नवीन लेखन...

जबाबदार कोण ?

आजच्या पिढीचं वाचन कमी झालंय किंवा आज मुलं वाचतच नाहीत, वाचाल तर वाचाल  याचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मोबाईलच्या आधीन ही पिढी होत चाललीय अशी हाकाटी सर्वत्र सुरु असते.  परंतू याला सर्वस्वी फक्त ही पिढीच जबाबदार आहे का? तर माझ्या मते नाही.  आज मुलांच्याही आणि बऱ्याचशा त्यांच्या पालकांच्याही आवडी, अग्रक्रम बदलले आहेत.  आपल्या मुलांना वाचन संस्कृतीचे धडे देण्यात पालक आणि काही प्रमाणात शाळांही कमी पडतायत.  मुलांचा अभ्यासक्रमच इतक्या गोष्टींनी भरलेला असतो की त्यामधून डोकं वर काढून अवांतर वाचणासाठी त्यांना वेळच मिळत नाही, आणि मिळालाच तर त्यासाठी त्यांना कुणी प्रोत्साहितही करत नाही.

लहानपणापासूनच मुलांना भेटीदाखल काय दिलं जातं? तर बॅटरीवर चालणारी महागडी खेळणी, व्हिडिओ गेम, धडधडणाऱ्या खेळातल्या बंदूका, पिस्तूलं.  या व्हिडिओ गेम मध्ये तर बुद्धीला चालना मिळण्यासारखा भाग तर अजिबात नसतो.  हातात बंदूक घेऊन स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रतिमांना धाड धाड उडवत पुढच्या स्टेजला जात रहायचं आणि मी चौथ्या किंवा दहाव्या स्टेजला पोहोचलो हे कौतुक एकमेकांना सांगायचं.  सर्जनशील, बुद्धीची गरज लागणारे खेळ म्हणा, गेम म्हणा आपल्याकडे बनवले जात नाहीत, आणि असलेच तर फार थोडे पालक याचा शोध घेऊन ते आपल्या मुलांना आणून देतात, त्यांच्याबरोबर बसून त्यांचं कुतूहल वाढवतात, रस वाढवतात.

दुसरा तो द्वाड मोबाईल.  तुम्ही म्हणालच,

“अहो, तो द्वाडच आज मुलांना ऑनलाईन शिक्षण देतोय.”

मोबाईल किंवा अगदी कोणतंही gadget संपूर्णपणे वाईट नसतंच.  पण त्यामधलं जे चांगलं आहे ते मी घेणार आहे का?  मोबाईल उघडताच अनेक गोष्टी क्षणभरात तुमच्यासमोर उघड्या होतात.  नको त्या वयात मुलांना समजू नये त्या गोष्टी नको त्या प्रकारे समजू लागल्या तर ते त्यांच्या दृष्टीने नक्कीच घातक आहे.  पण इतका विचार करायला कुणालाच वेळ नाही.  आज त्यांचे आई वडील दोघंही दिवसभर घराबाहेर असतात आणि आपल्या पाल्याशी संपर्क साधायला (वेळ मिळालाच तर)मोबाईल शिवाय पर्याय नसतो.  बरं तो फक्त संपर्क साधण्यापुरता नसतो, तर अत्यंत आधुनिक दर्जाचा मोबाईल त्याच्या हातात दिलेला असतो.  आजची पिढी निश्चितच हुशार आहे, त्यांची आकलनशक्ती अफाट आहे.  ही gadget आपलीशी करायला त्यांना फार वेळ लागत नाही.  आणि मग मित्राच्या रिकाम्या घरांत, गच्चीवर आणि अगदी शाळेतही ही मुलं आपापल्या मोबाईलसह एकत्र येऊन त्यातल्या अनेक गोष्टी पहात असतात, आपल्या परीने त्याचे अर्थ लावत असतात. आणि त्या लावलेल्या अर्थानुसार एखाद्या object कडे पहात असतात.  लहान मुलांना खेळातल्या बंदूका दिल्या जातात.  आणि मुलं त्यांनी एकमेकांवर निशाणा साधून ठो ठो करत असतात.  नकळत आणि कौतुकाच्या भरात मुलांच्या हातात काय देतोय याचा विचारही केला जात नाही.  आपल्या हातात आलेल्या अशा खेळण्यांनुसार ही मुलं आपल्या movies, गेम, निवडत असतात.  मोबाईल, टीव्ही, सिनेमा आणि हाणामारीची खेळणी मुलांना घडवत असतात.  आपल्या मुलांचं  कौतुक करायलाच हवं, परंतू या विनाशक खेळण्यांपेक्षा खऱ्याखुऱ्या शस्त्रानी सीमेवर आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या शौयाची वर्णनात्मक माहिती असलेली पुस्तकं,  शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या युद्धाची वर्णनं असलेली पुस्तकं ज्यामधून शस्त्र हे सामान्य जनतेवर उचलायचं नसतं हे त्यांना समाजायला हवं.   स्वसंरक्षण, प्रतिकारासाठी शस्त्र उचलणं आणि शस्त्राचा निरागस जनतेवर होणारा अनिर्बंध वापर आणि त्याचा धाक यातला फरक त्यांना काळायला हवा.  लहानपणापासून त्यांना हे जग अनेक सुंदर, आनंददायी गोष्टीनी भरलेलं आहे तसच अनेक दुःख वेदनांनी सुद्धा भरलेलं आहे याची जाणीव व्हायला हवी. पैसा हे सर्वस्व नसून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग वंचितासाठी यथाशक्ती करणं हे आपण माणूस असल्याचं द्योतक आहे हे ही त्यांना समजून सांगायला हवय. यासाठी स्वतःची समज वाढवणं, आणि आपली प्रगल्भता वाचनातून मोठी करणं याची आज अत्यंत गरज आहे.  आपल्या कर्तृत्वाने आपलं आणि आपल्या आजूबाजूचं जग उजळवून टाकणाऱ्या व्यक्तींची चरित्र, छानछोकी, पैसा, प्रतिष्ठा यामध्ये न रमता सामाजिक उपक्रमात मनापासून रमणाऱ्या, गावखेड्यात जाऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांना करून देणाऱ्या व्यक्तींना समजून घेणं, त्यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकातून त्यांचा प्रवास समजून घेणं याचीही आज नितांत गरज आहे.  तसंच स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी यात कुणी डावं उजवं नसतं.  या नाण्याच्या दोन बाजू आहेत.  आज अक्षरशः प्रत्येक क्षेत्र आपल्या हुशारीने काबीज करणाऱ्या स्त्रियांनी, मग ते शिक्षण, क्रीडा, कला, संशोधन, साहस, संरक्षण किंवा आणखी कोणतंही असो.  प्रत्येक क्षेत्रात आपला ठसठशीत ठसा उमटवला आहे, याचीही जाणीव मुलांना लहानपणापासून पालकांनी करून द्यायला हवी.  कोणतंही कामं लहान नसतं.  घरातलं प्रत्येक काम हे मुलगा मुलगी या दोघांनाही यायला हवं हे त्यांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे.  तरच पुढे जाऊन पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रिस्वातंत्र्य या गोष्टी संपुष्टात येतील.  कारण त्यावेळी स्त्री पुरुष दोघंही समान पातळीवर राहून एकमेकांना समजून घेत असतील.

आपल्या मुलांच्या जन्मदिनी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा वातानुकूलीत हॉलमध्ये भरपूर पैसा खर्च करून, महागडा केक कापून, त्यांना वर उल्लेखलेल्या महागड्या भेटी देऊन आणि आपल्या आप्त मित्रांसहं पार्टीच्या नावाखाली प्रचंड उधळपट्टी करण्यापेक्षा आपल्या पाल्याला या भेटींसोबत काही पुस्तकंही द्या.  येणाऱ्या त्याच्या मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणूनही एखादं पुस्तक द्या.  यासाठी त्यांच्या आई वडिलांनाही यामध्ये सामील करून घ्या.  सुरवातीला मुलं नाकं मुरडतील पण पुढे कदाचित काही चांगलं, सकारात्मक हाती लागू शकेल.  हे सगळं आज आम्हाला पटत नाही, रुचत नाही आणि पुढे मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांच्याच नावाने शंख करत सुटतो.  त्यावेळी हा विचारही मनात येत नाही की कुठेतरी या सगळ्याला आपणही जबाबदार आहोत.  कौतुक करताना, मुलांचे हट्ट पुरवताना त्यांच्यावर आपल्या सुसंस्कारीत वागणूकीमधून संस्कार करत त्यांच्या आयुष्याची घडण सुंदर करणं गरजेचं आहे.  आज प्रत्येक मुलीला ज्युडो कराटेचं प्रशिक्षण शालेय स्तरापासून अनिवार्य करायलाच हवं.  प्रत्येक मुलाची (मुलग्याची ) मानसिकता सकारात्मक करणं, त्याच्या मनावर लहानपणापासून आपल्या बहिणीशी, आईशी आदरांनेच बोलायचं, वागायचं या गोष्टी सतत बिंबवणं जरुरीचं आहे.  सुशिक्षित घरातल्या पालकांनी तरी याचा विचार केला तरी ही परिस्थिती, अगदी लगेच नाही म्हणत मी पण हळुहळु आटोक्यात येऊ शकेल.  मला वाटतं या सगळ्यासाठी मानसिकता घडवण्याबरोबरच विविध साहित्याचं वाचन, चिंतन, मनन, अवलोकन या गोष्टी अत्यंत जरुरीच्या आहेत.

आमच्या जवळच्या एका शाळेच्या वाचनालंय समितीवर असताना मी एक प्रयोग सुचवला होता.  तो असा,  दर महिन्याच्या एका शनिवारी एक तास साहित्याशी संबंधित ठेवावा. या शाळेचं वाचनालंय अद्ययावत होतं.  वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला हवं ते पुस्तक वाचायला घरी घेऊन जावं. अर्थात हे वाचन सक्तीचं नसावं.   ते वाचून त्यामध्ये लेखकाला काय म्हणायचंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा.  आणि पुढच्या महिन्याच्या एका शनिवारी जेव्हा साहित्याचा तास असेल त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने अगदी थोडक्यात त्या पुस्तकावरचा आपला अभिप्राय आणि आपल्याला त्यामधून काय समजलं हे सगळ्या मुलांसमोर सांगावं.  कुणाला वाचनातून काही प्रश्न पडले असतील तर त्यांचं शिक्षकांनी निरसन करावं.  उत्कृष्ट विवेचन करणाऱ्या दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना उत्तेजन म्हणून लहानसं बक्षीस द्यावं.  याने काय साधेल?  तर प्रत्येक महिन्यात वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल,  वाचन करण्यामध्ये रस निर्माण होईल,  न वाचणाऱ्या मुलांचे पायही वाचनालयाकडे वळू लागतील,  आपणही वाचून त्यावर आपलं मतं मांडू शकतो हा विचार दृढ व्हायला लागेल.  वर्गातल्या पन्नास मुलांपैकी सुरवातीला निम्मी जरी मनापासून वाचू लागली तरी हा उपक्रम सफल झाला असं म्हणता येईल.

आज शाळांना सुट्टी पडली की अनेक शिबीरांचं पिक येत असतं.  यामधलंच एक क्रिकेट शिबीर आणि त्यामध्ये लगोलग आपल्या मुलाला दाखल करणारे त्याचे पालक.  सगळ्यांनाच सचिन – विराट – धोनी – द्रविड यांच्यासारखं क्रिकेट खेळायचं असतं.  त्यांना डोळ्यासमोर ठेऊनच ही मुलं शिबिरात दाखल होतात.  पण जेव्हा सुरवातीला त्यांना शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, बेसिक व्यायामाचे प्रकार शिकवायला सुरवात केली जाते, तेव्हा त्याचा मुलांना कंटाळा येऊ लागतो.  त्यांना एकदम हातात बॅट हवी असते.  मग घरी गेल्यावर मुलं आपल्या पालकांकडे तक्रार करतात, की शिबिरात क्रिकेट शिकवत नाहीत, फक्त व्यायामाचे प्रकार करून घेतात, धावायला लावतात.  पण, हे असच असतं हे किती पालक त्यांना समजावून सांगतात? आपल्या आयडॉल सारखं बनण्याची स्वप्न पहाणं यामध्ये चुकीचं काहीच नाही.  परंतु त्या उंचीवर पोहोचण्यासाठी त्या खेळाडूंनी किती मेहनत घेतली होती? हे जाणून घेणं, त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमधून हे समजून घेणं.  आपल्याला ज्या खेळात रुची आहे असं वाटतं त्या खेळाबद्दल पुस्तकांमधून समग्र माहिती घेणं हे फार महत्वाचं असतं.  यासाठी पालकांनी आपल्या मुलाला मदत करायला हवी आणि सत्य परिस्थितीची जाण त्यांना करून द्यायला हवी.  अर्थात हे अगदी कोणत्याही क्षेत्रासाठी, म्हणजे गायन, नृत्य, अभिनय, क्रीडा अथवा इतर काही या प्रत्येक क्षेत्रासाठी लागू होतं.  आपल्या मुला मुलीने तोंडातून इच्छा व्यक्त करताच ती पूर्ण करणे हे आपलं इतिकर्तव्य आहे ही भूमिका आधी पालकांनी बदलायला हवी.  आपल्या पाल्याची कुवत जाणून घेऊन त्याला आवड असलेल्या तसंच इतरही क्षेत्रांची पायाभूत माहिती त्याला द्यायला हवी.  नाहीतर एक ना धड…… अशी गत होते आणि घडत मात्र काहीच नाही.

शाळा हे मुलांना अभ्यासमध्ये गुंतवून ठेवणारे आणि गुणांच्या चढाओढीत कुरघोडी करायला लावून शाळेचा गुणांचा TRP वाढवणारे कारखाने झालेयत.  90%,  95%,  98%, 99% गुण मिळवणारी मशीन आम्ही तयार करतोय, जी पुढे मानेवर जू ठेवून अभ्यास करत आपलं शिक्षण पूर्ण करून आणि मोठमोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवून एखाद्या यंत्रमानवासारखी वावरतायत, आत्मकेंद्रीत होऊन आपल्यापुरताच विचार करतायत.  शिक्षणासोबत सामाजिक भान ठेवणारी, समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींवर रिऍक्ट होणारी आणि आपल्यासोबत आपल्या कर्तृत्वाने आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारी पिढी घडावायची असेल तर भानावर येऊन त्याची सुरवात आजच करायला हवीय हे मात्र निश्चित.
थोडक्यात काय, तर वाचन, मनन आणि वैचारिक मंथन या साऱ्यातूनच एक सुसंस्कारीत नागरिक आणि अशा नागरिकांतून एक सु्बुद्ध, सुजाण आणि सुयोग्य समाज घडणार आहे.  याचा विचार मात्र तात्काळ करण्याची गरज आहे, अन्यथा…….

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.

1 Comment on जबाबदार कोण ?

  1. मराठीसृष्टीवर माझा पहिला लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..