Leave a Reply