काल दूरदर्शनवर एका मालिकेत स्वप्निल जोशी म्हणाला- ” पालकांच्या अकाली निधनानंतर मी सचिनचा मोठा भाऊ झालो खरा,पण त्यावेळी मी अवघा वीस वर्षांचा म्हणजे तसा लहानच होतो की ! मला कायम समंजसपणा दाखवावा लागला, मनात नसलं तरीही हसून प्रसंग साजरे करावे लागले. सतत चेहेऱ्यावर कुटुंबप्रमुखाचे गंभीर भाव आणि उद्याच्या विवंचना इतरांपासून दडवणे. फक्त आणि फक्त घराचा,घरातील माणसांचा विचार ! ”
हे असे काही बाल्यानुभव जन्मभर आपली पाठ सोडत नाहीत आणि आपल्यात वर्तन विसंगती निर्माण करू शकतात. ती विसंगती आपल्या अंतःप्रेरणेतून निर्माण होऊ शकते.
आपल्या संदर्भातील आजचे जगणे हे खरे तर प्राण्यांच्या अथवा आदिमानवाच्या जीवन प्रेरणांमधून सुरु झालेले आहे. मानवी उत्क्रान्तीच्या त्या टप्प्यावर भक्षकांपासून अथवा युद्धपिपासू टोळ्यांपासून स्वतःचा बचाव करणे आणि भौतिक अस्तित्व येनकेनप्रकारेण टिकवून धरणे एवढाच जगण्याचा हेतू होता.
सध्याच्या आधुनिक जगात स्वाभिमान,ओळख आणि स्वीकारार्हता टिकवून ठेवणे म्हणजेच निभाव लागणे झाले आहे.जोडीला असे कायमचे ओझे !
धोकादायक परिस्थितीशी दोन हात करताना मानवी मेंदू ” लढा, पळ काढा अथवा थांबा आणि विचार करा” असा संदेश देतो.
अर्थात हे प्रतिसाद व्यक्ती आणि परिस्थितीसापेक्ष असतात.
त्यापैकी एक आजच्या मालिकेतील प्रसंग आणि वर उल्लेखलेला उदगार आहे.
एखाद्याची कोठलीही तयारी नसताना आयुष्य त्याला/तिला बखोटं धरून उचलतं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर सोपविण्यासाठी उभं करतं. शरीर आणि मन मुलांना मोठ्यांचे काम शिरी घेण्यासाठी तयार करतात-बऱ्याचदा मनाविरुद्ध !
माझ्या वडिलांवर आई आणि दोन बहिणींची जबाबदारी आली तेव्हा ते नुकतेच एस एस सी झाले होते आणि महाविद्यालयीन शिक्षणाची स्वप्ने अर्धवट सोडून वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना नोकरी धरावी लागली होती. नंतर स्वतःच्या परिवाराबरोबरच दोन्ही बहिणींची शिक्षणे,लग्न, वृद्ध आजीकडे लक्ष देणे हे सारं त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्यांनी निभावून नेलं. धाकटा भाऊ असता तर – थोडं ओझं त्याने सावरून घेतलं असतं ! अर्थात असं त्यांना कधी वाटलं की नाही,माहीत नाही पण आजी मात्र तसं कळवळून म्हणत असत. बरेचदा मलाच ” तू आता मोठा झाला आहेस, लवकर त्याच्या हाताशी ये ” असं ही सुचवायच्या.
त्याकाळातील बरेच पालक कधी एकदा आपला मुलगा/मुलगी नोकरीला लागतोय आणि थोडा आर्थिक भार उचलतोय या मनःस्थितीत असत.
गौरी देशपांडेंच्या एका लघु कादंबरीत आई-वडील लहान मुलांना घरी एकटं सोडून परदेशी जातात तेव्हा १३ वर्षांचा मोठा भाऊ १० वर्षांच्या धाकट्या बहिणीला सावरतो, एकांतवासाला तयार करीत म्हणतो- ” मी आहे नं ”
हे “अकाली “प्रौढपण डोळ्यांत पाणी आणतं.
साखर कारखान्यावरील ऊस तोडणी मजुरांची बालके असोत, वा “तारे जमीं पर ” मधलं अमीरखानच्या हातातील चहा-बिस्किटाकडे आशाळभूतपणे पाहणारं टपरीवरील मूल असो, सगळीकडे बाल्याच्या चिंध्या झालेल्या दिसतात. बाल्य विसरून,निरागस खेळकरपणा मागे टाकून हे हातातील सारं गमावून बसतात आणि बालपणातील हे कौटुंबिक व्रण कोवळ्या खांद्यांवर जपतात.
वर्तनाचा हा साचा त्यांना अबोल,एकाकी,कुढणारा बनवू शकतो. त्यांची अनुभव घेण्याची क्षमता मर्यादित करू शकतो.
हे जन्मभरासाठी झालेलं आणि कधीही भरून न निघणारं नुकसान असतं आणि ते सोसावं लागतं. कूस मिळत नाही- विसावण्यासाठी की खांदे- अश्रू जिरविण्यासाठी !
कायद्यानुसार “इथे कोणीही बालकामगार कामाला नाहीत ” अशी पाटी लावावी लागते आस्थापनांमध्ये , पण घरांचे काय?
तिथे असे अनेक बालकामगार पिढ्यानपिढ्या राबत असतात-हूं की चूं न करता- स्वप्नील जोशी सारखे आणि ते ” कामगार ” कायम बालच राहतात सेवानिवृत्तीपर्यंत ! विसाव्याचे क्षण विसरून.
भयाण आणि फक्त भयाण असतं हे अदृश्य ओझं -करपून टाकणारं !
-– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
katha chan aahe.
Thanks a lot !