सामाजिक अभिसरणाचं उत्तम माध्यम असलेली ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव आहे. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण दरवर्षी ठरल्या वेळी धार्मिक स्थळांना भेट देण्याची अशी परंपरा जगात ७-८ हजार वर्षांपासून सुरू आहे…
श्री निरंजन घाटे यांचा ‘मटा’ मधील हा लेख…
आषाढ मासी प्रतिवर्षी येती, महाराष्ट्रात दूरदूरून वारकऱ्यांच्या पंक्ती।’ असं आपण म्हणू शकतो. माझं बालपण कुमठेकर रस्त्यावर गेलं. त्यामुळं गेली ६५ वर्षे तरी मी वारी, वारकरी आणि वारीमध्ये होणारे बदल अनुभवतोय. ‘वारी’ ह्या विषयावरचं लिखाणही वाचतो. मला वाटतं गी द मोपासा ह्या लेखकाच्या लघुकथा संग्रहात सत्तरच्या सुमारास मी एक कथा वाचली, नक्की आठवत नाही. युरोपातला एक भक्तजनांचा जथा स्पेनमधील लुर्देसच्या. वारीला – पिलग्रिमेजला निघालेला असतो. एक शेतकरी त्याच्या शेतीत काम करीत असतो. त्याला हे वारकरी आमच्याबरोबर यात्रेला का येत नाहीस, असं विचारतात. तो म्हणतो, ‘शेती हेच माझं तीर्थस्थान आहे.’ पुढं हा जथा लुर्देसला ‘मेरी’च्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना, त्यांना तो शेतकरी चर्चमध्ये सर्वात पुढे दिसतो, अशी काहीशी ती कथा होती. तेव्हा माझ्या मनात परदेशातल्या वाऱ्यांबद्दलचं कुतूहल जागृत झालं आणि मी विविध देशांतील अशा तीर्थस्थानांबद्दल माहिती गोळा करू लागलो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एखाद्या तीर्थस्थानाकडं मोठ्या संख्येनं एखाद्या विशिष्ट दिवशी जाणं आणि तेथील दैवताला नमस्कार करणं, हा भक्तीचा आविष्कार जगभर दिसून येतो. आपल्या पंढरपूरच्या वारीत ३ ते ५ लाख वारकरी सामील असतात. पूर्ण वारी करणारे एवढे लोक, त्यांचं व्यवस्थापन, ह्यावर कुणी संशोधन झालेलं असलं तरी त्याला तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. तसंच माणसांचा समूह एवढ्या मोठ्या संख्येनं फक्त विठूच्या दर्शनाच्या अपेक्षेनं पंढरपूर ह्या एका स्थानी एका विशिष्ट दिवशी जमा होतो, ही जगाला आश्चर्यचकीत करणारी घटना आहे. वारीतल्या लोकांच्या संख्येचे आकडे हे आपल्याला अलीकडे उपलब्ध होऊ लागले आहेत. युरोपातील वाऱ्यांचे १३ व्या, १४ व्या शतकातले आकडेही उपलब्ध आहेत, हे विशेष. इ. स. १४५० मध्ये रोममध्ये ख्रिसमसच्या काळात रोज ४० हजार माणसं बाहेरून येत होती. इ. स. १४९६ मध्ये गुड फ्रायडेला एका दिवशी १,४२,००० यात्रेकरू आखेन इथं आल्याची नोंद आहे.
जे. स्टॉपफोर्ड ह्या न्यूयॉर्क विद्यापीठातील ‘मध्ययुगीन कालखंडातील युरोपमधील धार्मिक यात्रा आणि त्यामागील अर्थकारण’ ह्या विषयात संशोधन केलं. त्या संशोधनाची माहिती वाचताना युरोपमधील वाऱ्या आणि आपल्या वाऱ्या यामधील फरक स्पष्ट होतो. आपल्याकडे पंढरपूरची वारी असो, अमरनाथची यात्रा असो किंवा पुरीच्या जगन्नाथाची यात्रा, तसंच पुष्करचा मेळा, ह्यात भक्त तीर्थस्थानी जातात, देवताचं दर्शन घेतात आणि समाधानानं परततात. युरोपमध्ये लोक जिथं जातात तिथं आणि वाटेतही त्यांना जेवणखाण याचा सर्व खर्च करावा लागतो. ज्या श्रद्धास्थळी पोहोचतात तिथं त्या दैवतासंबंधी अनेक वस्तू विक्रीस असतात. क्रास, मेरीचे फोटो (पूर्वी चित्र) गळ्यात घालायच्या माळा, रोझारी म्हणजे जपमाळ, अशा गोष्टीची अशा तीर्थस्थळी पूर्वापार विक्री होत आली आहे. रोझरी म्हणजे खरंतर रोझवुडच्या मण्यांची जपमाळ, पण पुढ बाराव्या-तेराव्या शतकापासून स्फटिकांच्या मण्यांच्या माळा प्रतिष्ठेच्या मानल्या जाऊ लागल्या. आपल्याकडं तुळशीमाळ एकदा गळ्यात घातली की अनेक बंधनं येत असत. तसं तिकडे नाही. वैष्णवांची जशी तुळशीमाळ तशीच शैवांची रुद्राक्षमाला; हे गणित आपल्याकड आहे तसं तिकडे नाही. ह्याचं कारण तिथे एकच प्रभू आणि त्याचा एकच पुत्र – असं असलं तरी संतपद मिळालेल्या सत्पुरुषांच्या पुण्यतिथीला त्यांच्या कबरीच्या किंवा चर्चच्या ठिकाणी दर्शनाला यात्रा निघते.
जेव्हा काही लाख माणसं एका दिशेनं वाटचाल करू लागतात, तेव्हा त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास अनेक सुखसोयी उपलब्ध करून द्याव्या लागतात. अन्न, पाणी, शारीरिक स्वच्छतेच्या सोयी, कपडे, पादत्राणे, आठवणीसाठीच्या वस्तू (सोव्हनिर्स) आणि सुरक्षा. त्यामुळे त्यात शासनाचा सहभाग अध्याहृत असे. मात्र जेरुसलेमकडे ज्या वाऱ्या जात त्यांना लष्करी संरक्षणाची आवश्यकता भासे. जेरुसलेम हे तीन जागतिक महत्त्वाच्या धर्माचं श्रद्धास्थान असल्यामुळे इथं येणाऱ्या भाविकांपुढे अनेक समस्या उभ्या राहत. मध्ययुगीन कालखंडात ‘जिहाद/क्रूसेड्स’मुळं जेरुसलेमवर कधी मुस्लिमांचा तर कधी ख्रिश्चनांचा ताबा असे. ह्यामुळे स्थानिक अर्थकारणावर परिणाम होत असे. इ. स. १२९१ मध्ये ‘आक्रे’ ह्या इस्रायली बंदरावर इस्लामी राजवटीनं ताबा मिळवताच फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरील बंदरातून जेरुसलेमकर्ड जाणाऱ्या वारकऱ्यांचे जथे आटले. त्यामुळे मार्सेलमधल्या व्यापाऱ्याचं दिवाळं निघालंच, पण फ्रान्सच्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम झाला.
युरोपमध्ये ख्रिश्चन धर्मीयांच्या वाऱ्या निघत होत्या, पण युरोपजवळ असलेल्या, सागरानं वेगळे केलेल्या इंग्लंड आणि त्याच्या पश्चिमेला असलेल्या आयलर्लंडमध्ये ख्रिश्चन धर्म पसरायच्या आधीपासून यात्रा निघत. स्टोन हेज हे त्याचं इंग्लंडमधलं जगप्रसिद्ध उदाहरण आहे. पुढे ह्या बेटांवर ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार झाल्यावर स्थानिक परंपरांचं यो ख्रिश्चनीकरण करण्यात आलं, ह्याचे पुरावे उपलब्ध आहेत, ऑग्लिया प्रांतातील वॉशिंग्टन येथे सातव्या शतकापर्यंत शेजारी शेजारी असलेल्या दोन विहिरीची पूजा सातव्या शतकापर्यंत पॅगन (जे ख्रिश्चन नाहीत त्या सर्वांना पॅगन म्हणजे असंस्कृत आणि रानटी ह्या अर्थानं ‘पॅगन’ म्हटलं जायचं, पुढे ख्रिश्चन धर्माचं व प्राबल्य वाढल्यावर इथल्या चर्चमधील मेरीच्या डोळ्यांतून अब्रुची, काही दंतकथानुसार रक्ताची धार वाहू लागली. त्यानंतर त्या दिवशी दरवर्षी इथं ‘मेरी’ची जत्रा भरू लागली. त्या विहिरीत मेरीचे अश्रू साठवले आहेत, ही दंतकथा प्रस्तुत करण्यात आली आणि अॅग्लियाची वार्षिक वारी सुरू झाली.
मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका भूखंडातील विविध आदिवासी जमातींची तीर्थस्थाने पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी उघडकीस आणलीत. माया आणि ॲॅझ्टेक संस्कृतींमधील तीर्थस्थाने आणि वार्षिक उत्सव ह्यावर हॅलेन सिल्व्हरमन ह्यांनी हयातभर काम केलं. । अर्बाना-चॅँपेन इथल्या इलिनॉय विद्यापीठात त्यांनी । मानवशास्त्राच्या प्राध्यापक आणि नंतर ख्यातकीर्त । प्राध्यापक (प्रोफेसर एमेरिटस) म्हणून काम केलं. अँडीज पर्वतराजीतील सांस्कृतिक ठेवा, उघड करण्यात त्यांनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं ठरलं. विशेषतः पेरूच्या दक्षिण किनाऱ्यावरील यात्रास्थळे आणि तिथल्या वार्षिक यात्रांचा प्रागैतिहासिक काळापासूनची I क्रमवारी त्यांच्या अथक प्रयत्नांनी जगापुढं आली.
मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील श्रद्धास्थाने ही मुद्दाम मानवी प्रयत्नांनी बांधलेली देवालयं असली, तरी ई तिथं वार्षिक उत्सव होत नसत. गंमतीची गोष्ट म्हणजे प्रतिवर्षी ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट दिवशी दूरदूरहून भाविकांचे जथे येत त्या ठिकाणी एखादी नैसर्गिक संरचना म्हणजे एखादा डोंगरावरील सुळका, एखादी गुहा, एखाद्या झऱ्याचं उगमस्थान, नदीच्या पात्रातील रांजणखळगे, वाऱ्यानं क्षरण होऊन तयार झालेली दगडी कमान अशा ठिकाणी कुणाला तरी परमेश्वर दर्शन तरी द्यायचा वा अशा नैसर्गिक आविष्काराच्या सान्निध्यात त्या व्यक्तीला आत्मज्ञान होऊन ती व्यक्ती प्रेषित म्हणून वावरू लागत असे. स्थानिक दंतकथांचं योग्य तऱ्हेने विश्लेषण केलं तर हे स्पष्ट होतं.
ॲन्डीज पर्वतातील विविध जमातींच्या बहुतेक वार्षिक वाऱ्या ह्या प्रागैतिहासिक काळापासून त्या जमातींच्या उगमस्थानी जाऊन त्यांना पृथ्वीवर जन्म देणाऱ्या देवाचे आभार मानण्यासाठी असत. सिल्व्हरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसंच ह्या भागात, हा विषयावर संशोधन करणाऱ्यांनी ह्या वाऱ्यांमागची जी कारणं दिलीत, ती फार महत्त्वाची आहेत. त्यांच्या मते ह्या वाऱ्यांमुळे समाजातील सर्व स्तरांतील व्यक्ती एकत्र येत. त्यातून सामाजिक एकोपा वाढायला मदत होत असे. त्या व्यक्तींची त्यांच्या जमातीच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने ती वाटचाल, ह्या दृष्टीने ह्या वाऱ्या महत्त्वाच्या ठरत.
मध्ययुगीन ब्रिटनमध्ये ७४, स्कॉटलंडमध्ये ३२ स्थळी प्रतिवर्षी विशिष्ट दिवशी भाविक जथ्याजथ्यानं ने येऊन एखाद्या स्थानिक संताच्या स्मरणासाठी जमत,अशी आकडेवारी उपलब्ध आहे. अशा प्रकारची अनेक सर्व उदाहरणे आहेत. ह्याचा अर्थ असा की अशा प्रकारची श्रद्धास्थानं ही मानवी मनाची एक गरज आहे. आता ह्या श्रद्धास्थानात एखादा देव किंवा एखादं पवित्र चिन्ह कीर्त किंवा प्रतीक प्रस्थापित केलं जातं, पण तुर्कस्थानातील कलं. ‘गब्वेक्ली टेपे’ (म्हणजे उंचवटा किंवा टेकडी) इथं जे पुरावे मिळाले आहेत तिथं देव अस्तित्वात येण्यापूर्वीपासून वर्षातील विशिष्ट काळात दूरदूरहून माणसांचे जथे येत होते, असे पुरावे मिळाले आहेत. ह्याचा अर्थ अश्मयुगीन मानवी संस्कृतीमध्येही वारी निघत होती; म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत अशा ही प्रकारची श्रद्धास्थानं निर्माण करणं, हा मानवी तरी संस्कृतीचा एक आवश्यक भाग होता. ‘वारी’ हा मानवी संस्कृतीचा एक स्थायीभाव गेल्या ७-८ हजार वर्षापूर्वी हळूहळू अस्तित्वात आला असावा, आणि कालांतराने हळूहळू तो बदलत आजपर्यंत पोहोचला बादी असावा, असं आपण म्हणू शकतो.
— निरंजन घाटे
Leave a Reply