एक पिटुकला उंदीर होता. त्याने आपल्या बिळाबाहेरचे जग पाहिले नव्हते.. बाहेर जावे आणि सारे जग पाहून यावे असे त्याला सतत वाटत असे. एकदा त्याला त्याच्या आईचा मूड चांगल असल्याचे दिसले. त्याने पटकन आईला विचारले, ‘आई, मी जरा बिळाबाहेर फिरून येऊ का?” आई म्हणाली, ‘ हो जा ना. पण जरा सांभाळून जा बरं का?’ थोड्या वेळानंतर पिटुकला उंदीर बिळाबाहेरच्या जगात होता. तोच त्याला एक कोंबडा दिसला. कोंबड्याचा लालभडक तुरा आणि कर्कश आवाज ऐकून उंदीर घाबरला. तो घाबरून कोंबड्यापासून वेगाने दूर पळाला. त्याला वाटले हा भयंकर प्राणी दिसतो आहे….
त्याने आपल्याला पाहिले तर हा आपला सहज चट्टामट्टा करून टाकेल. जर मी पळालो नसतो तर त्याने नक्कीच मला मारून टाकले असते. थोडा वेळ तो एके ठिकाणी धापा टाकत थांबला आणि नंतर पुढे चालू लागला थोडे पुढे गेल्यानंतर पिटुकल्या उंदराला एक झोपलेली मांजर दिसली. उंदराला वाटले, किती छान आहे हा प्राणी. याचे शरीरही कसे मुलायम आहे. याचा आवाजही नक्कीच गोड असेल. पिटुकला उंदीर न घाबरता मांजरासमोरून पुढे गेला. नंतर हिंडून-फिरून उंदीर घरी आपल्या बिळात गेला. त्याने आपल्या आईला कोंबडा आणि मांजराबद्दल सांगितले. आई म्हणाली, ‘बाळा, कोंबड्याला घाबरायचे काहीच कारण नाही. तो खूपच साधासज्जन प्राणी आहे. पण मांजरापासून आपण सावध राहायला हवे. ती आपला सर्वांत मोठा शत्रू आहे, तेव्हा पिटुकल्या उंदराला समजले की बाहेरच्या जगात दिसते तसे नसते.
Leave a Reply