आज थोडी भाकरं
अन कोरड्यास खरडा
सुगीवाचून कसं मिळंल
खायाला खमंग हुरडा
उद्याचे दान काय
उद्याच्याला सोडा
आज कशापायी
ओढता उगा गाडा
इतभर खळगी भरून
कशाला हाती घेता गाडगा
झोपाया थोडी लागलं
चारखणी वाडा
चारखणी वाड्यातबी
निस्ता आरड ओरडा
कुठं कुणा सुख टोचे
ईर्षा आणि पाय निसरडा
उगा खेचू नाही
वाईच तुमी हेका सोडा
समजून उमजून ऱ्हाऊ
चालवू जगाचा छकडा
नगं उगी चेपून जाऊ
काळामध्ये भरडा
माणसं होऊन जगा लेको
ओलावा ऱ्हाउदे थोडा!
— वर्षा कदम.
Leave a Reply