नवीन लेखन...

जातिभेदाला पहिली थप्पड

लेखक – प्रबोधनकार ठाकरे

(जुन्या आठवणी)

तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय?

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. गिरगांवात एक-दोन बामणांची छुपी हॉटेले गल्लीकुच्चीत असायची. तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामण चहाची तलफ चोरून भागवीत असत. कारण, त्याकाळी हॉटेलात उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे. चार-पाच मंडळींनी कुडाच्या पडद्याआड गुपचुप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे. दारूच्या गुत्त्यांत शिरणारांकडे लोक जितक्या कुत्सित काण्या नजरेने पाहत नि धिक्कार दर्शवीत, त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पाहत असत. मात्र या बामणी छुप्या हॉटेलात बामणांचाच प्रवेश व्हायचा. इतरांना तेथे मज्जाव असायचा.

पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेरघर. बाहेरगांवाहून नोकऱ्यांनिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या. बिन-हाडाची (म्हणजे चंबूगबाळे ठेवण्याची सोय एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या ओसरीवर झाली, तरी मम्मंची ब्याद तो किती दिवस भागवणार? अर्थात, सार्वजनिक खाणावळीची आवश्यकता पुढे आली. या दिशेने पहिला धाडसी यत्न भटवाडीतल्या सखूबाईने केला. विधवा बाईने असा एखादा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे, ही कल्पनाच त्या काळी मोठी बंडखोर. शहाण्यासुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या! पण सखुबाईने सर्व सामाजिक विकल्पांना झुगारून खाणावळीचा धंदा सुरू केला. मुंबईच्या हिंदू खाणावळीच्या इतिहासात या सखूबाईचे नाव अग्रगण्य आहे.

सखूबाईने खाणावळ उघडताच, पहिला मोठा पेचप्रसंगाचा प्रश्न आला, तो म्हणजे आमच्या नाठाळ जातीभेदाचा. खाणावळीत बामण येणार तसे इतर अठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंगती मांडायच्या तर मलबार हिलचे अंगणसुद्धा पुरायचे नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत. या पेचावर सखुबाईने दणदणीत तोड काढली. तिने प्रत्येक अन्नार्थी बुभुक्षिताला स्पष्ट बजावले- “माझी खाणावळ अन्नार्थ्यांसाठी आहे. मी बामण ओळखीत नाही नि जातपात मानीत नाही. प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला सारखे वाढणार… अगदी पाटाला पाट नि ताटाला ताट भिडवून वाढणार. जरूर असेल तर त्यांनी यावे, नसेल त्याने खुशाल भुके मरावे. मला त्याची पर्वा नाही. कोणी कुरबुर दुरदुर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन.”

झाले. कर्दनकाळ सखूबाईचा हा दण्डक जाहीर होताच, यच्चावत बामणे नि बामणेतर खाणावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेऊ लागले. सकाळ संध्याकाळ हजार-पाचशे पाने उठू लागली. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही कर्मठ ब्राम्हण, सखुबाईच्या खास मेहरबानीने मुकटे नेसून एका लहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्याने जेवत असत. त्या खोलीला सखूबाई ‘विटाळशीची खोली’ असे म्हणत. मोठ्या पंगतीत वाढणी चालत असली म्हणजे साहजिकच या सोवळ्या बामणांकडे वाढप्यांचे दुर्लक्ष व्हायचे. “अहो, आमटी आणा, चपाती आणा, हे आणा, ते आणा.” असा ते ओरडा करायचे. बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची, “अरे बंड्या, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा. ” त्या सोवळ्या जेवणारांनी तक्रार केली, तर बाई स्पष्ट सांगायची, “हे पहा, मोठ्या पंगतीचे काम टाकून तुमच्याकडे ‘पेशल’ पाहणार कोण? तुम्हाला सगळे ‘पेशल’ पाहिजे तर ते मला जमणार नाही. वाढप्याच्या सोयीसोयीनेच घेतले पाहिजे तुम्हाला. चांगले मोठ्या जमातीत बसून गुण्यागोविंदाने खावे, गप्पागोष्टी सांगाव्या, ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलकटांत सुतक्यासारखे ?”

सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगांवात आणखी तीन-चार ब्राह्मण विधवांनी खाणावळीचा उपक्रम केला आणि तो अगदी सखूबाईच्या शिस्तीने चालवला. झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगभाटातली चंद्रभागाबाई यांच्या खाणावळी सारख्या जोरात चालत असत. दरमहा रुपये सात आणि साडेसात, असे दोनच भाव असत. सातवाल्यांना ताक आणि साडेसातवाल्याना दूध-दही एवढाच फरक. बाकी सगळी व्यवस्था सारखी. त्यात प्रपंच नाही. रविवारी काहीतरी “पेशल’ बेत असायचा आणि तो मंडळीना विचारून ठरायचा. सणावारी मिष्टान्न भोजनाच्यावेळी कोणी कमी जेवले तर बाई उस्तळायची, “कायरे, आधी कुठे हाटेलात शेण खाऊन आला होतास वाटतं?” असा भरमंडळीत टोमणा द्यायची. प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुण फुकट. मग ते ‘पेशल’ बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही. एखादा इसम दोन-तीन वेळा आला नाही, तर सखूबाई लगेच त्याच्या बिऱ्हाडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबुदाण्याची पेज बिनचूक घरपोच पाठवावयाची. हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळीतही पाळत असत.

सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत. देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती, का सगळ्या पंगतीची भरमसाट करमणूक! तिचा तोंडपट्टा चालला असता मध्येच कोणी काही बोलला तर एक पेटंट वाक्य असायचे, “चूप, मध्येच मला ‘ॲटरप्रॅट’ करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंद्रावर्खर ! माझ्या खाणावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जड्ज झाले, समजलास.” एखादाचे दोन महिन्यांचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खाणावळीत येण्याचे टाळू लागला, तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची. मग सगळ्या पंगतीत त्याची कानउघाडणी करायची, “अरे मुंबईची नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी. आज गेली तर उद्या मिळेल दुसरी. पण मेल्या, उपाशी राहून तू काय करणार? उपाशी पोटाने नोकऱ्या मिळत नाहीत. तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे. पण जेवायला टाळाटाळ करशील तर ओतीन भाताचे आधाण तुझ्या बोडक्यावर.” पंगती चालल्या असताना, कमरेवर हात देऊन बाई पंगतीतून शतपावल्या घालायची. प्रत्येकावर काही ना काही टीका, टिप्पणी, टिंगल सारखी चालायची. सणावारी तर पोटभर जेवण्यावर तिचा फार मोठा कटाक्ष. मधून मधून एका रांगेने चार-पाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोवळ्यावर सखूबाईंचे टिंगलपुराण असे काही बेफाम चालायचे का पुढच्या खेपेला ते सारे बामण पंगत मोडून सरमिसळ बसायचे.

तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाज-सुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखूबाईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्त्व हिंदूंच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.

प्रबोधनकार ठाकरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..