जडत्व न वाटे गरज असता
संपता गरज ताण येतो
शब्द सुटतो स्वच्छतेचा
अन हात अलगद कपट करतो
कुणी लेखक कुणी कवी
विचारांची नाही हमी
कृत्य जेव्हा होईल सत्य
तोच दिन खरा…
अर्थ–
जडत्व न वाटे गरज असता
संपता गरज ताण येतो
शब्द सुटतो स्वच्छतेचा
अन हात अलगद कपट करतो
(ट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात. मग आपण ज्या बॅगेत त्या भरलेल्या असताना होत्या त्या ठिकाणी जागाच नाही या विचारांनी त्या पिशव्या सहजतेने अगदी कुठेही भिरकावून देतो आणि निश्चिन्त होतो. बाकी स्वच्छ भारत अभियान, इतर देशातल्या स्वच्छतेच्या पोस्ट्स वर like करायला आणि याची आपल्या देशात नितांत गरज आहे हे बोलायला आपण अगदी पुढे असतो मग ते बोलताना हळूच सुद्धा नाही तर ताठ मानेने जेव्हा ट्रेन मधे रिकामा चहाचा कप जेव्हा बाहेर भिरकावला जातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर सोज्वळतेचे भाव असतात.)
कुणी लेखक कुणी कवी
विचारांची नाही हमी
कृत्य जेव्हा होईल सत्य
तोच दिन खरा…
(तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, विचार मांडणारे असाल किंवा त्यांना कागदावर उमटवणारे. एखादी गोष्ट किंवा विचार नुसते मनात येऊन चालत नाहीत तर ते कृतीत येणं गरजेचं असतं. सिग्नल ला उभे असताना अचानक आपल्या मुखातून लाल रंगाची पिचकारी जेव्हा रस्त्यावर पडते तेव्हा तुमच्या मनाला आत्मिक समाधान मिळत असेल पण इतरांना होणारा त्याचा त्रास कधी लक्षत येणार? येथे लघवी करू नये हे लिहावं लागणं हेच गंभीर नाहीये का? केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून राष्ट्र सुधारत नाही आणि सुधारणार ही नाही, पहिले गड-किल्ले स्वच्छ ठेवायला हवे, मग विचार स्वच्छ बनायला हवेत तेव्हा त्याचा परिणाम चांगला दिसेल, केवळ घरात पॉश furniture आणून, चकाचक लाद्या आणि लाइट लावायचे आणि आपल्या घरातून बाहेर पडले की रजनीगंधा आणि गुटखा खाऊन पचापच थुंकायचे याला काही अर्थ नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply