गोष्ट १५ वर्षांपूर्वीची असेन कदाचित पण वार शुक्रवार होता हे नक्की. नांदेडला दर शुक्रवारी ज्योती टॉकीज जवळ बाजार भरतो. आठवडी बाजाराची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला तेवढीच असते जेवढी नोकरमान्याला महिन्याच्या पगारीची !. मी आणि माझ्या मोठ्या भावाने ४ दिवसापासूनच शुक्रवारच्या बाजाराची प्लांनिंग सुरु केली होती. प्लॅन असा होता – ” गुरुवारी संध्याकाळीच भोपळे तोडून दोन पोती भरून ठेवायची आणि शुक्रवारी भल्या पहाटे नांदेडला जाऊन विकायची “.
ठरल्याप्रमाणे शुक्रवार उजडला , भोपळे एवढे वजनाने जाड असतात की सांगू नका त्यामुळे दोन पोते ठेवल्यावर आमची जुनी ऍटलास सायकल थरथर कापायला लागली. तिच्यावर बसणं तर सोडा नुसतं ढकलणं अवघड जात होत. बाजार ठिकाणापासून माझं गावं ३० किलोमीटर अंतरांवर. एवढं अंतर चालत जाणं आणि ते पण भोपळ्याने लादलेली सायकल ढकलतं, हे महा कठीण काम तेंव्हा माझ्यासाठी फक्त ” बाँये हात का काम था “. कारण चार दिवसापासून मी फक्त कामाचीच प्लॅनिंग करत नव्हतो तर त्यातून मिळणाऱ्या पैशाचं काय-काय करायचं हे पण ठरवत होतो.
आमचा प्रवास सुरु झाला एकदाचा. कॅनॉल मार्गे निघालो.वाटलं शॉर्टकट आहे. सिडको पर्यंत आल्यावर थकवा जाणवत होता. कधी मी हॅन्डल धरून सायकलला रास्ता दाखवायचो कधी माझा मोठा भाऊ. थोडासा चढ आला कि धक्का द्यायला मी तर चड्डी सावरून तयारच होतो. गप्पा करत करत आम्ही निघालो. कच्चा रस्ता संपून डांबर रोड लागला. सिडकोला माझ्या दूरच्या आत्याच्या मुली शिकायला होत्या. एवढ्या मोठ्या सिडकोत मला त्यांच्याच येण्याची भीती वाटत होती. सिडको कधी जाईन आणि कधी लातूर फाटा येईन असं वाटत होत. मी नुसती सायकल ढकलत नव्हतो तर त्याच बरोबर मनातल्या मनात भोपळे विकून किती पैसे येतील याचा हिशोब पण लावत होतो. जर किलोने गेले तर जास्त येतील आणि नगाणे गेली तर कमी येतील. दोन पोत्याचे अंदाजे माझ्या हिशोबाने कमीत कमी २०० ते २५० रुपये येणार म्हणजे येणारच.
शेवटी पोहोचलो एकदाच बाजाराच्या तोंडाला. पोती सायकलवरून उतरवली. मी आणि माझा भाऊ इकडं तिकडं डोळे वासून पाहायला लागलो. नवीन जनावरांना बघून आमचं गायीचं वासरू कस करत तस आमचं व्हायला लागलं. जिकडं पाहावं तिकडं भाज्यांचं भाज्या. मी मनातल्या मनात म्हणालो , ” इच्या मायला एवढ्या भाज्या असताना आमचे धोंड्या सारखी जड भोपळी कोण खाईल?’. आता माझा हिशोब खाली खाली येऊ लागला.
आमचे चुलत भाऊजी पण भाजीपाला विकायचे त्यावेळी. ते आमच्या अगोदरच बाजारात जागा धरून बसले होते. त्यांच्या भाज्यांच्या बाजूला आमच्या भोपळ्यानां थोडी जागा मिळाली एकदाची. भाऊ आणि भाऊजी भाज्यांच्या भावा बद्दल चर्चा करू लागले. तेवढ्यात दोन जाडजूड बायका , रंगबिरंगी पिशव्या घेऊन माझ्या समोर आल्या आणि भाव विचारू लागल्या. त्यांनी भाउजीने आणलेल्या भेंडी आणि कोथिंबीर बद्दल विचारलं , मह्या भोपळ्याकडे बघितलं पण नाही. एक भोपळा २ रुपयाला मागताना गिऱ्हाईकाला अजिबात लाज वाटत न्हवती. बाजारच रूप बघून आणि गिऱ्हाईकांची स्टाईल बघून माझे पाय जमिनीवर आले आणि माझा टोटल हिशोब ५० रुपयांच्या खाली आला.
भावाने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याला समजलं मला काय झालाय ते. त्याने न विचारता बाजूच्या हॉटेलातून एक ३ रुपयांची कचोरी आणून मला खायायला दिली . माझी कचोरी खाऊन झाल्यावर भाऊ म्हटला , ” हे ५ रुपये घे आणि सिडको पर्यंत ऑटो नि जा नंतर मग कॅनॉल चा रस्ता धरून आलं तस पायी जा “.
मी जड अंतकरणाने घराकडे निघालो. माझा विश्वासच उडाला या सगळ्यावरून. जग मोठं असत हे कळलं पण त्याच बरोबर शेतकऱ्याचं स्वप्न किती लहान असत हे पण पहिल्यांदा जाणवलं. या बाजारात माझ्यासारखा लहान मुलगा टिकू शकणार नाही हे माझ्या भावाला माहित होत म्हणून त्यानं मला दिवसभर उन्हात उभं नाही केलं. दिवसभर काय झालं आणि किती पैसे आले याचा हिशोब मी माझ्या मोठ्या भावाला विचारला नाही , कारण त्या हिशोबाची पुरेपूर जाणीव मला होती.
Leave a Reply