असा डंका आम्ही फार पूर्वी मिरवलाय. हे भटकेपण स्वीकारलेलं असो की लादलेलं ! तेथे एकाकीपण आलंच. जगणं जगायसाठी बाहेर पडावं लागतंच. पण “तो प्रवास सुंदर होता ” अशी ग्वाही देता येतेच असं नाही.
“नोमॅडलँड ” ( भेटू या पुन्हा एकदा- रस्त्यावरच ! ) या चित्रपटावर आजच्या वृत्तपत्रात भरभरून लेखन आलंय. ते वाचून “अनुरोध ” मधले किशोरचे शब्द आठवले-
” दूर कहीं कोइ दर्पण टूटे, तड़प के मैं रह जाता हूँ ! ”
आजकाल हे असं होतंय. आरसा जवळ फुटो की दूरवर, काचा पोहोचतातच पायांपर्यंत ! आवंढा गिळायचा प्रयत्न केला तरी ” थंडगार पाण्यावर शांत पहुडलेली कविता ” असे या चित्रपटाचे वर्णन असो की ” जा बाबा, परत जा, आजोबा हो ” असे सहप्रवाश्याला जीवनात उलटं ढकलणारी मुख्य अभिनेत्री असो, डोळ्यांत पाणी येतेच.
” मत पूछो औरों के दुःख में, ये प्रेम कभी क्यों रोता है ?
बस चोट किसी को लगती है और दर्द किसी को होता है !! ”
असे प्रश्न आनंद बक्षीलाही सुटले नाहीत. हा “रोड मुव्ही ” आहे म्हणतात. आपल्याकडचा ” हाय वे ” असा होता, पण त्यातून घरातून पळून जात जसं भेटेल तसं जीवनाला भिडण्याची कथा होती. इथे सांगून-सवरून, घर विकून निसर्गाकडून भरभरून घेण्यासाठी स्वीकारलेलं भटकेपण आहे.
रितेपण पाठ सोडत नाही तद्वत भूतकाळही !
आपल्यासारखे असंख्य आहेत एवढाच धीर, पण येरझार सुटत नाही. आतबाहेर सगळं सुरूच. आतले शोध लागत नाही म्हणून बाहेर भटकायचे आणि बाहेरचा कंटाळा आला की परत आत डोकवायचे. कंटाळा येतो मग.
हातात सर्जनाचा ब्रश घेऊन निसर्गाच्या कॅनव्हासवर रेघोट्या ओढायच्या आणि बघता बघता त्यातून एखाद्याला देखणं चित्र दृष्टीस पडायचं. तेवढाच विसर ! सध्याच्या क्षेत्रसंन्यासाच्या काळात या नायिकेला तरी घराबाहेर मनःपूत हिंडता येतंय याचाच हेवा वाटायला लागतो.
कोणत्या हाकाऱ्यांना “ओ ” देत, केव्हा बाहेर पडायचं याचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच असतं असं नाही.
Leave a Reply