“आलिया भोगासी” हा लेख पाच सहा दिवसांपूर्वी मी पोस्ट केला होता आणि त्याला वाचकांचा मनापासून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मिळाल्या.
त्याचा पुढचा भाग म्हणता येईल किंवा त्यातून झालेली जाणीव या लेखात मांडली आहे.
धन्यवाद.
माझी अर्धांगिनी गुडघ्याच्या दुखण्याने आजारी झाली, डॉक्टरनी तिला औषधांसहीत पूर्ण आराम सांगितला आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातलं सगळं (कुणी म्हणेल “मग काय सगळं?”) काम करता करता मला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होऊ लागली.
म्हणजे बघा ना, यापूर्वी काही वेळा सकाळचं अन्न उरलं असेल, आणि हिला रात्रीच्या जेवणासाठी काही बनवायला कंटाळा आलेला असेल, अशावेळी ही काय करते ?
तर आधी आम्हाला वाढते. नेहमीप्रमाणे आमच्या बरोबर बसत नाही जेवायला.
“तू का बसत नाहीयस आज?” विचारल्यावर ती म्हणते,
“आज फारशी भूक नाहीय मला, मी नंतर बसते”.
यातली मेख काय असते, तर आमचं जेवण व्यवस्थित व्हावं, आम्हाला काही कमी पडू नये. अर्थात आमच्याही ते लक्षात येतं, मी आणि लेक एकमेकांना नेत्रपल्लवी करत आमचं जेवण आटोपतो. सध्या हीची जागा मी घेतलीय इतकंच. बाहेरून आणलेल्या पोळी भाजीची मोजदाद करून आधी हिला आणि लेकाला वाढतो आणि तेच कारण सांगून नंतर बसतो. घरातल्या इतरांच व्यवस्थित झालं की, का कोण जाणे पण खूप छान समाधान वाटतं. म्हणजे मी काही उपाशी वगैरे रहात नाही. आणि तसंही वयानुसार हल्ली संध्याकाळी काही खाणं झालं असेल तर रात्री फारशी भूकही नसते. उपाशी वगैरे कुणीच नसतं, तरीही हा जो दुसऱ्याला संतुष्ट करण्यातला आनंद आहे ना, तो मात्र मला नव्याने अनुभवायला मिळाला.
हिला ना भातुकली सारखं लहान ताट घेऊन त्यात जेवायची सवय आहे. आम्ही तिला नेहमी यावरून बोलतो, पण तिच्यात काहीही बदल होत नाही. आम्हाला मात्र मोठी थोरली ताटं ठेवलेली असतात. पण गंमत म्हणजे सध्या तिच्या आजारपणात मी ही नेमकं तेच करतोय. हिला आणि लेकाला मोठ्या ताटात वाढून मी लहान ताट(अगदी ही घेते तेवढं नाही) घेतो. या मागचं logic मला खरंच कळलेलं नाही आणि सांगताही येणार नाही. दुसरं म्हणजे, रात्रीचं सगळ्यांचं जेवणं आटोपलं, झाकपाक झाली की हिला ओटा त्याच्या मागच्या टाईल्स सकट अगदी स्वच्छ पुसून काढण्याची सवय. रात्री आणि सकाळी स्वयंपाकघरात शिरल्यावर, हा तिचा शेवटचा रात्रक्रम आणि पहिला दिनक्रम असतो. तांब्याचं पिण्याच्या पाण्याचं भांडं, ते ही ती धुवून उपडं घालून ठेवते, आणि रात्री पाण्याने भरून ठेवते. मी तिला नेहमी म्हणायचो,
“ओटा स्वच्छ करतेस ते ठीक आहे, त्या टाईल्स कशाला पुसायला हव्या रोज ? उगीच तुझं काम वाढवत असतेस.”
पण तिचा क्रम काही चुकत नाही. सध्या माझ्याकडे चार्ज आल्यावर, रात्री ओटा पुसताना मी पहिलं, स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी केलेल्या स्वयंपाकाची चिन्ह, तेल फोडणीचे, भाजी आमटीचे कण टाइल्सवर व्यवस्थित दिसत होते. मनातल्या मनात आपली चूक मान्य करून मी टाईल्स स्वच्छ करायला घेतल्या. आता मी ही तांब्याचं भांडं नियमित धुतो, सकाळी स्वयंपाकघरात शिरल्यावर आधी ओटा, गॅस शेगडी स्वच्छ पुसून घेतो आणि त्यानंतरच तांब्याच्या भांड्यातलं पाणी कोमट करायला गॅसवर ठेवतो. या जाणिवा होण्यासाठी बायकोला आजारी व्हावं लागलं. तिच्या तोंडात एक वाक्य नेहमी असतं,
“वाईटातून नेहमी काहीतरी चांगलं घडतं.”
तिची आणखी एक सवय नित्याची आहे. कोणतंही भांडं, ताट, वाटी किंवा अगदी छोटासा चमचा जरी असला तरी तो नळाखाली धुवूनच घ्यायचा. मी किंवा आमचा लेक चहा वगैरे काही करत असलो तरी ती बाहेरून सांगत असते,
“विसळून घे रे सगळं”.
आम्ही आळशीपणा करतो.
“स्वच्छ तर आहे, उगीच तुझं धुवून घ्या, धुवून घ्या सुरू असतं.”
तिचं म्हणणं असायचं, चुकून सुद्धा रात्रीचं एखादा बारीक कीटक, कोळी क्वचित लहानसं झुरळ त्यावरून जाऊ शकतं. आणि हे होऊच शकतं. माझ्या एका परिचितांना नॅपकिनमध्ये असलेल्या बारीक कोळ्यामुळे चेहऱ्यावर त्वचा इन्फेक्शन झालं होतं.
तर सांगत काय होतो, तिच्या या कृतीला विरोध करणारा मी, बायकोच्या आजारपणात स्वयंपाक घरातलं प्रत्येक भांडं विसळून घेऊ लागलो.
जावे त्यांच्या वंशां तेव्हा कळे, हे अगदी खरं आहे.
एखाद्या बरणीत अथवा डब्यात ठेवलेलं पूर्ण संपल्याशिवाय साठवणीच्या डब्यातलं ती त्यात भरत नाही. माझा याला नेहमी विरोध असायचा. तिच्या आजारपणात एकदा अशीच साखर संपली, आणि माझी बडबड सुरू झाली,
“संपण्याच्या आधी भरून ठेवायला काय होतं कोण जाणे. डबा पूर्ण रिकामा होईपर्यंत का थांबायचं म्हणतो मी. साठवणीतल्या डब्यातलं आधीच भरायचं ना. पण ऐकायचं म्हणून नाही.”
ही बडबड का, तर आपल्याला थोडा जास्त त्रास पडणार म्हणून, आणि ते सोपही असतं.
पण आता कळू लागलं, की डब्यातली वस्तू संपली, की तो डबा म्हणा बरणी म्हणा स्वच्छ धुवून पुसून मगच त्यामध्ये पुन्हा नव्याने भरायचं. संपायच्या आत पुन्हा पुन्हा भरत राहिलं तर तो डबा बरणी धुतलीच जाणार नाही.
इतके दिवस आडवी असलेली बायको पुन्हा उभी राहिली, त्याक्षणी घरातल्या साजिवांपासून(मी आणि लेक) निर्जीव वस्तूंपर्यंत सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला, (निर्जीव वस्तूंनी का? तर माझ्या तावडीतून सुटल्याचा.) आणि संपूर्ण घराची कळा आपोआपच बदलून गेली, कारण पुन्हा एकदा गृहलक्ष्मीचा हात त्यांच्यावरून फिरणार होता ना.
बायकोच्या आजारपणात अनेक जाणिवा नव्याने झाल्या इतकंच.
–प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply