नवीन लेखन...

जानसे ध्यानतक

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये पं. यशवंत देव यांनी लिहिलेला हा लेख


माझ्या आयुष्याचा लेखाजोखा काय मांडायचा? पेण सारख्या गावात जन्मलो, संगीताचं बाळकडू मिळालेला नानू वडिलांच्या सतार, तबला, पखवाज, बाजाची पेटी, — पेटी, बॅटरीवर चालणारा कर्ण्याचा रेडिओ कुत्र्याचं चित्र असलेली ग्रामोफोन शिवाय किल्ली दिली की आपोआप बराच वेळ वाजणारी, तंतुवाद्यासारख्या किणकिणणाऱ्या आवाजाची पितळेच्या सिलेंडरवर लोखंडी काटे रूतवलेली संगीत पेटी, शिवाय व्हायोलिन आणि जलतरंगाचे पेले या संगीत संपत्तीचं लांबून निरीक्षण करायचो. कारण या वाद्यांवर वडिलांचा एकछत्री अंमल होता. वडिलांकडून बरचसं संगीत मी शिकलो. रेकॉर्डस् ऐकून मला रागसंगीतातल्या बऱ्याचशा चिजा पाठ झाल्या होत्या. लहानपणी त्यामुळे माझं खूप कौतुक झाले. अनेक गायक, वादक ऐकले, अभ्यासले आणि माझी संगिताची वाट मी तयार केली. मला वडील म्हणायचे ‘सूर शिकता येईल पण ताल किंवा लय ही अंगची असावी लागते. सूर कणसूर लागला किंवा बेसूर झाला तर प्रयत्नानं तो ठिकाणावर कसा आणावयाचा ते सांगता येईल… शिकवता येईल, पण तालाच्या दोन ठोक्यातलं नादविरहित अंतर योग्य आणि कायम राखणं याला एक निराळीच जाण असायला हवी. मुळात ती नसेल तर जंग जंग पछाडलं तरी अंगी बाणवता येणार नाही.’ वडिलांनी मला मुद्दाम एका जागी बसवून गायनाची दीक्षा कधीच दिली नाही. ते सतारीवर स्वतः एखादा राग वाजवीत किंवा हार्मोनियमवर एखादं नाट्यगीत वाजवीत आणि त्याच्या साहाय्याने रागांची ओळख करून देत.

नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचे माझ्यावर संस्कार झालेलं जरी असले तरी थोडा मोठा झाल्यावर जी. एन. जोशी, जे. एल. रानडे आणि त्यानंतर गजानन वाटवे इत्यादी मंडळींची सोपी, हलकीफुलकी पण लोकप्रिय ठरलेली गोड गाणी मला आवडू लागली. परंतु वडिलांना हे संगीत आवडत नसे. ते म्हणत, ‘हे हलके संगीत आहे. शास्त्रीय रागसंगीत हेच खरं संगीत. हलक्या फुलक्या गाण्यांचं वेड फारसं लावून घेऊ नकोस. तरीदेखील ते त्या गाण्यांच्या रेकॉर्डस् मला आणून देत. तळेगावच्या समर्थ विद्यालयात पुण्याच्या गंधर्व विद्यालयातून एक शिक्षक यायचे. ते काही प्राथमिक राग आणि छोट्या ख्यालातल्या चिजा शिकवित. वर्षभरात त्यामुळे मला यमन, बिलावल, सारंग, भीमपलास, खमाज, तिलंग इत्यादी रागांची ओळख बऱ्यापैकी झाली.

संगिताची मला जीवघेणी ओढ लागली होती किंवा संगिताशिवाय मला एक क्षणसुद्धा चैन पडत नसे असं काही म्हटलं तर तो, भोंदूपणा होईल! ‘संगीत हा माझा जीव की प्राण होता’ वगैरे भाषा माझ्याबाबतीत खाटी होती. तसे काहीच नव्हतं. मात्र नवे नवे संस्कार नकळत घडत होते हे नक्की!

माझे वडील मला सकाळी ५ वाजता उठवत. ते म्हणायचे, ‘दिवसभर तू काहीही कर पण ही पहाटेची वेळ तुझी – ती फक्त तुझ्यासाठी ठेव. त्या वेळीच काही चांगलं पदरात पाडून घे!’ मला पुढे आपोआप ४।।-५ वाजता जाग येऊ लागली. मला लागलेली ही सवय म्हणजे एक मोलाचं वरदानच! पुढील आयुष्यात मी केलेल्या हजारो गीतांची स्वरनिर्मिती या रामप्रहारीच झालेली आहे.

‘नवीन चाल सुचेल का?’ हा प्रश्न सतत मला भेडसावत असे. त्यामुळे प्रत्येक वेळी नवे सूर सुचताना डोकं अक्षरश: चक्रावून जात असे. पण म्हणतात ना – सर्व दिशा संपल्या म्हणजे, आणि म्हणजेच अकरावी दिशा उघडते. तसंच काहीसं झालं. अचानक प्रकाशाचा विस्फोट झाला. गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दातच ते दडलेले असतात. तिथेच ते शोधायचे हे सत्य विजेसारखं समोर चमकलं. पण ‘तुझे आहे तुजपाशी’ असं असताना उगीचच भटकंती कशाला करायची? पण ‘तुझे तुजपाशीच आहे’ हे कळायला तर हवं! पण ते मला कळल्यानंतर मात्र भटकंती थांबली ती कायमची! मन आणि डोकं यांच्यातली खळबळ एकदम संपुष्टात आली आणि त्यावेळी हेही कळलं की आपण आजवर डोक्याला निष्कारण किती शीण दिला. स्वत:च्याच नाभीस्थानी असलेली कस्तुरी जगभर धुंडाळणाऱ्या वेड्या हरिणासारखी आपली सर्वांचीच अवस्था असते. ज्याला हे सत्य कळतं आणि अनुभवाला येतं तोच भाग्यवान, भगवान! त्यालाच ऐश्वर्य, ईश्वरता मिळते आणि तोच मुक्त होतो. माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर मला जणू एक परीसचं लाभल्यासारखं झालं. गाणं चांगलं लिहिलेलं असेल, तर मग चाल लावायला अजिबात कष्ट पडत नाहीत हे मला पदोपदी कळून येऊ लागल्यामुळं गाणंच मुळात अर्थपूर्ण असावं असा आग्रह मी नकळत धरू लागलो. गीताचे चांगले शब्द हीच स्वरनिर्मितीच्या मागणी माझी शक्ती होती. चाल लावण्यासाठी मी मुद्दाम चांगली गाणी निवडू लागलो. आकाशवाणीच्या माझ्या नोकरीमुळे सुप्रसिद्ध मंगेश पाडगावकर यांची माझी ओळख झाली. पाडगांवकरांच्या अनेक गीतांना स्वरबद्ध करण्याची मला संधी मिळाली. माझ्या सुरांना त्यांच्या शब्दांनी ताकद दिली. ती गीतं लोकप्रिय होण्यात कवी म्हणून पाडगांवकरांचा वाटा सिंहाचा आहे, यात मुळीच संशय नाही. त्याचप्रमाणे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके किंवा अरूण दाते अशा ज्या गायकांनी आपल्या समर्थ गायन शैलीने ती गीतं श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यांचंही ऋण कधीही न फिटण्याइतकं मोठं आहे.

प्रत्येक संगीतकार जेव्हा एखादी चाल… सुरावट… शब्दांशिवाय तयार करतो तेव्हा त्या चालीत त्याची एक खास जागा असते. ती जागा अशी की तिथे त्या चालीचा प्राणच एकवटलेला असतो. गीतकाराने त्या चालीवर गीत बांधतांना ती विशिष्ट जागा योग्य त्या भावपूर्ण शब्दांनी सजवून अधिक प्रभावशाली करण्यासाठी झटायला हवं.

कधी कधी असं होतं की, संगीतकाराची चाल कवींच्या पारंपारिक वृत्त छंदाप्रमाणे नसते.
त्यातील मात्रांचे तुकडे कधी सम, कधी विषम असेही असतात. त्यामुळे गाणं लिहायला घेतल्यावर चालीतले सगळेच कोपरे, सगळेच सुटे भाग किंवा वळणं यांना कवेत घेतील असे योग्य लांबीचे आणि शिवाय भावदर्शी असे शब्द मिळतातच असं नाही. त्यावेळी संगीतकार व गीतकार यांनी एकत्र बसून एक मध्यम मार्ग स्विकारावा लागतो. (कधी चालीला थोडी मुरडही घालावी लागते – जी गीतकार सुचवतो) अशावेळी दोघांपैकी कुणीही जास्त हट्ट धरून चालत नाही.

लोकांच्या आवडीनुसारच गायला हवं या समजुतीने काही नवीन करण्याची हिंमतच न करणं हे सतत घडतांना दिसतं. यामुळे भावसंगीत समृद्ध होणार नाही. ते गुदमरेल -शिळं होईल. गाणाऱ्याने आपला प्राण… म्हणजेच आपला श्वास…. म्हणजेच आपला सूर शब्दात फुंकायला हवा तरच शब्दप्रधानता जपता येईल आणि ती सार्थपणे आणि समर्थपणे गायली जाईल. नवीनप्रमाणे, निर्भयपणे आणि निःसंकोचपणाने शब्दांशी भिडा. तुमचं गाणं तुम्हालाच ताजं करील, ऊर्जा येईल.

वेगवेगळ्या कवींच्या रचनांना संगीत देतांना येणारा अनुभव खूप काही शिकवून जात होता. नवीन प्रसंग, नवीन आव्हानं यांतूनच अनुभव घेऊन मनुष्य शिकत असतो, शहाणा होत असतो. पहिल्या प्रसंगात नेहमी यश हाती लागेलच असं नाही. परंतु त्यामुळे घाबरायचं काय कारण? उलट कुणीसं म्हटलेलंच आहे,

“We learn more from our failures than from our successes!”

कुसुमाग्रज, कवि अनिल, इंदिरा संत, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगांवकर, शंकर वैद्य, बहिणाबाई, सुरेश भट, ना. घ. देशपांडे, विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर, रत्नाकर मतकरी, शांताराम नांदगावकर, वसंत बापट, शांता शेळके, ग्रेस इत्यादी कवींच्या रचना आणि अरुण दाते, श्रीधर फडके, उषा मंगेशकर, लता मंगेशकर, सुधीर फडके, पुष्पा पागधरे, प्रशांत दामले, उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, कृष्णा कल्ले, मधुबाला चावला, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रंजना जोगळेकर इत्यादी गायकांकडून गायलेली गाणी स्वरबद्ध केलीत.

माझ्या वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत माझ्या वडिलांनी मला संगीताचे प्राथमिक धडे दिले खरे पण त्यानंतर मात्र संगीतामधल्या अनेक गोष्टी, मी बारकाईने केलेल्या अवलोकनातूनच शिकून घेतल्या. माझा संसारच मुळी संगीत कलेवर आणि त्यातून मी केलेल्या द्रव्यार्जनावर अवलंबून असल्यामुळे संगीत हा माझा जणू प्राणच झाल्यासारखा आहे!

हा सर्व स्वरांचा पसारा मांडतांना आपली चाल लोकप्रिय व्हायला हवी असा विचार माझ्या मनात आलेला असतोच. संगीत दिग्दर्शन हा माझाही व्यवसाय आहे. परंतु त्यातही मी शब्दार्थाने सुचविलेली चाल तयार करणं यालाच प्राधान्य देतो.

गीतांना चाली देण्याच्या उद्योगाबरोबरच मी स्वतः गाणी लिहू लागलो. अनेक नवनवीन गीतकारांची गाणी रेडिओवरच्या माझ्या नोकरीमुळे मला वाचायला मिळाली ती मी अभ्यासपूर्वक वाचली आणि बरंच काही शिकलो. शब्दरजनेतला भोंगळपणा, मात्रांचे चुकलेले हिशेब, आशयाशी एकरूप नसलेलं गीतकाराचं भान इ. गोष्टींची माझी समजूत पक्की झाली. त्यामुळे माझी शब्दरचना बऱ्यापैकी अर्थवाही होत गेली. गीतं लिहिण्याचं बरंच काम माझ्या हातून झालं आहे, दीडशे दोनशे चांगल्या रचना मी स्वतंत्रपणे केलेल्या आहेत.

श्री. मोहन राकेश यांचं एक हिंदी नाटक महाकवी कालिदासाच्या जीवनावरचं फार प्रसिद्ध आहे. त्याचं नाव ‘आषाढका एक दिन’ त्याचं मराठी भाषांतर ‘आषाढातील एक दिवस’ विश्वनाथ राजपाठक यांनी फार सुरेख केलं आहे. मूळ नाटकात संगीत नव्हतं. ते नाटक, संगीतप्रधान करण्यासाठी त्यात जवळजवळ आठ-दहा पदं लिहावी लागली. त्याचं संगीतही मीच दिलं.

विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या ‘बावनखणी’ नाटकासाठी संगीत द्यायला भालचंद्र पेंढारकर यांनी मला सांगितले. बालपणी त्यांचे वडील कै. बापूराव पेंढारकर यांना माझ्या घरी पेणला बघितलं होतं. त्यांच्या ललितकलादर्श या नाट्यसंस्थेसाठी मला संगीत देण्याचा योग आला हा अपूर्व योगच नाही का?

नागपूरच्या वास्तव्याला मला भाव संगीताच्या मैफली करण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली. मी केवळ भावसंगीत तीन-चार तास सादर करू लागला. भावसंगीताच्या मैफलीत मी जी गाणी गात आहे, ती सर्व केवळ माझ्याच चालीची असत. कधी मात्र अनेक असत. मी स्वत: लिहिलेली गाणीही त्यात असत. गायनाची मैफल यशस्वी होण्यासाठी श्रोते आणि गायक हे एकमेकांना अनुरूप हवेत. गायक जे गातो ते श्रोत्यांच्या आवडीचं असायला हवं आणि समोरच्या श्रोत्यांना जे आवडतं ते गायकाच्या पोतडीत असायला हवं.

‘कधी बहर कधी शिशिर’, ‘अंखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘या जन्मावर या जगण्यावर’, ‘तिन्ही लोक आनंदाने’ अशा पाडगावकरांच्या अनेक भावपूर्ण गीतांना चाली लावण्याचं काम करताना आनंद आणि उत्साह याचं भरपूर दान माझ्या पदरात पडलं आहे. अनेक मातब्बर कवी मंडळींनी मला त्यांच्या कवितांतून अपार आनंद तर दिलाच शिवाय कवितेच्या प्रांतात अधिकाधिक खोल शिरण्याची प्रेरणाही दिली. त्यातूनच सोपेपणा आणि रुपकपणा यातला भेद मला समजला. सहजसुंदरता असलेलं गीत आणि उलट नटवलेलं-नखरेल असं गीत, या दोहोतले असली-नकलीपण मला कळूलागलं. ज्यातील अर्थ, भाव हे पलीकडील पातळीपलीकडे जातच नाहीत असं गीत एका बाजूला आणि शब्दार्थापलीकडील भावनिकतेच्या दिशेकडे संकेत करणारे असे सूचक शब्द असलेलं गीत दुसऱ्या बाजूला. ह्या दोन्ही प्रकारच्या गीतांनी मनावर होणारा संस्कार तपासण्याची आणि अभ्यास करण्याची एक संवयच मला तेव्हापासून लागून गेली म्हटलं तरी चालेल!

३१ मे २००३ रोजी माझे गुरू संगीतकार अनिल विश्वास हे जग सोडून गेले. त्यांना श्रद्धांजली वाहावी म्हणून त्यांच्याच लोकप्रिय हिंदी गीतांच्याचालीवर मी स्वतंत्र मराठी गाणी लिहायला घेतली. अशा १५ गीतांचा मी एक कार्यक्रम तयार केला. माझ्या दृष्टीने हे एक चांगले काम होते. दिवंगत संगीतकारासाठी औपचारिक पद्धतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यापेक्षा त्या निमित्ताने ही एक नवनिर्मिती झाली याचा मला अतिशय आनंद आहे.

आयुष्यभर संगीताचा शिडकावा केला मराठी रसिकांवर. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं; दाद दिली, उत्साह दिला. आणि माझं गाणं फुलत गेलं. गाणी गाता गाता मी गाणी लिहू लागलो. माझ्या जीवनात आलेल्या काही व्यक्तींवर छान कविता लिहिल्या. ‘कृतज्ञतेच्या सरी’ म्हणून तो काव्यसंग्रह प्रकाशित झाला. नव्हे एक वर्षात त्याची दुसरी आवृत्तीदेखील निघाली. म्हणजे माझ्या गाण्यांना मिळालेली ती रसिकांची दादच! त्यानंतर माझे गुरू अनिल विश्वास यांच्या गाजलेल्या गाण्यांच्या चालीवर मराठीत रचलेली गाणी ‘अक्षरफुले’ हा कार्यक्रम बसविला, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सुरुवातीपासून ते ए. आर. रेहमानपर्यंतच्या हिंदी संगीत दिग्दर्शकांच्या गाजलेल्या गाण्यांच्या चालीवर स्वतंत्रपणे मराठी गीतं रचली. त्याचे ‘अक्षरफुले’ पुस्तक प्रकाशित झाले. त्याला देखील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

संगीतानं मला रसिक श्रोते दिले, तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनी माझे आयुष्य आनंदमयी बनविले.

माझ्या आजारपणात मी घाबरलो होते. पण तरीही मी ते सारं ‘लाइटली’ घेतलं हेही खरं, हे जमलं ते ओशोंच्या शिकवणीमुळे. ओशोंनी सांगितलं होतं, सर्वचं गोष्टी मनासारख्या होतात असं नाही तेव्हा…. या आजारपणात सुरुवातीपासून डोळे मिटले रे मिटले की मला ओशो दिसत असत. त्यांचे जे पहिले पुस्तक वाचले होते त्या पुस्तकाच्या कव्हरवर त्यांचा तो टोपी घातलेला हिरव्या कलरचा फोटो आहे तो त्यांचा हसरा चेहरा समोर येई. मी त्यांना म्हणे – “तुम्ही मला असे का सतत दिसता? मी तर तुम्हांला बोलावलं नाही. तुम्हीच सांगितलं आहे – मी तुला सांत्वन देऊ शकत नाही. फार तर सत्य देऊ शकेन.” यावर कुणाचा विश्वास बसेल?

माझ्या गुरूनं माझं रक्षण करावं ही मागणीच चुकीची आहे. माझ्या गुरूनंही मला ‘काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी’ असं दूरान्वयानंही कधी सुचवलेलं नाही. त्यांनी एकच केलं; माझा आत्मविश्वास जागृत केला आणि उत्तरोत्तर तो वाढतच जातो आहे.

१९७० पासून मी ओशोंच्या संबंधात आहे. साधारण १९७० ते १९८० या कालावधीत. काही लेक्चर्सही ऐकली, ५०-१०० पुस्तकंही वाचली. त्यापूर्वी कृष्णमूर्तींचीही पुस्तकं वाचली होती अस्वस्थतेवर उपाय काय? १९८० साली ओशो अमेरिकेत गेले. त्यावेळी काही वर्तमानपत्रांमध्ये ‘ओशो यांचे पलायन’ अशा बातम्या आल्या होत्या. पण मला वाटते हे पळणारे नाहीत. त्यांना पत्र लिहिले. त्यांचे दोन ओळीत पत्राला उत्तर आले. ‘तुम पुना आश्रममे जाके ध्यान करना सिर्फ किताबे पढके कुछ नही होगा।’ त्याप्रमाणे मी पुण्यात गेलो. तेथे जाऊन ध्यान केले. ध्यान करायची सवय लागली. ऑपरेशच्या काळात मी घाबरलो होतो. त्यांनी पुष्कळ वेळा सांगितले तुम्ही दुखण्याच्या जवळ जा. ते टाळू नका. आणि मला त्याचे प्रत्यंतर आले. ऑपरेशनच्या काळात नंतर मी त्याचा अनुभव घेतला, हा योगाचा प्रकार आहे तो मी नेहमी करतो.

संगीत क्षेत्रातले काही अनुभव सांगतो. पहिला सुधीर फडके यांचा, ते आमच्या रामदास भुवनमध्ये आमच्या समोर राहात होते. १९५० च्या सुमारास. माझ्या लग्नानंतरचा काळ. त्यांना मी गुरु मानतो. मी गात असताना आमच्या घराच्या खिडक्या उघड्या टाकायचो. गाताना ते ऐकतील म्हणून मी कॉन्शस असायचो. पण नंतर तो कॉन्शसनेस गेला. ते रोज सकाळी प्रॅक्टीस (रियाझ) करीत. गाण्याचा नाही तर ओरडण्याचा. आक्राळविक्राळ ओरडण्याचा. या अशा ओरडण्यामुळे तुमचा आवाज सॉफ्ट होतो. आवाजाचे इव्हॅल्यूएशन होते. हा रियाज करायचा आरडाओरड करण्याचा. पण त्यातून मोकळा आवाज होतो. हे मी त्यांच्याकडून शिकलो.

१९५२-५३ मध्ये मी आकाशवाणीमध्ये नोकरीस लागलो. पेणच्या प्रॉपर्टीतून उत्पन्न काहीच नव्हते पण कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी नोकरी करणे आवश्यक होते. मी बी.एस.सी. झालो होतो. त्याच काळात मी चाली लावायला सुरुवात केली. त्याचवेळी मला एक पहिले पिक्चर मिळाले. पु.ल. तेव्हा आकाशवाणीत होते. त्यांनी प्रोड्युसरला सांगितले यशवंत देवांकडूनच गीते लिहून घे. हे आव्हान मी स्वीकारलं. दुसरं पिक्चर मिळालं माडगूळकरांचे. ‘उतावळा नारद’ हे. त्यातलं एक गाणं आठवतंय. माडगूळकरांनी लिहिलेलं व सुधीर फडके गायक. पुण्याचा नवयुग स्टुडिओ. समोर मोठा माईक. म्युझिकमध्ये कपडे आपटण्याचा आवाज घेणं आवश्यक होतं. फडके म्हणाले की, कपडे घेऊन या. मी गाणं म्हणताना कपडे धुतो. त्याप्रमाणे केले. तो आपटण्याचा आवाज कपडे धुतांनाच आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक चांगले संगीतकार उदा. सुधीर फडके, राम कदम, वसंत प्रभू, हृदयनाथ मंगेशकर हे आहेत. संगीताचा स्तर उंचावलेला आहे त्यात मी भर घातली असे नाही. पण ७-८ पिक्चर्स मी केले. शेवटचे पिक्चर ‘कशाला उद्याची बात’. १९८५ मधला. त्यावेळी मी आकाशवाणीतच होतो. १९६० नंतर माझ्याकडे संगीतासाठी पिक्चर्स आली नाहीत. मीही माझ्या स्वभावाप्रमाणे कोणाकडे गेलो नाही. १९८४ मध्ये वसंत भालकर आले. ते म्हणाले, ‘तुम्ही संगीत द्या.’ २५ वर्षानंतर मला डिमांड आहे हे पाहून धक्काच बसला. गीतरचनाही मीच करावी अशी त्यांची इच्छा होती. गाण्याच्या चाली बांधल्या. पण प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी चित्रीकरण करताना काही ओळी प्रसंगानुरूप मागेपुढे करण्यासाठी रेकॉर्डिंग नंतर करावे असे त्यांचे मत होते.त्याप्रमाणे केले. अजून तो पिक्चर आलेला नाही. त्याचं नाव, ‘लेक लाडकी’, त्यातील गाणी चांगली झाली आहेत. रवींद्र साठे, स्वनील बांदोडकर, देवकी पंडीत, साधना सरगम यांनी ती गायली आहेत. त्यानंतर एक पिक्चर मला मिळाले. ‘जोशी विरुद्ध कांबळे’. ते पिक्चर येऊन गेले. त्यातील एक गाणं आहे उपेंद्र भटनी गायलेलं. नवीन पिक्चर ‘निर्माल्य’ हे मी करीत आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबरीवरचं. त्यातील एक गाणं स्वप्नील बांदोडकर व साधना सरगम यांनी गायलेलं आहे.

मला ७५ वे वर्ष लागणार म्हणून दिल्लीहून माझे गुरु संगीतकार अनिल विश्वास यांना नाट्यदर्पणचे सुधीर दामले यांनी खास आग्रह करून बोलावलं होतं. त्यांच्या हस्तेच माझा सत्कार झाला. शशी मेहता हा आमचा जवळचा मित्र. वाढदिवसाच्या आधी महिनाभर दररोज तो मुंबईला माझ्या घरी यायचा. काही ना काही कामाच्या निमित्ताने तो सहज बोलला, ‘देव, मी २२ नोव्हेंबरला तुमच्या पंच्याहत्तरीच्या सत्काराला पुण्याला येणार आहे. मी नक्की येणार. माझ्याबरोबर मुंबईची आपली सगळी मित्रांची टीम घेऊन येणार आहे. आमचा मुक्काम पुण्याच्या श्रेयस हॉटेलमध्ये होता. शशी हॉटेलवर आला. त्याने तक्रार केली – ‘देव, तुमच्या सत्काराच्या कार्यक्रमाची सगळी तिकीटे संपली आहेत. मला आणखी आठ तिकिटं हवी आहेत. आपल्या सगळ्या मुंबईकर मित्रांची बसण्याची सोय नको का व्हायला? मी पाहिजे तर विंगेत उभा राहीन.’ मी शशीला म्हटलं, ‘शशी, तू मला प्रेक्षागारात दिसायला हवास. तू आलास हे दिसल्याशिवाय मी कार्यक्रम सुरू होऊ देणार नाही.’ नंतर शशी गेला…. गेला तो गेलाच. पुढच्या तासाभरातच त्याला हार्ट अॅटॅक येऊन त्याची प्राणज्योत मालवली. माझ्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम झाला खरा पण निराशेचा, दुःखाचा एक काळा ढग त्या कार्यक्रमाभोवती वेढा घालून मला अस्वस्थ करीत होता, माझे डोळे ओले करीत होता आणि माझा आवाज जड करीत होता.

प्रोस्टेटनंतर मोठे दुखणे झाले नाही. २००४ मध्ये मी कार्यक्रमांसाठी अमेरिका दौरा केला. सौ. भिडे यांनी तो आयोजित केला होता. अमेरिकेत या दौऱ्यात मी १३ कार्यक्रम केले. त्यावेळी तेथे डॉ. नरेंद्र जाधव होते.

अध्यात्म ही वाचायची गोष्ट नाही. अनुभवायची गोष्ट आहे. देव चराचरात आहे असे म्हणतात पण तो चराचरात आहे असे मानीत मात्र नाहीत. याचा काय उपयोग आहे. त्यातून रुबाया सुचल्या. माझ्या अनुभवातून सुचलेल्या. त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. जग ही एक रंगभूमी आहे व आपण त्यावरील एक नट आहोत. आपण त्याचा एक पार्ट आहोत. दृष्टी उघडली तर सर्व वस्तू दिसतात. देव चराचरात आहे. आपण सर्व वस्तू बघतो पण त्यात देव दिसत नाही. पण देव नाही का? पण तो चराचरात आहे. त्याचं नसणंही असणं आहे. तो निराकार आहे.निराकार असल्याशिवाय आकार नाही. माणसांचे नाक, कान डोळे वगैरे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. तो ते तयार करतो. मुळात त्याचे नसणे हे त्याचे अस्तित्व आहे. म्हणून स्थितप्रज्ञ म्हणतात. माणसाला चिकटणे, न चिकटणे हे महत्त्वाचे. गाण्यात आशय आणायचा असेल तर ते गाणं आतमध्ये झिरपले पाहिजे. मी नवीन लोकांना नेहमी सांगतो, तुम्हाला टाळ्या मिळाल्या तर बरे वाटते. पण प्रत्येक क्षणाला टाळ्या मिळायला पाहिजेत. हे गायन कलेचं अध्यात्म. ही वाट वेगळी आहे.
ही वाट वेगळी प्रवासही वेगळा
आरंभाआधी वाटसरू थांबला
मग त्याला दिसले चहूकडे देऊळ
गाभारा त्याचा कळसाला लागला

अगदी अलिकडे ऑक्टोबर २००९. स्वामी मंगेश दाब यांचे फाऊंडेशन. योगक्रियेसंबंधीचे, सामाजिक स्तराशी संबंधित आहे. ग्लोबल वॉर्मिंगबाबत कामे करायचे. माणसाने स्वतः सुधारले पाहिजे. समाज नावाची वस्तूच नाही. बोट दाखविले तर व्यक्ती दिसते, समाज दिसत नाही. तो स्वतः सुधारतो तेव्हा समाज सुधारतो. अनेक समाजसुधारक येऊन गेले पण काय झाले? या फाऊंडेशनमार्फत हेच कार्य केले जाते. या फाऊंडेशनतर्फे मला पत्र आले की, त्यांच्यातर्फे ग्लोबल पुरस्कार मला देणार आहेत. त्यांना माझ्याकडून होकार हवा होता. हा पुरस्कार यापूर्वी डॉ. फडके, माशेलकर वगैरेंना देण्यात आला होता. त्यांना मी कळविले, जगाने ओशोंना नालायक म्हणून संबोधिलेले. त्यांचा मी शिष्य आहे. तुम्हाला चालेल का? त्यांनी मला कळविले की, काही हरकत नाही. आम्हाला काही अडचण नाही. मग बांद्रा येथील रंगशारदेमध्ये २४ ऑक्टोबर २००९ ला मला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात डॉ. फडके, रघुनाथ माशेलकर, डॉ. श्रीखंडे हे उपस्थित होते.

पुरस्कार मिळाले तरी मी कोण आहे हे मी जाणतो. अगदी अंतरीची खूण आहे ती मलाच माहिती आहे. पण कधीतरी वाटते की, एवढे मिळवले हे खरे पण मी कसा आहे?

अध्यात्म. ही वाट वेगळी आहे.
ही वाट वेगळी प्रवासही वेगळा
आरंभाआधी वाटसरू थांबला
मग त्याला दिसले चहूकडे देऊळ
गाभारा त्याचा कळसाला लागला

या पुढचं माझं चरित्र शब्द आणि स्वरांच्या सहाय्यानेच पुढे पुढे जाणार आहे! मात्र माझी पुढची यात्रा ‘जानसे ध्यानतक’ अशी होवो अशी माझी मनापासून इच्छा आहे.

आता जाणवतं आयुष्याची ही संध्याकाळ सुरू झाली आहे. पहिली पत्नी गेली त्यानंतर करूणा जीवनाची जोडीदार म्हणून आयुष्यात आली. ती देखील मला सोडून गेली. जगलेल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी साथ देणारी माणसं ज्यावेळी दिसेनाशी होतात त्यावेळी मन गलबलून जातं. आणि मला ‘देवा’ म्हणून हाक मारणाऱ्या अनेकांचा उत्साह मला दिलासा देणारा वाटू लागतो. संगीताची सेवा करतांना मरगळ येऊ नये व आणखी मराठी रसिकांचे कान तृप्त करण्यासाठी मला ताकद यावी हीच परमेश्वराजवळ इच्छा. आयुष्यात ज्या गोष्टी हातातून निसटल्यात त्यांचा आता लेखाजोखा मांडण्यात अर्थ उरला नाही.

-पं. यशवंत देव
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..